घरटं

अलिकडे एका बुलबुल पक्षाने आमच्या घरात घरटं केलेलं..आपण माणसं आपलं 'घर' बांधण्याकरता जशी आधी जागा ठरवण्यापासून सगळी प्रक्रिया असते, अगदी तसंच हे बुलबुल करत असावं..एवढे 'प्लॉट' बघितल्यानंतर आखेर आमच्या घरात असलेली जुनी tubelight त्याला सुरक्षित वाटली असावी.. 'प्लॉट' पसंत पडल्यावर काय मग 'काड्यांची जमवजमव सुरु झाली. बाल्कनीच्या मोठ्या दाराच्या वरची ही जागा..पण दार सकाळी उघडेस तोवर या बुलबुलने खिडकीतून आत बाहेर करण्याची सोय केलेली. साधारण, घरटं बांधण्यापासून, अंडी घालून...ते घरटं रिकामं करण्यापर्यंत 15-20 दिवस गेले..एक दिवस सकाळी पाहतो तर काहीच हालचाल नाही..घरटं रिकामं..त्यांना रोज बघण्याची सवय झाल्यामुळे घरटं रिकामं झाल्यावर वाईट वाटलं खरं. त्यांची आठवण म्हणून मी ते घरटं जपूनच ठेवलंय..इतकं नेटकं , साधं पण तरीही मजबूत बांधलंय ते. निसर्गाच्या किमयेपुढे आपण नतमस्तक झालो नाही तर नवल..अवघ्या १५-२० दिवसांत त्यांनी पिलांसहित ते घरटं रिकामं केलं.. किती सहज मोकळं करतात हे जीव सगळ्यातून स्वतःला ..स्वकष्टाने बांधलेलं घर किती सहज सोडतात ....