हरे कृष्ण...

    रविवार सकाळ सगळ्यांसाठी खास नाही का? शाळेत जाणारी मुलं असो किंवा मोठी माणसं..उद्या रविवार हे माहिती असल्यावरंच निम्मा खूश होतो माणुस..हा असा एक दिवस आहे की ज्या दिवशी आपल्यावर घडाळ्याचं वर्चस्व नसतं..
      माझी शाळा कायम सकाळची..त्यामुळे रात्री लौकर झोपा..सकाळी लौकर उठा हेच रोजचं चक्र..असं आसल्यामुळेच मला रविवारी थोडं उशीरा उठण्याची मुभा होती..मात्र तरी ,माझा रविवारचा एक गजर होता..टी.व्ही  वर "कृष्णाssssss" असं ऐकू आलं रे आलं की मी उठायचेच...श्री रामानंद सागर कृत "श्रीकृष्ण" तेव्हा दर रविवारी सकाळी 9 वाजता दूरदर्शन वर लागायची..यात एक श्रीकृष्ण भेटायचा तर त्यानंतर 10 वाजता सुरु होणा-या श्री.बी.आर.चोप्रा यांच्या 'महाभारतात' भेटायचा तोही श्रीकृष्णच..
      बालवयात मनावर गारूड घालणा-या या दोन मालिका आजही तितक्याच प्रभावी ठरतात म्हणजे बघा! पण त्या लहान वयात इतर पात्र किती समजत असतील ठाऊक नाही पण मनात घर करतात ते भगवान श्रीकृष्ण..ते परमेश्वर आहेत..शाश्वत आहेत..तरी ते मनुष्य रूपात अवतरले आहेत. म्हणूनच मनुष्य जन्माच्या मर्यादा बंधनं त्यांनाही पाळावी लागतात हा एक मोठा धडा त्या लहान वयात मिळाला..परमेश्वरही चार चौघांसारखा गावात राहतो..गावातल्या मुलांशी खेळतो..गायी हाकतो..खोड्या करतो तशीच मायाही करतो..देव म्हणून ते स्वत: जरी गोकुळात असले तरी निसर्गच सर्व श्रेष्ठ देव, त्याला पुजा हे सांगायला ते विसरत नाहीत.
      एवढंच नव्हे तर जसं सर्व मुलांना गुरूगृही राहून गुरुंची सेवा करून विद्या ग्रहण करावी लागते तसंच खुद्ध भगवान श्रीकृष्णही गुरु सांदिपनींच्या आश्रमी राहून विद्या ग्रहण करतात. आपल्या मैत्रीची अमूल्य भेट सुदामाला देतात. श्रीकृष्ण मालिकेतील कृष्ण-सुदामा पुनर्भेटीचा भाग मला ठळकपणे आठवतो..हा गरीब ब्राह्मण श्रीकृष्णांचा मित्र असूच शकत नाही असं वाटून सुदामांना दारातूनच परत पाठवलं जातं..मात्र श्रीकृष्णांना हे समजताच ते धावत अनवाणी बाहेर येतात आणि द्वारकेच्या वेशीपाशी जाऊन सुदामांना स्वत: प्रजेदेखत परत घेऊन येतात..त्यांच्या भेटीने सुदामा धन्य धन्य होतात. साक्षात परमेश्वर आपल्याला भेटायला अनवाणी धावत येतात आणि आपल्याला बघून त्यांना आनंददाश्रू आवरत नाहीत हे पाहून सुदामा नि:शब्द होतात. 
      पत्नी सत्यभामेचं गर्वहरणंही मोठ्या गमतीशीर पद्धतीने श्रीकृष्ण करतात आणि परमेश्वर धन, संपत्ती, सौंदर्य नव्हे तर निखळ प्रेम आणि उत्कट भक्तीभावाचा भुकेला आहे हा परमोच्च संदेश या प्रसंगातून मिळतो..
      'महाभारत' पाहताना तर श्रीकृष्णाचे संवाद ऐकावे तितक्यांदा त्याचा नवीन अर्थ समजत जातो..लहान वयात ते समजणं अवघड आहे पण धर्म आणि अधर्म म्हणजे काय..तर दोन teams..पैकी पांडव धर्माच्या..सत्याच्या बाजुने आणि कौरव अधर्माच्या म्हणजेच असत्याच्या..आणि जिथे श्रीकृष्ण तीच योग्य बाजू कारण ते परमेश्वर आहेत हे नक्कीच त्या लहान वयात समजलं..आपला देश मोठा ..आपल्या देशाप्रती,  आपण राहतो त्या समाजाप्रती आपलं कर्तव्य आहे..आपण त्याचं देणं लागतो..त्यासाठी गरज लागली तर सशस्त्र व्हावं लागतं आणि अधर्माची साथ देणा-या आपल्या लोकांविरुद्ध उभं रहावं लागतं.
    बालवयात लीला करणारा कान्हा ते प्रौढ वयात कुरुक्षेत्री अर्जुनाला गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण हा मोठा प्रवास या दोन्ही मालिकांनी तेव्हा लहान वयातच घडवला..भगवान श्रीकृष्णांचा जन्म आणि  अर्जुनाला त्यांनी घडवलेलं विश्वरूप दर्शन हे दोन प्रसंग या दोन्ही मालिकांनी अक्षरश: जीवंत करुन दाखवले आहेत..
    एखादा कलाकार त्या भूमिकेत इतका एकरूप होऊन जातो की लहान वयात काय आत्तासुद्धा हे कलाकार समोर आले की आठवतात त्यांच्या अजरामर भूमिका. सर्वदमन बॅनर्जी आणि नितीश भारद्वाज हे अनुक्रमे श्रीकृष्ण आणि महाभारत मधील कृष्ण आजही मनात घर करून आहेत.
     नृत्याची विद्यार्थिनी असल्यामुळे इतक्या वर्षात श्रीकृष्णाच्या आयुष्यावर निगडित खूप रचना शिकायल्या मिळाल्या..अजूनही शिकायला मिळत आहेत..आणि त्यामुळे हे संधान आपसुकंच राहू शकलं यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते..
     मात्र भाग्यवान आपली संपूर्ण मानवजात आहे..5000 वर्षांपूर्वी भगवानांनी सांगितलेली 'गीता' आज त्यांच्या रुपानेच आपल्यामधे आहे..आणि ती केवळ एक पुस्तक नाही ती आपली 'जीवनशैली' आहे हे समजून घेण्यासाठी त्याचं अध्ययन करणं गरजेचं आहे..
     आज जन्माष्टमी निमित्त या आठणींना उजाळा दिला..

©️ gauripawgi.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....