श्री स्वामी समर्थ..

2019 सालची गोष्ट ..आम्ही दोघांनी अक्कलकोट ला जायचं ठरवलं . एरवीच्या वेळापत्रकात आमच्या एकूण व्यवसायाचं स्वरूप बघता वर्षभरात जमलं नाही म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत जायचं ठरलं . 
आमच्या घरी कशेळीकरांकडे स्वामींवर सगळ्यांची श्रद्धा,  विशेषतः माझ्या आजीची .त्यामुळे माझं नाव अक्कलकोट ला जाऊन ठेवावं अशी आजीची इच्छा होती. महिनाभराची असताना मला अक्कलकोट ला घेऊन जाऊन नाव ठेवलंय असं आई सांगते. 
त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी माझा अक्कलकोट ला जाण्याचा योग 2019 च्या मे महिन्यात आला. भर उकाड्यात जाण्याचा बेत ठरलेला खरा पण प्रत्यक्ष अक्कलकोट ला जाऊन दर्शन घेण्याच्या इच्छेपुढे उकाडा तो कसला.
सकाळी लौकर आवरून आम्ही दोघे, आमच्या चार चाकीतून निघालो. प्रवास एकूण छान सुरु झालेला. सोलापूर रस्त्याला लागलो तशी गाड्यांची रांग लागलेली दिसली. पुढे कुठेतरी तेल सांडल्यामुळे जबरदस्त अपघात झाला होता. एकूणच घडलेला प्रकार लक्षात आला . गाडी हळू हळू , कासव गतीने पुढे ढकलत होतो . या मागे बसण्यात काहीही अर्थ नव्हता हे एकूण लक्षात आलं. ठरल्याप्रमाणे अक्कलकोट ला पोहोचायचं असेल तर इथून बाहेर पडलं पाहिजे. मागे फिरावं लागतं का काय या विचाराने मी अशीही अवसानघात झालेले. एका ठिकाणी त्या रांगेतून बाहेर पडता आलं तशी सचिन ने गाडी वळवली. सरळ सरळ सोलापूर रस्ता न धरता आता आम्हाला सासवड,  बारामती , भिगवण करत अक्कलकोट ला जावं लागणार होतं . ऊन चढायच्या आत अक्कलकोट ला पोहोचण्याचा आमचा मानस फसला होता पण दुसरा रस्ता धरल्यामुळे निदान उशिरा का होईना तिथे पोहोचण्याची खात्री होती. 
सुदैवाने हा रस्ता मोकळा होता. स्वामींना नमस्कार केला ,मनोमन म्हटलं , महाराज,  आज ३० वर्षांनी तुमच्या दर्शनाला येत्ये, सांभाळून घ्या.
थोडं पुढे गेलो आणि अचानक गाडीच्या AC चा गारवा कमी झाल्याचं लक्षात आलं . काहीतरी किरकोळ झालं असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं . थोड्या वेळाने कुलिंग पूर्णतः बंद!....झालं...मे महिन्यात भर उन्हात तिथे जाताना एक मोठा आधार होता. गाडीतला AC.. काही गत्यंतर नव्हतं ..कुठे थांबून तपासून घ्यावं म्हटलं तर आता खरं तर उशीर झालेला. ऊन कधीच चढलेलं. पुन्हा एकदा निर्धाराने पुढे निघालो. स्वामींचे आभारच मानले. ए सी बिघडला असला तरी गाडी बिघडलेली नव्हती. त्यामुळे माघार घ्यायचा प्रश्नच नव्हता. उष्णतेने लालेलाल व्हायला झालेलं. यावर एकच उपाय होता. मधे मधे थांबत, ताक,कोकम सरबत , लिंबू सरबत,  घेत राहणे . थोड्या थोड्या वेळाने थांबून चेहऱ्यावर पाणी मारत अखेर 1.30 च्या सुमारास आम्ही रणरणत्या उन्हात अक्कलकोट ला पोहोचलो. 
मनाचा खेळ म्हणा किंवा अजून काही. एवढ्या 30-31 वर्षांनी अक्कलकोट ला जात होते. स्वामींनी जणू परीक्षा घ्यायची ठरवली होती आम्हा दोघांची . त्यातून जमेल तसा मार्ग काढण्याचं बळ त्यांनीच दिलं . पण याचं सगळं श्रेय सचिन ला. सकाळी गाड्यांच्या त्या रांगेत थांबल्या थांबल्या मी अश्रू गाळायला सुरुवात केलेली. पण सचिन चा निर्धार होता,आज कितीही उशीर झाला तरी आपण अक्कलकोट ला जायचंच. सचिन या आधी अनेकदा अक्कलकोट ला गेला होता , पण एवढ्या वर्षांनी आज माझा जाण्याचा योग आलेला म्हणा किंवा स्वामींनी बोलावलं म्हणा, आज काहीही झालं तरी गेलंच पाहिजे हे तो जाणून होता. उन्हामुळे आणि सतत चे गरम वारे अंगाला चटके देत असल्यामुळे त्याला त्रास होत होता खरा. पण आता स्वामी बघून घेतील यावर त्याचीही तितकीच श्रद्धा.
समाधी स्थळी स्वामींपुढे बसल्यावर मात्र एक प्रकारचा थंडावा जाणवत होता. AC सुरु केल्यावर जसा EFFECT येतो तसा, COOLANTS पसरतायत असा अनुभव. जणू काही स्वामींनी AC सुरु करावा आणि म्हणावं , "माझ्या बाळांनो एवढे उन्हाचे आलात . बसा ..शांत बसा गारव्यात" 
माउली परीक्षाही स्वतः घेते आणि ती पार केल्यावर प्रेमाने कुशीतही घेते. स्वामींच्या कृपेने त्या भर उन्हात चटके खाऊनही आम्हा दोघांना पुढे कुठलाही त्रास झाला नाही. त्यादिवशी सोलापूर ला मुक्काम करायचा होताच, त्यामुळे तिथे AC ची दुरुस्तीही करता आली , पुन्हा पुण्याकडे येताना त्रास झाला नाही कि उकाड्यामुळे तब्बेतीही बिघडल्या नाहीत. 
श्री स्वामी समर्थ.🙏💐
Photo courtesy: instagram

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....