शरण भाव

 प्रेम...निखळ प्रेम..शब्द..कृती..सगळ्याच्या पलिकडे नेऊन पोहोचवणारी भावना..केवळ त्या एका भावनेच्या असण्याने काय होऊ शकतं याचा प्रत्यय येतो तेव्हा 'निसर्ग' देवतेपुढे नतमस्तक व्हायला होतं..
   अलिकडे facebook वरती एक video पाहिला  ज्यात या कुटुंबाने एका magpie जातीच्या पक्षाला अगदी तान्हं असताना वाचवलं..याच कुटुंबाकडे pittbull जातीची पाळीव कुत्री सुद्धा आहे हे विषेश..
   पक्षाच्या पिल्लाला घरी आणल्यानंतर सावरायला तसा कमी वेळ लागला..कुत्रीची आणि पक्षाची गट्टी जमली नव्हती पण ती दोघं एकमेकांना त्रासही देत नसत..दिवस पुढे सरकले तशी या दोघांची एकमेकांना सवय होऊ लागली. दोघं एकमेकांजवळ जाऊ लागली. स्पर्श करू लागली. एकमेका सोबत खेळूही लागली. विशेष म्हणजे कुत्री, त्या पक्षाला स्वत:च्या पिल्लाप्रमाणे जपू लागली. पक्षी जिथे म्हणून घरात किंवा बाहेर वावरत तिथे कुत्री त्याची पाठराखीण म्हणून जाऊ लागली. पक्षालाही ही आपलीच आई आहे असं वाटू लागलं.
   असं करता करता कुत्रीला दूध येऊ लागलं आहे हे घरातल्यांच्या लक्षात आलं. त्यांना अर्थातच शंका आली की कुत्री गरोदर राहिली असू शकते. पण चाचण्यांनंतर असं समजलं की कुत्री गरोदर नाही. तिने पक्षावर स्वत:च्या पिल्लाप्रमाणे जीव लावल्यामुळे निसर्गत:च तिच्यात दूध निर्माण झालं. याला phantom pregnancy असं म्हणतात. प्राण्यांमधे वात्सल्य भाव जागृत झाल्यावर दूध येणं हे अगदी नैसर्गिक समजलं जातं..कुत्रीला गरोदर नसताना दूध येण्याचं जितकं आश्चर्य वाटलं असेल याहूनही आश्चर्य या गोष्टीचं की पक्षी सुद्धा चोचीने जमेल तसं दूध पिऊ लागला. त्याला या गोष्टीचा विसर पडला की आपण वेगळ्या जातीचे जीव आहोत. एक चार पायी प्राणी आणि एक लहानसा पक्षी यांच्यात आई आणि बाळाचं नातं त्यांच्या नकळत निर्माण झालं.
    'जीव' ही एकच संज्ञा या दोघांना लागू पडते..कुत्रा, पक्षी, कीटक इ. आपण कोण आहोत? कुठल्या जातीचे आहोत, समोरच्या 'जीवा'वर माझी माया जडायला तो माझ्यासारखा आहे का? हे सगळं कुठे कळतं या जीवांना? मी एक जीव तसा माझ्या समोरचा सुद्धा जीवच..या उदाहरणात त्या पक्षाला गरज होती मायेच्या उबेची..जी या कुत्रीला जाणवली आणि त्या क्षणापासून तिने पक्षावर स्वतःच्या बाळाप्रमाणे माया करायला सुरुवात केली.
    नेमकी त्या वेळची समोरच्याची गरज काय हे किती वेळा जाणून घेतो आपण? फार क्वचित किंवा कधीही नाही. त्या 'भावाला' शरण जाणं निसर्गाकडून आपल्याकडे आपोआप आलेलं आहे. मला वाटतं तेच या वरील घटनेवरुन लक्षात येतं. त्या जीवामधे एक भावना जागृत झाली..'प्रेम' मिळवण्याची..ती दुस-या जीवाने जाणली..आणि बाकी सगळं निसर्गत:च घडलं.
    समोरच्या जीवाची नेमकी गरज काय हे प्राणी-पक्षी ओळखतात..कारण त्यांना 'शरण' जाता येतं..आपण माणसं जन्मत:च आडमुठी...अहंकारी..कुणी आपल्यापाशी साधं व्यक्त होऊ इच्छित असतं..त्याचं म्हणणं ऐकून घेण्याच्याही गरजेला आपण शरण जात नाही..आणि आपलं घोडं दामटवत त्याला फुकट सल्ले तरी देतो किंवा उपदेश तरी..आणि सर्वात आवडतं काम..त्या गरजवंताला त्याची चूक दाखवून देणं..इथे ,शरणागती म्हणजे स्वत: हार पत्करणं नव्हे..तर समोरच्याला हारु न देता पुन्हा भरारी घ्यायचं बळ देणं .
   या तत्वाप्रमाणे वागतात, ते हे जीव..प्राणी आणि पक्षी..एकदा का 'शरण' जायचं ठरवलं की मग समोर पक्षी असो प्राणी असो किंवा माणुस त्याला हे आपलंसं करतातच..आणि इतकं आपलंसं करतात की एका पक्षाच्या पिल्लाला स्वतःचं बाळ समजून दूध पाजायला यांना निसर्ग मदत करतो.
   गेल्या वर्षभरापासून एक कठीण काळ आपण अनुभवत आहोत..त्यातून आपल्याला जसं स्वत:ला बाहेर आणायचंय तसं इतरांना सुद्धा. ताण-तणाव- नैराश्याला सामोरी गेलेली मंडळी आपल्या आजूबाजुला आहेत. त्यांच्या गरजा ओळखून जो भाव निसर्गत: आपल्यात निर्माण होतो, त्याला 'शरण' जायची किमान इच्छा आपण नक्की दाखवू शकतो. अशावेळी त्यांना फुकट सल्ले, उपदेशाचे डोस न पाजता , त्यांची चूक दाखवून देणं हे न करता त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हेच योग्य ठरेल..नाही का?
   वरील video ची link देत आहे..
(इमेज कर्टसी : गूगल)
   https://www.facebook.com/watch/?v=916030039232000
  
   

 

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....