विवेकशून्यता

पक्षांसाठी पिण्याचे पाणी बहुतेक जणं ठेवतात..तेव्हा हे त्यांनी नक्की पाहिलं असणार..विशेषत: छोटे पक्षी त्या पाण्यात स्वत:ला बुचकळून आधी अंघोळ करतात आणि नंतर तेच पाणी चोचीने पीऊन उडून जातात. किती साधा सरळ विचार..हे काय दिसतंय..पाणी..याचा उपयोग कशासाठी.. अंघोळ करण्यासाठी आणि पिण्यासाठी.. मग हे पिण्याचं पाणी, यात अंघोळ कशी करणार हे असले प्रश्न पक्षांना कधी पढत नाहीत. माणूस ठरला विकसनशील! सतत विकासाच्या शोधात!..बौद्धिक विकास, आर्थिक विकास, सामाजिक विकास ही अशी माणसाची घोडदौड सुरू राहिली.. मात्र ही सर्व प्रगती होत असताना माणूस त्याच्या मूलभूत नैसर्गिक प्रेरणांपासून दूर जात राहिला आणि स्वत:चा विवेक व वास्तवाचं भान हरवून बसला. हे माझं, हे त्याचं, हा माझा, तो माझा नाही, या जास्तीच्या समजुती तयार झाल्या. नियम, कायदे माणसाने स्वत:च तयार केले, पण या जास्तीच्या 'अकलेमुळे' कायदेही तोच मोडायला लागला..आणि आश्चर्य म्हणजे असं करत असताना त्याला जराही लाज किंवा अपराधीपणाची भावना वाटली नाही, ना कधी पश्चात्ताप झाला. मीही माणूस, ज्याचं मी नुकसान करतो तोही माणूसच हा साधा विवेक तो हरवून बसला.. आणि याही ऊपर जाऊन त्याच्या स्वत:च्या कल्पना विश्वातही तो रमू लागला. त्यामुळेच एखाद्या 'निरपराध माणसाला' मारून आपल्याला 'जन्नत'(स्वर्ग) मिळेल अशा समजुती त्याने करून घेतल्या.. आजच सकाळी एक quote वाचला..हल्ली फक्त स्वत:ला शोधायला वेळ लागतो, बाकी सगळं google करता येतं!..किती खरं आहे, माणूस स्वत:ला विसरलाय, मी कोण, माझे काय विचार, जे मी करतोय ते बरोबर आहे का? हे मूलभूत प्रश्नच त्याला पडत नाहीत..तेच..जास्तीची समज.. त्यामुळे नैसर्गिक समज , जाणिवा व विवेक नष्ट झालाय. एकिकडे माणूस तक्रार करतोय की त्याच्या मनावर खूप ताण आहे. पण हा ताण कोणी वाढवलाय? त्याने स्वत:नेच..याचं कारण स्वत:कडून व इतरांकडून अवाजवी अपेक्षा.. म्हणूनच स्वत: आनंदी रहायचं नाही आणि इतरांनाही राहू द्यायचं नाही. स्वत:ची घाबगुंडी उडालीच आहे . मग हीच भिती इतर माणसांतही पसरवायची. गुन्ह्याच्या व दहशतवादाच्या जन्माचे मूळ इथेच दडलंय! तो फक्त कोणत्या एका जाती-धर्माशी संबंधित नाही..दहशतवाद आपल्यातच, माणसातच आहे..आणि तो आपणंच आपल्यातून काढून टाकू शकतो..फक्त आपला विवेक जागृत करण्याची गरज आहे. 

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....