Posts

Showing posts from November, 2021

तेज ब्रह्म

Image
  पहाटेचा कुंद गारवा, दुपारी जाणवणारा उकाडा आणि पुन्हा तिन्हीसांजे नंतर तोच गारवा . वातावरणात हा बदल जाणवायला लागला की समजायचं दिवाळी येऊ घातलीये. वातावरणात जसा हा बदल होतो तसाच बदल होतो तो वातावरणातल्या सुगंधांमध्ये . चकलीची भाजणी, बेसन पीठ तुपावर भाजल्याचा सुगंध असे एकापेक्षा एक सुगंध दरवळून वातावरण गंधमय होतं तसं खाद्यमय सुद्धा होतं. हा बदल फक्त दिवाळीतच बरं का? म्हणजे पुढे काय वाढून ठेवलंय हे आपण नकारात्मक अर्थाने वापरतो, पण दिवाळी जवळ आली कि हे सुगंध जणू खरंच 'पुढे काय वाढून ठेवलंय' याची वर्दी देतात. हे सगळं वाढलं जाणार असेल तर दिवाळीची ओढ लागलीच पाहिजे.  तर या दिवाळी मागची कथा अशी... भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर आक्रमण केलं. प्रहरभर युद्ध करून त्याला संपवला. दिवाळी चा हाच तो पहिला दिवस , नरक चतुर्दशी. नरकासुराने कैद केलेल्या सर्व स्त्रियांना श्रीकृष्णाने मुक्त केलं. त्या सर्वांना श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याची इच्छा होती. पणत्या हातात घेऊन त्या ओळीत उभ्या राहिल्या. या पणत्या म्हणजे 'दीप' आणि ओळीला म्हणायचं 'आवली'..यावरून दीपावली शब्द तयार झाला.