निरागस हट्ट....(लघू कथा)
१९९३ सालची गोष्ट...सरस्वती विद्यामंदिर शाळेत राजू दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. राजुचं संपूर्ण नाव प्रल्हाद राजेंद्र गोडबोले. नावामागची कथा अशी कि प्रल्हादच्या आजीने (आई ची आई) तिच्या लहानपणी म्हणे शाळेच्या नाटकात भक्त प्रल्हादाची भूमिका केलेली. तेव्हापासून त्या इतक्या भारावून गेलेल्या कि आपल्याला धाकट्या भावाचं नाव प्रल्हाद ठेवायचं असं त्यांनी ठरवलं होतं . पण तिला झाली धाकटी बहिण, त्यामुळे मग आपल्या मुलाचं नाव तरी प्रल्हाद ठेवूया अशी इच्छा होती .पण त्यांनाही दोघी मुलीच , त्यामुळे मोठ्या मुलीला जर का पहिला मुलगा झाला तर त्याचं नाव प्रल्हाद ठेवायचं असं म्हणे तिने सांगून ठेवलेलं.
तर असा हा त्रेता युगातला प्रल्हाद कलियुगात आला तो गोडबोलेंच्या घरी. पण होता होता प्रल्हाद चा राजू झाला आणि सगळे त्याला लाडाच्या नावाने हाक मारू लागले. विष्णुभक्त नसला तरी हा प्रल्हाद प्राणी भक्त होता. हर तऱ्हेचे, हर जातीचे प्राणी त्याला आवडायचे. छोटे मोठे किडे , पाली , फुलपाखरं , सगळं त्याला खूप आवडायचं . त्यांच्याकडे बघत बसणं , त्यांच्या हालचालींचा निरीक्षण करणं . कधी पालीसारखं उलटं चालून बघणं , कधी आपल्याला उडता येतंय का बघणं, या सगळ्याबद्दल त्याला प्रचंड कुतूहल होतं. राजू ने शाळेतून येताना कितीतरी कुत्र्याची पिल्लं घरी आणलेली, पण त्याच्या आई बाबांनी ती पाळू दिली नाहीत. दोघे नोकरी करणारे, राजू लहान , आजी आजोबांची वाढती वयं लक्षात घेता कुत्रा पाळणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं. राजू मात्र निराश व्हायचा. त्याने ठरवलेलं, आपण मोठे झालो कि आपल्याला आवडत असलेले जगातले सगळे प्राणी आपल्या घरी आणायचे.
राजुच्या शाळेचं ग्राउंड भलं मोठं होतं . भोंडल्याचे दिवस होते आणि राजुच्या शाळेने एक भला मोठा हत्ती त्यासाठी बोलावलेला. हे समजताच राजूच्या आनंदाला पारावार उरला नाही. कधी एकदा तो दिवस येतो आणि मी त्या हत्तीला जवळून बघतो असं त्याला झालेलं. त्यादिवशी आईने हाक मारायच्या अगोदर राजू उठून तयार झाला. आजोबांपाशी हट्ट धरून वेळेच्या जवळपास अर्धा तास आधी जाऊन शाळेत बसला. शाळेच्या फाटकातून आत येताना हत्तीला त्याला पाहायचं होत. त्याचा चालतानाचा डौल, त्याचे ते हलणारे सुपासारखे कान , त्याची ती वर खाली होणारी सोंड अगदी डोळेभरून त्याने ते दृश्य बघितलं .भोंडला ठरल्याप्रमाणे पार पडला.
तरी राजूचं समाधान काही होईना. 'मला हत्तीवर बसायचंय', असा हट्ट तो करायला लागला. शिक्षक, त्याचे मित्र, सगळे त्याची समजूत काढू लागले, " अरे नको बसूस, पडलास म्हणजे" पण राजू हट्टाला पेटलेला. तो स्वतः माहुतापाशी गेला आणि म्हणाला," काका, मला बसूद्या कि हत्तीवर." माहूत काका म्हणाले," अरे कसा बसणार तू ,मी शिडी नाही आणली बाळा त्यावर चढायला ",..शिडी नाही तर नाही , तुमच्या हत्तीला सांगा खाली बसायला, मी चढतो बरोबर. " त्याचा आत्मविश्वास बघून माहूत काकांना हसू आलं . ते म्हणाले, " अरे बाळा, हत्ती खाली बसला तरी तुझी उंची कमी पडणार" पण एक ना दोन , राजुला आज हत्तीवर स्वार व्हायचंच होतं ..मग माहूत काकांना एक युक्ती सुचली , ते म्हणाले ," बरं मग असं करूया, तू हत्तीजवळ ये , तो तुला सोंडेत पकडेल आणि पाठीवर बसवेल, बघ हां! घाबरायचं नाही " आता काय, राजुचा आनंद गगनात मावेना, तो अगदी लगेच तयार झाला. एवढ्या जवळून हत्तीला बघायची राजूची पहिलीच वेळ, त्यात हत्तीच्या सोंडेत लोंबकळायला मिळणं हा त्याच्याकरता मणिकांचन योग होता. राजू धावतच हत्ती जवळ गेला. हत्तीने त्याला अलगद सोंडेत गुंडाळून स्वतःच्या पाठीवर बसवलं. या 'सुंदर' नावाच्या हत्तीने शाळेच्या ग्राऊंडवर राजूला एक मोठी फेरी मारून आणली. पुन्हा त्याच पद्धतीने त्याने राजुला सोंडेत पकडून खालीसुद्धा उतरवलं.
ही सगळी गंमत राजुचे आजोबा लांब उभे राहून बघत होते .आपल्या नातवाचा निरागस हट्ट पाहून आनंदाने त्यांचे डोळे पाणावले. आजोबा दिसताच राजू धावत जाऊन त्यांना बिलगला. माहुताला आजोबांनी १० रुपये बक्षीस देऊ केलं .
घरी चालत येताना राजू घडलेलं सगळं आजोबांना सांगत होता. सांगता सांगता राजुने एक सिक्सर मारला. आजोबांना विचारलं," आजोबा आपण एक हत्ती पाळूया का? माझ्या पुढल्या वाढदिवसाला तुम्ही मला एक हत्तीचं पिल्लू भेट म्हणून द्याल ना?"
आपल्या नातवाचा हा हट्ट कसा काय बरं पुरवायचा या विचाराने आजोबा गोंधळले, राजू मात्र , आपल्याला आजोबा हत्ती नक्की देणार या आनंदात उड्या मारत घरची वाट चालू लागला.
त्याक्षणी पृथ्वीतलावरचे हे दोन लोभसवाणे चेहरे असावे. एकीकडे, आपल्याला हत्ती मिळणार या आनंदाने खुलून गेलेला राजुचा चेहरा तर दुसरीकडे ,नातवाचा एक हट्ट पुरा झाल्यानंतर पुढचा डोंगरा एवढा हट्ट कसा पुरावायचा या विचारात गुंतलेला आजोबांचा चेहरा.
Image courtesy: google
Comments
Post a Comment