अगत्य
आमच्या कडे स्वयंपाक करणाऱ्या छाया ताईंच्या धाकट्या बहिणीच्या लग्नाला परवा गेले होते. खूप वर्षांनी त्यांच्या घरात शुभ कार्य होणार होतं याचा एकूण आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आपल्याकडे ज्या पद्धतीने लग्न समारंभ होतो त्याची सवय आपल्याला असते. पण छाया ताईंच्या घरच्या कार्याला जाण्याची माझी पहिलीच वेळ. पत्रिका पद्धत त्यांच्यात नसावी मात्र मुहूर्ताची वेळ सांगून मुहूर्ताला नक्की या असं छाया ताईंनी आवर्जून सांगितलं होतं . त्याप्रमाणे मी पोहोचले. गर्दी बघून खरंतर छान वाटत होतं. एरवी गर्दी पासून लांब पळणारी मी पण आज गर्दीत जाऊन बसायला बरं वाटत होतं . हे दोन वर्षांचे निर्बंध संपुष्टात येऊन लोकं एकत्र येतायत, तेही मास्क शिवाय हे खरोखर विशेष आहे. छाया ताईंची मुलगी श्रुती मला तिथे पोचताच प्रथम भेटली, " अय्या, गौरी ताई तुम्ही आलात" ..हे म्हणतानाचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. कदाचित आमच्या पैकी कुणी येणार नाही असं त्यांना वाटलं असावं म्हणून का काय पण तिला झालेला आनंद माझ्यापर्यंत पोहोचला. छाया ताई पलीकडच्या खोलीत आहेत असं कळल्यावर त्यांना शोधत त