घरटं

   अलिकडे एका बुलबुल पक्षाने आमच्या घरात घरटं केलेलं..आपण माणसं आपलं 'घर' बांधण्याकरता जशी आधी जागा ठरवण्यापासून सगळी प्रक्रिया असते, अगदी तसंच हे बुलबुल करत असावं..एवढे 'प्लॉट' बघितल्यानंतर आखेर आमच्या घरात असलेली जुनी tubelight त्याला सुरक्षित वाटली असावी..
   'प्लॉट' पसंत पडल्यावर काय मग 'काड्यांची जमवजमव सुरु झाली. बाल्कनीच्या मोठ्या दाराच्या वरची ही जागा..पण दार सकाळी उघडेस तोवर या बुलबुलने खिडकीतून आत बाहेर करण्याची सोय केलेली. साधारण, घरटं बांधण्यापासून, अंडी घालून...ते घरटं रिकामं करण्यापर्यंत 15-20 दिवस गेले..एक दिवस सकाळी पाहतो तर काहीच हालचाल नाही..घरटं रिकामं..त्यांना रोज बघण्याची सवय झाल्यामुळे घरटं रिकामं झाल्यावर वाईट वाटलं खरं.
   त्यांची आठवण म्हणून मी ते घरटं जपूनच ठेवलंय..इतकं नेटकं , साधं पण तरीही मजबूत बांधलंय ते. निसर्गाच्या किमयेपुढे आपण नतमस्तक झालो नाही तर नवल..अवघ्या १५-२० दिवसांत त्यांनी पिलांसहित ते घरटं रिकामं केलं..
   किती सहज मोकळं करतात हे जीव सगळ्यातून स्वतःला ..स्वकष्टाने बांधलेलं घर किती सहज सोडतात ..आपण माणसं सगळ्या साठी दुस-यावर अवलंबून..आपलं घरही आपण स्वत: बांधत नाही..पक्षी मात्र अन्न मिळवण्यापासून ते घर बांधण्यापर्यंत सगळ्या बाबतीत स्वावलंबी आहेत. 
   तरीही आपण सगळ्यात गुंतून राहतो हे मात्र खरं ..घर आपलं स्वतःचं असो किंवा भाडं देऊन असो..तिथे राहत असो किंवा ते सोडलं असो ..आपण त्यात गुंतून राहतो. आठवणीतून , फोटो मधून ..कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जोडलेले राहतो.
  शिक्षणानिमित्त मी १६ वर्षां पूर्वी पुण्याला आले. तेव्हा मला कल्पनाही नव्हती की त्या घरात आपण पुन्हा कधीही जाणार नाही. एवढंच काय तर ते घर आपण पुन्हा कधीही पाहणार सुद्धा नाही. आज ते घर विकल्यावरही त्याचा उल्लेख 'आपलं घर' असाच होतो. या शिवाय नवीन शहरं , त्या अनुषंगाने बदलावी लागणारी घरं , यामुळे जिथे जिथे आजवर मी राहिले त्या प्रत्येक घरची आठवण आजही आहे.
   हे पक्षी मात्र दरवेळेस नवीन घरटं तितक्याच उत्साहानं बांधतात.. दर वेळेस नव्याने सुरुवात करतात आणि असं करायला ना त्यांना संकोच वाटतो ना त्रास होतो. एवढंच नाही तर ते रिकामं करण्याची वेळ आली की जणू हे कधी आपलं नव्हतंच इतक्या सहज निघून जातात. स्वतः बांधलेला असूनही हे करण्याची सहजता त्यांच्या कडे कुठून येत असावी? 
They just move on...हे 'move on' होणं आपल्याला मात्र खूप अवघड जातं.
  गेलं वर्ष जरूर कठीण होतं.. त्याची विचित्र झळ आपल्याला बसली. मात्र गेलं वर्ष हा आपला भूतकाळ होता . आणि त्याकडे जितकं लौकर आपण भूतकाळ म्हणून पाहून ते विसरायला शिकू तितकं आपण पुन्हा नवी सुरुवात करू. The new normal आपण म्हणतोय खरं पण ते आपण स्वीकारलंय का? आपला दिनक्रम , काम, शाळा, कॉलेज, क्लास इ सगळं वेगळ्या पद्धतीने सुरु आहे , पण सुरु आहे. पण त्याला आपला ..आपल्या मुलांचा total acceptance नाही. ही पर्यायी व्यवस्था आहे हे माहिती असूनही acceptance नाही. कारण आपण गुंतून राहिलोय भूतकाळात. Move on झालेलो नाही.  
  आठवणीत रमणं हा मनुष्य स्वभाव झाला, मात्र अशा आठवणी काय उपयोगाच्या ज्या आपल्याला वर्तमानात कमकुवत करतील? वर्तमान काळ हा भूतकाळापेक्षा कधीही सशक्तच असतो, निसर्गतःच.  पण त्याकडे आपण तसं न पाहिल्यामुळे आणि भूतकाळात गुंतून राहिल्यामुळे वर्तमानाची ताकद आपण समजू शकत नाही. पक्षासाठी सुद्धा ' काय यार ,दर वेळी नवीन घरटं बांधा' हा दृष्टीकोन नसून , नवनिर्मिती हा दृष्टीकोन असतो. त्यामुळे त्यांचा वर्तमानही निसर्गतःच अत्यन्त सशक्त असतो. शिवाय त्यांना switch on/off होता येतं. त्यामुळे आहे त्या परिस्थितीशी , आपल्यापेक्षा ते पटकन जुळवून घेतात.
  एका घरट्यामुळे एवढा मोलाचा धडा मिळाला. निसर्गच आपला खरा गुरु आहे आणि पदोपदी तो आपल्याला काहीतरी शिकवत असतो..ते समजून घेण्याची दृष्टी आपल्याकडे आहे का याचा विचार प्रत्येकाने करावा.

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....