तेज ब्रह्म

  पहाटेचा कुंद गारवा, दुपारी जाणवणारा उकाडा आणि पुन्हा तिन्हीसांजे नंतर तोच गारवा . वातावरणात हा बदल जाणवायला लागला की समजायचं दिवाळी येऊ घातलीये.
वातावरणात जसा हा बदल होतो तसाच बदल होतो तो वातावरणातल्या सुगंधांमध्ये . चकलीची भाजणी, बेसन पीठ तुपावर भाजल्याचा सुगंध असे एकापेक्षा एक सुगंध दरवळून वातावरण गंधमय होतं तसं खाद्यमय सुद्धा होतं. हा बदल फक्त दिवाळीतच बरं का? म्हणजे पुढे काय वाढून ठेवलंय हे आपण नकारात्मक अर्थाने वापरतो, पण दिवाळी जवळ आली कि हे सुगंध जणू खरंच 'पुढे काय वाढून ठेवलंय' याची वर्दी देतात. हे सगळं वाढलं जाणार असेल तर दिवाळीची ओढ लागलीच पाहिजे. 
तर या दिवाळी मागची कथा अशी...
भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर आक्रमण केलं. प्रहरभर युद्ध करून त्याला संपवला. दिवाळी चा हाच तो पहिला दिवस , नरक चतुर्दशी. नरकासुराने कैद केलेल्या सर्व स्त्रियांना श्रीकृष्णाने मुक्त केलं. त्या सर्वांना श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याची इच्छा होती. पणत्या हातात घेऊन त्या ओळीत उभ्या राहिल्या. या पणत्या म्हणजे 'दीप' आणि ओळीला म्हणायचं 'आवली'..यावरून दीपावली शब्द तयार झाला. नरकासुराबरोबर युद्ध करून यादव सेना प्रचंड थकलेली , जखमी झालेली. तेव्हा या सर्व स्त्रियांनी सूर्योदयापूर्वी वस्त्र , फराळ सगळ्याची व्यवस्था केली . यादव सेनेला हे सगळं पुरवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. या सगळ्याची आठवण काढून दिवाळी हा सण आपण साजरा करत आलेलो आहोत. 
दिवाळीच्या निमित्ताने या पणत्या लावताना एक वेगळाच साक्षात्कार दरवेळी होतो. आधी काडी पेटवून ती ज्योत आपण त्या पणती पाशी नेतो. वातीमधल्या तेलात भिजलेली ती वात ...मातीच्या पणतीने स्वतःमध्ये तेल व वातीला सामावून घेतलेलं असतं..आणि मग जेव्हा ती पेटलेली काडी वातीजवळ जाते तेव्हा अलगद तो तेजस्वी प्रकाश पसरतो ..त्या पणती भोवती एक तेजोवलय तयार होतं.
मला नेहमी असं वाटत आलंय की अहं सोडल्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पणती , वात व तेल यांचे आपापले गुणधर्म आहेतच ..पण जेव्हा तेज निर्माण करायचं असतं तेव्हा या सर्वानांना एकरूप व्हावंच लागतं. मी मातीची पणती , मी कापसाची वात , मी अमुक एक तेल हे त्यांचे अहंकार वर उसळत राहिले तर त्यातून निर्माण होणार प्रकाश कधी येऊच शकणार नाही. या तिघांनाही हे समजतं जणू कि आपले वैयक्तिक गुणधर्म कितीही महत्वाचे असले तरी, प्रकाशाच्या श्रेष्ठत्वापुढे ते सामन्यच राहणार आहेत. पणती, वात किंवा तेल हे ते स्वतःसाठी ..मात्र यांच्या एकरूप होण्याने जो प्रकाश निर्माण होणार तो मात्र जगाकरता .. 
   आपल्या आजूबाजूला या निर्जीव वस्तू असतातच .म्हटलं तर दिवाळीतली ती पणती निर्जीवच ..ती वात इ सगळं निर्जीव..मात्र यामध्ये सजीव प्रकाश निर्माण करायची क्षमता आहे, अहं बाजूला ठेवण्याचा संकेत आहे..
   तेज म्हटलं तर काडी घासल्यावरही तयार होतंच,पणती लावण्याकरता ती एक ठिणगी गरजेची आहेच..पण ती घर्षणाने तयार झालेली ठिणगी असणार आहे याची जाणीव तिलाही आहे. त्याला वलय नाही..असूच शकत नाही. ते तेज अखंड तेवत राहणंही शक्य नाही. ते एक क्षण निर्माण होऊन विझून जाणारं तेज तर पणती चं तेज अखंड तेवतं राहणारं , वलयांकित, इतरांना प्रकाश वाट दाखवणारं.
   अशा एखाद्या तेजनिर्मितीकरता जेव्हा आपण एकत्र येतो , मग ती विचार निर्मिती असो, एखादी कला निर्मिती असो, एखादी वस्तू निर्मिती असो , तेव्हा तेव्हा या सगळ्याची जाणीव असणं गरजेचं आहे. आपापले अहं, आपले शिक्षण आपले गूण,आपली कौशल्यं हे त्या तेजातून आपोआप बोलणार आहेत..
   अशा ओळीने पणत्या लावल्यावर निर्माण होणारं 'तेज ब्रह्म' आणि मग त्यातून होणारे परमेश्वरी शक्तीचे दर्शन अवर्णनीय असणार हे नक्की..
   नरकासुर वधानंतर जणू त्या मुक्त झालेल्या स्त्रीयांना श्रीकृष्णाचे दर्शन व्हावे असंच काहीसं...
   या अहंकार रुपी नरकासुरापसुन आपणही मुक्त होऊ शकतो. मुक्त होण्याकरता साक्षात परमेश्वरंच आपल्याला मदत करत असतो , मार्ग दाखवत असतो. ते ओळखून त्या मार्गावर चालत राहणं तेवढं आपल्या हातात . या मार्गाच्या सुरवातीलाही 'तोच', मार्गदर्शन करणाराही तोच आणि शेवटी ज्याचं दर्शन घडणार , तोही 'तोच'..
   ही दिवाळी सर्वांकरता एक नवी सुरुवात ठरो , आपापले अहं झडून आपल्याच आत वसलेल्या परमेश्वरी अंशाचा सर्वांना साक्षात्कार होवो. 
रोगाचं, भयाचं , अंधःकाराचं , संशयाचं , सावट दूर होऊन सर्वांच्या आयुष्यात सुवार्ता येवोत, सर्वांना आर्थिक, मानसिक व शारीरिक आरोग्य लाभो.. सर्वांची भरभराट होवोत..
दिवाळी २०२१ च्या मंगलमय शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....