क्षणो क्षणी 'क्षणचित्र'....
क्षण चित्रांची दुनिया खरोखरच जादुई आहे.. एखादा क्षण त्या लेन्स ने टिपावा आणि तो चिरकाल तसाच राहावा..आता तर सॉफ्ट कॉपी मुळे , तो डिलीट करे पर्यंत आपल्याजवळ अगदी आहे तसा राहावा याला जादू च म्हणावी लागेल. या सगळ्या माध्यमातून आपल्या आठवणी आपल्या पाशी नक्की राहतात..
पण का कुणास ठाऊक हे असं असल्यामुळे असेल कदाचित पण तो क्षण अनुभवण्याची भावना कमी होत चाललीये असं वाटतं.
लग्न समारंभाचंच उदाहरण घेऊया..भरभरून फोटो काढण्याकडे आज कल आहे..अगदी वधू वर त्यांच्या कक्षांमधून पूजा विधी करण्याकरता बाहेर येतात ते क्षण टिपण्यापासून ते सप्तपदीची प्रत्येक सुपारी पायाने सरकवतानाचे फोटो.. असे सगळे क्षण टिपायचे..त्यातही वधू वर प्रत्येक सुपारी बरोबर नवनवीन पोजस घेऊन फोटो काढताना दिसतात . प्रत्यक्ष काय सुरु आहे..तर सप्तपदी. त्याच्या प्रत्येक पदाला एक एक संकल्प आहे ..गहन अर्थ आहे..एक मनोभूमिका आहे..मात्र क्षण आणि क्षण टिपण्यासाठीच्या अट्टाहास रुपी इच्छेमुळे या इतर महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं . वधू वर एकमेकांमध्ये इतके गुंतलेले असतात कि आलेल्या लोकांमधे सुद्धा त्यांना फारसा रस नसतो..या सगळ्यामध्ये तयार होण्याकरता लागणार वेळ हा वेगळा विषय.
हौस मौज जरूर करावी..अगदी लग्न लागताना तोफेचे बार द्यावे..स्मोक इफेक्ट करावा, फटाक्यांची झाडं उडवावी..अगदी हवा तो थाट करावा. पण विधिवत लग्न सुरु असेल तर ते क्षण अनुभवावे. प्रत्यक्ष जगावे..फोटो काढण्याकडे लक्ष कमी पुरवावं...सगळी सूत्र पूर्वी गुरुजींच्या हातात असायची आता ती फोटोग्राफर च्या हातात दिली जातात आणि गुरुजी adjust करतात अशी परिस्थिती आहे.
आणि महत्वाचं म्हणजे लग्नाकरता आलेल्या लोकांचं स्वागतही अगत्याने करावं. नवरा नवरीने आपापल्या स्नेह्यांच्या ओळखी आपापसात व्यवस्थित करून द्याव्या. तुम्ही लग्नाला आलात काय ..नाही काय..आम्हाला फरक पडत नाही हा attitude नवरा नवरी मिरवताना दिसतात.
सगळं मुलांनी हौसेने स्वतः ठरवून केलं याचं आई वडिलांनी कौतुक करावं..पण प्रत्यक्ष कशाकरता हे सगळं केलं जातंय हे मात्र मुलांना समजवून सांगावं. लग्नामधे फोटो काढले जातात. फोटो काढण्याकरता लग्न करत नाहीत याची जाणीव मुलांना नसेल तर ती करून द्यावी.
याच प्रमाणे, निसर्गरम्य ठिकाणी जाताना सुद्धा बराचसा वेळ हा फोटो काढण्यात जातो.. त्या निसर्गाला श्वासातून आत ओढून घेणं जणू विसरलेलोच असतो आपण. समुद्रकाठी बसून सूर्यास्त उघड्या डोळ्यांनी पाहणं . डोंगर दर्यांच्या इथली शांतता अनुभवणं हा अमूल्य असा अनुभव असतो. मात्र फोटो बघू नंतर असं करता करता आहेत ते क्षण पूर्णपणे जगतोय का याचा आपण विचार करत नाही..
गाण्याच्या मैफिलीतही एखादी सुंदर बंदिश सुरु असते, एखादी अनोखी हरकत कलाकाराला सुचते...त्याच्याकरता प्रेक्षकांना ती हरकत लक्षात येऊन दाद येणं अतिशय महत्वाचं असतं. मात्र फोटो आणि व्हिडीओ करण्याच्या नादात आपल्याकडून या अशा अनेक उपज हरकती, ताना निसटून जातात. आणि असे प्रेक्षकच गाणं रंगलं नाही म्हणायला पुढे येतात.
कुठून आणि कसा एखादा खास क्षण येईल आणि स्पर्श करून जाईल सांगता येत नाही..हे स्पर्श आयुष्यभराकरता आपल्याजवळ आपला अमूल्य ठेवा म्हणून राहतात . अशा वेळी आपली धडपड हवी ती, तो जिवंत क्षण पकडायची..छायाचित्र हे कितीही सुंदर म्हटलं तरी कृत्रिम माध्यम झालं ..ते आपल्याला घडलेला क्षण आठवून द्यायला नक्की मदत करतं . पण असे अनेक जिवंत क्षण प्रत्यक्ष जगण्यात मजा आहे ती या क्षणचित्रात नाही.
माणसामुळे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानाकरता माणूस नाही हा बोध आधी आपण स्वतःला आणि जिथे आवश्यक तिथे इतरांनाही करून देण्याची गरज आहे.
Image source: google
Comments
Post a Comment