नाळ

  काही वर्षांपूर्वी एक गोष्ट वाचलेली आठवते. एक विवाहित दांपत्य मूल दत्तक घेण्याचा विचार पक्क करतं..समन्वयाने असं ठरतं की आपण तान्ह बाळ दत्तक न घेता थोडं मोठं मूल दत्तक घेऊया..आणि ते वय वर्ष 5/6 असलेली गोड मुलगी दत्तक घेतात..
आधीच्या औपचारिक प्रक्रियेमुळे तिच्याशी ओळख करुन घेणं..तिला वेळ देणं..आम्ही आता तुझे आई बाबा होणार आहोत हे तिला सांगणं असं सगळं व्यवस्थित पार पाडल्यानंतर ते मुलीला घरी घेऊन येतात..मुलीचं नाव 'जुई' असतं..
जुईला आधी वेळ दिल्यामुळे तशी जुई पटकन घर आपलंसं करते. तुला वाटेल तेव्हा आम्हाला आई बाबा अशी हाक मार..तोपर्यंत तुला आवडेल ते म्हण अशी सगळी मोकळीक जुईला मिळते..हळू हळू कळी खुलू लागते..जुईशी भरपूर खेळणं ..भरपूर गप्पा होऊ लागतात..
एकदा जुईची आई छान मोठालं कलिंगड घेऊन येते..जुईलाही कलिंगड आवडतं हे आईला ठाऊक नसतं..कलिंगड बघताच जुई आनंदाने मोठ्यांदा ओरडते. 'अय्या!! कलिंगड !! '.. तसं आईला आश्चर्य वाटतं ..तशी शांत असणारी जुई आज एकदम इतकी मोकळी कशी झाली! आई म्हणते ," वा वा! आमच्या जुई बाईंना कलिंगड एवढं आवडतं माहितीच नव्हतं..जुई म्हणते," हो खूsssssप आवडतं..मला सांगू काय वाटतं..कलिंगडाच्या आत जाऊन बसावं आणि ते संपवूनच बाहेर यावं!
हे ऐकताच आईच्या डोळ्यात आनंदाश्रु येतात..जुई गडबडते..तशी आई तिला मिठीत घेते आणि म्हणते..अगं बाळा! तुला माहिते का? मी लहान असताना मलाही कलिंगड बघून असंच वाटायचं गं..हेच शब्द..जुई,आज मी खरोखर तुझी आई झाले गं..हे ऐकताच जुई तिला पहिल्यांदा 'आई' म्हणून घट्ट बिलगते..!
ही कथा वाचली त्यादिवशी सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी होतं आणि आज लिहिताना सुद्धा पाणी आलं..
नाळ काय फक्त जन्मदात्या आई आणि बाळालाच जोडते का? ही कथा वाचून तर 'नाळे'चा एक वेगळा अर्थ उमगतो..'नाळ' शोधू तिथे सापडू शकते..
कधी कधी सहजच एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते..आपण म्हणतो आमची wave length जुळते..आणि आपल्या कळत नकळत ही व्यक्ती आपल्या आयुष्यावर इतका सकारात्मक परिणाम करुन जाते की वाटतं आपलं खूप जुनं नातं असणार फक्त आपली भेट तेवढी व्हायची बाकी होती..इथे आपल्यात एक अदृश्य नाळ नाही का तयार होत?..
तर कधी कधी एखादी आयुष्यात आधीपासून असलेली व्यक्ती आपल्याला नव्याने समजते तेव्हाही हीच नाळ आपल्याला सापडते..
नवे मित्र/मैत्रिणी..नात्यातली मंडळी..आपल्याकडे घरकाम करणारी मंडळी..कार्यालयात भेटणारी मंडळी..हे जग मोठं आहे खरं पण 'नाळ' जुळण्याची वेळ येते तेव्हा आपण वावरत असलेल्या रोजच्या जगातच ती सापडते..कधी कुठे आणि कशी ती नाळ जुळेल हे सांगता येत नाही .पण तेच तर pleasant surprise असतं..आणि इतकं pleasant की आपलं रोजचं जगणंही अगदी सहज सुखवून जातं..ताण तणाव चिंता कुणाला चुकल्या नाहीत..पण अशी कुणाशी नाळ जुळलली असेल तर या ताण तणावांना रोजची गाळणी लागते..अशा व्यक्तीकडून आलेला hi चा एक छोटासा मेसेज ते त्याच्या बरोबच्या गप्पा या सगळ्याच आपल्या जगण्याला बळ देतात..
जशी आपल्याला ही नाळ जुळायला हवी असते तसच, कुणीतरी आपलाही शोध घेत असतं हे लक्षात असुद्या..!मंडळी आजच्या तणावाच्या परिस्थितीत ही 'नाळ' शोधण्याचा प्रयत्न करुया.
(Image: google)

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....