Good News

   'धीरज आणि स्नेहा...एक सुखी दांपत्य..आपापल्या व्यवसायातही स्थिरावलेले..एक मेकांवर निस्सीम प्रेम आणि विश्वास असलेले..एका सुखवस्तु एकत्र कुटुंबात राहत..धीरज आणि स्नेहाचा प्रेम विवाह..कॉलेज पासून ची comittment..एकूण 16 वर्षांची ओळख..लग्नाला 7 वर्ष झाली होती'
   मात्र आपल्या typical भारतीय विचारसरणीचा शिकार हे दोघं ब-याचदा होत होते.. 7 वर्ष झाली..no good news." ना तब्येतीची तक्रार, ना इतर काही अडचण.. त्यामुळे त्या गोष्टीचा त्रास करुन घेण्यासारखं काही नाही, घडायच्या असतात तेव्हा आपोआप गोष्टी घडतात हे दोघांनाही समजत होतं. एकदा मात्र स्नेहा हळवी झाल्यावर धीरजने तिची इतकी छान समजूत काढली की त्यानंतर स्नेहा अंतर बाह्य मोकळी झाली. धीरज म्हणाला," आपण एकमेकांशी लग्न केलं एकमेकांसाठी..लग्न केलं तेव्हा आला का गं विचार? आपल्याला मुलं होणार का? कधी होणार? आणि नाही झाली तर काय करायचं? मग आत्ताच हे प्रश्न का पडावे? आपण अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहोत हाच आपल्या नात्यातला strong point..मी तुझ्यासोबत प्रचंड खूश आणि समाधानी आहे..आपण एकमेकासोबत आहोत..बास..आपल्या आयुष्यात कशाचीही उणीव नाही."
    किती सुंदर नातं असतं पती-पत्नीचं..रक्ताचं नातं नसतंच खरं..केवळ विश्वासाच्या मजबूत पायावर उभं राहतं..आणि प्रेमाने बहरत जातं..मात्र आपल्या भारतीय दृष्टीकोनात त्याला अपूर्ण मानलं गेलंय कदाचित..लग्न होऊन अमुक एक वर्ष झाली आणि पाळणा हलला नाही की खूप मोठा अपराध घडल्यासारखं आपल्याकडे पाहिलं जातं..
      हा खरंतर त्या दांपत्याचा खाजगी आणि नाजुक विषय असतो..पण घरच्यांपासून बाहेरच्यांपर्यंत सगळेच, हा विषय उघडपणे बोलायचा आपल्याला अधिकार आहे असं समजतात..घरच्यांना काळजी असते मान्य..आम्ही समजू शकतो..पण आपण अजून आजी आजोबा झालो नाही हे सलत असल्यामुळे मुलांच्या मनाचा जराही विचार न करता 'तुम्ही अजून आई-बाप झाला नाहीत, तुम्ही आम्हाला काय सांगताय' हे अत्यंत असंवेदनशीलपणे कधीतरी ऐकवलं जातं. तुम्ही आई बाप झालात की माणसाची किंमत कळेल अशी परस्पर विषयांची 'भेळ' केली जाते.
      का कुणास ठाऊक पण या पीढीचा असा समज असतो की आमच्या पीढीला अक्कल तेव्हाच येणार जेव्हा आम्ही आई बाप होऊ..अन्यथा आम्हाला  अत्यंत असंवेदनशील, महामूर्ख आणि बेजबाबदार ठरवलं जातं. 'आम्ही लोकं उभे आहोत तोपर्यंत chance घ्या' हे वाक्य तर stay home stay safe पेक्षाही गुळगुळीत झालंय..त्या वाक्याचा मतितार्थ असा होतो का, की आमची मदत हवी असेल तर ती आत्ताच मिळणार..यातून आपला स्वार्थ डोकावतोय का? याचा विचार या ज्येष्ठ पीढीने करायची गरज आहे.
      एखाद्या दांपत्याने मूल कधी जन्माला घालायचं, घालायचं का नाही किंवा या बद्दल बोलायचं का नाही का मूल दत्तक घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. लग्न करुन मूल जन्माला घातल्याने कुणी परिपूर्ण होत नाही किंवा मूल नाही झालं म्हणून कुणी अपूर्ण राहत नाही.
      माणुस हा जन्मत:च परिपूर्ण आहे. निसर्गाने त्याला तसंच घडवलं आहे..वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर होत जाणारे संस्कार हे त्याचे विचार आणि अनुभव व्यापक करत असतात..मात्र अमुक एक संस्कार झाला नाही म्हणून तो अपूर्ण कधीही राहणार नाही. ज्याने त्याने आपल्याला काय हवं याचा विचार करुन निर्णय घ्यायचे असतात. आधी लग्नाची सक्ती करणं, मग मूल जन्माला घालायचा ताण निर्माण करणं..ते अमुक एक वयातच व्हावं या गोष्टीचा अट्टाहास धरण्याचा कुणालाही अधिकार नाही! ना आई वडिलांना..ना सासू-सास-यांना, ना नातेवाईकांना ना जगात अजून कुणाला. 
      आपली मुलं या क्षणी आनंदात आहेत हेच यांच्या करता महत्वाचं असलं पाहिजे. घरात होणा-या कुठल्याही वादावादीच्या मूळाशी 'तुम्ही अजून आई बाप झाल नाहीत, त्यामुळे तुम्ही आम्हाला समजून घेऊ शकत नाही' हे कारण सांगून आमच्या पीढीचं केवळ मानसिक खच्चिकरणच होऊ शकतं. त्यातून नवनिर्मिती नक्कीच होणार नाही. स्वत:च्या अपेक्षांचं ओझं लादत, इतरांना नातवंड झाली म्हणून आम्हालाही हवीच या अट्टाहासापोटी आमचा ताण वाढवून ही ज्येष्ठ पीढी त्यांची संकुचित दृष्टी आणि असंवेदनशीलताच सिद्ध करत आहे. 
    आज आमची पीढी दांपत्यजीवनाकडे ज्या दृष्टीकोनातून पाहते त्यापेक्षा नक्कीच वेगळ्या दृष्टीकोनातून पुढची पीढी त्याकडे बघणार आहे. तेव्हा कुठल्याही पीढीने, आपण आपल्या मतांचं ओझं पुढच्या पीढीच्या खांद्यावर ठेवतोय का याचा विचार करावा..पुढची पीढी म्हणजे आपली मत लादण्यासाठी 'हक्काची गाढवं' नाहीत हे लक्षात घ्यावे.
      आणि राहिला प्रश्न good news देण्याचा तर, सिनेमात कितीही दाखवलं तरी 'निरंजन बाबांचा आंबा' खाऊन कुणाला मूल होत नाही..या साठी योग्य वेळ आणि नशीब, दोन्ही ची सोबत लागते.. 'आई बाप होणार' या व्यतिरिक्त जगात अनेक good news आहेत ज्या आमच्या पीढी करता तितक्याच महत्वाच्या आहेत.. तेव्हा झापडं न लावता, आमच्या good news मधे समाधान मानायलाही या ज्येष्ठ पीढीने शिकायची गरज आहे.
      
- गौरी सचिन पावगी

Image source: google

(इथे मांडलेली मतं वैयक्तिक आहेत. सगळीकडे परिस्थिती आणि विचार वेगवेगळे असतात..तरी, लेख forward किंवा share करायचा असल्यास, नावासहित share करायला हरकत नाही.)

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....