मोठेपण..

कलाकाराला मोठेपण मिळण्याकरता तपश्चर्या करावी लागते..ते सहज साध्य नाही..मोठेपण मिळण्याकरता मात्र आयुष्यात अनेक ठिकाणी स्वतःच स्वतःला लहान होताना कलाकार पाहत असतो. कधी स्वतःच्या नजरेत कधी इतरांच्या. काहीजण त्याला सतत लहानपण देऊ पाहत असतात .अशावेळी कलाकाराची खरी परीक्षा असते . जग त्याला कितीही लहान करो, त्याने स्वतःच्या नजरेतून स्वतःला लहान करता काम नये. या अग्निदिव्यातून तालून सुलाखून जो निघतो आणि तरीही स्वतः लहान राहून कला मोठी करतो ,त्याच कलाकाराला मोठेपण मिळतं ..
आज 'मी वसंतराव पाहताना हे सतत जाणवत होतं. जिथे सच्चे स्वर सापडतील ते संगीत आणि अशा सच्चा स्वरांचा शोध घेत असलेला एक ' अद्वितीय' कलाकार आपल्याला लाभला ते म्हणजे 'वसंतराव देशपांडे'. चाकोरीबद्ध गायकीत स्वतःला बंदिस्त न केल्यामुळेच कदाचित 'स्वर' त्यांना शोधत आले असावे. 'सा' लागला कि साक्षात परमेश्वर येऊन समोर उभा राहतो, त्याला शोधत मंदिरात जावं लागत नाही, हे मास्टर दीनानाथांच्या मुखी आलेलं चित्रपटातलं वाक्य अगदी खरं आहे. मात्र त्या परमेश्वरालाच मुक्तपणे प्रकट व्हायची इच्छा झाली असावी आणि वसंतरावांच्या रूपाने त्याने 'स्वरावतार' घेतला असावा असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
या सगळ्या प्रवासात पु लं सारखा , कला गुणांची कदर करणारा सखा भेटणं म्हणजे दुग्धशर्करायोग. संगीत हे वसंतरावांचा आत्मा होतं आणि याचीच आठवण पुलंनी त्यांना सतत करून दिली ,इथे पुलं स्वतः मोठे झाले व वसंतरावांनाही मोठं करून गेले.
एक निरागस संगीतप्रेमी लहान मुलगा, सतत गुरूंपासून बाह्य परिस्थितीमुळे दुरावत गेलेला एक मनस्वी तरुण गायक , कुटुंब चालवण्याकरता इमाने इतबारे गायकी बाजूला ठेवून गायकाचा झालेला कारकून, हे सगळं पाहता वसंतरावांच आयुष्य एखाद्या वरखाली होणाऱ्या ईसीजी सारखं भासतं. असं जरी असलं तरी संगीताशी त्यांनी राखलेलं 'अनुसंधान' जाणवतं , तुकोबांनी जसं 'पांडुरंग पांडुरंग' मुखाने आळवावं तसंच वसंतरावांनी सतत तो 'सा' हा आपल्या श्वासातून जिवंत ठेवला.
एक सच्चा कलाकार कायम त्या एका सुवर्णसंधीचा शोधात असतो जी त्याला या सगळ्या संघर्षापलीकडे घेऊन जाणार असते. पुरुषोत्तम दारव्हेकर अशीच एक सुवर्णसंधी वसंतरावांसमोर घेऊन आले. 'कट्यार काळजात घुसली' आणि खानसाहेब. त्यानंतर हे नाटकातलं काल्पनिक पात्र मात्र उरलं नाही . आपल्यात जसे आजही वसंतराव आहेत तसे खानसाहेबही जिवंत आहेत. आणि म्हणूनच का काय तेच खानसाहेब वसंतरावांशी रुबरु व्हायला येतात आणि त्यांचा जीवनपट उलगडत जातो हि दिग्दर्शकाची कल्पना फारच अप्रतिम आहे.
कलाकार हा दुहेरी मनस्थिती घेऊन जगतो असं सर्वांना वाटत असतं खरं . पण खरंतर तो आणि त्याची कला हे एवढं म्हणजेच त्याचं आयुष्य असतं. त्याने स्वतः हे ओळखणं जितकं महत्वाचं तितकंच त्याच्या आयुष्यातील लोकांनाही ते समजून घेणं महत्वाचं आहे हा एक लाख मोलाचा संदेश दिग्दर्शकाने दिला आहे. कलाकाराला ना कुणी बंदिस्त करू शकतं ना कुणी ठरवून त्याच्या चौकटीत शिरू शकतं .
आपल्याला जे ऐकवायचं आहे ते लोकांनी नापसंत करणं , या दारिद्र्याच्या रेषा ओलांडून आपलीच गायकी लोकांनी ऐकणं आणि एवढंच नव्हे तर त्याला दाद म्हणून मैफिलीच्या शेवटी प्रेक्षकांनी स्तब्ध होणं ...हे शिवधनुष्य पेलून एक कलाकार जेव्हा पर्वतासारखा उभा राहतो तेव्हाच त्याला मोठेपण मिळतं .
लहानपण ते मोठेपण...ही वसंतराव देशपांडेची जीवनगाथा सर्व कलाकारांनी आवर्जून पहावी.

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....