क्षण

     खूप महिन्यांनी आखेर व्यायामशाळा उघडली...इतक्या महिन्यांची व्यायामाची विस्कटलेली घडी पुन्हा बसायला सुरुवात झाली..सकाळचं वेळापत्रक मार्गी लागलं तसं, त्या वेळी भेटणारी माणसंही पुन्हा दिसायला लागली..व्यायाम शाळेत येणा-यांशी जशी आपली ओळख होते, तसेच सकाळी आसपास फिरायला येणारे चेहरे सुद्धा ओळखीचे होतात..पार्क केलेली गाडी काढताना नावाने ओळख होत नसली तरी smile मुळे नक्की होत असते..रोजची smile हाच संवाद असतो..हां, सद्ध्या त्या करंट्या मास्कने माणसाचं स्मित मोकळेपणाने समोरच्या पर्यंत पोहोचवण्याची इच्छाच मारून टाकली आहे तो भाग निराळा..त्या मेल्या कोरोना बरोबर हा चिकटलेला मास्कही जळून भस्म होवोत अशीच प्रार्थना केली पाहिजे..
अशाच एका आजोबांशी माझी 'स्मित ओळख'...मध्य्म उंचीचे..साधारण 80 वय असलेले, हातात काठी आणि लोकरीची माकड टोपी घातलेले, अंगावर शर्ट पँट पण जरा मळलेले..त्यावरून त्यांची परिस्थिती फारशी बरी नसावी हे जाणवतं..
हे आजोबा मला नेहमी gym वरून निघालं की फिरताना दिसतात..ब-याचदा माझी निघायची आणि त्यांची तिथे फिरायला यायची एकच वेळ..
एकदा मी माझी गाडी काढून निघत असताना आजोबा आपणहून माझ्याशी बोलायला आले..gym च्या जवळंच स्वामी समर्थांचं मंदीर आहे..बहुदा आजोबा सकाळी फिरायला निघाले असता दर्शन घेऊन आले असावे..मला म्हणाले " आज मला देवीने दर्शन दिलं..आणि हे पैसे पण दिले..अशी समोर एकदम उभी राहिली ती" आजोबा अचानक बोलायला आले त्यामुळे ते नेमकं काय सांगतायत हे समजेपर्यंत वेळ गेला..हे मलाच का सांगतायत असं वाटलं खरं, पण त्यांचं पूर्ण ऐकून मीही त्यांना म्हणाले", वा आजोबा, भाग्यवान तुम्ही"....हे ऐकून ते गोड हसले आणि निघाले..
मार्च महिन्यापासून बंद पडलेलं gym या महिन्यापासून सुरु झालं आणि पुन्हा एवढ्या महिन्यांनी हेच आजोबा मला भेटले..मी निघत असताना बोलायला आले..मला म्हणाले " 10 रुपये हवे होते'...हे आजोबा एकूणच खूप हळू आवाजात बोलत असल्यामुळे कशाकरता हवेत हे मला नीट समजलं नाही.. gym ला येताना मी पैसे जवळ बाळगत नाही..मी म्हटलं" आजोबा लगेच दिले असते ओ मी काढून..पण पैशांचं पाकीट नाही ओ माझ्याजवळ..".
काहीसे निराश होवून ते निघाले..
अनोळखी माणसाला असेही पैसे देताना आपण विचार करतो तसा मीही केलाच..पुढे काहीवेळ आजोबांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत होते...माझ्या प्रमाणे ओळखीच्या इतर काही लोकांकडे सुद्धा ते 10 रुपये मागत होते..
मग वाटलं..असे किती पैसे मागतायत ते..10 रुपये..जवळ असते तर नक्कीच देता आले असते..पण आपल्याला gpay करता येईल ही माझी tube पेटायलाही वेळ लागला..मी धावत जाऊन आजोबांना गाठलं..म्हटलं आजोबा तुम्हाला चहा पाहिजे का? ते हो म्हणाले..या म्हटलं चहा देते मी..तिथेच पान आणि चहाची टपरी असल्यामुळे gpay करुन मी लगेच त्यांना चहा दिला आणि निघाले.
आजोबा यापूर्वी माझ्याशी बोलायला आले असताही मी त्यांचं ऐकून घेतलं..त्यांना प्रतिसाद दिला..याहीवेळी मी त्यांना चहा प्यायची इच्छा झाली असता चहा घेऊन दिला..
त्यादिवशी आजोबांना कुणाशीतरी share व्हावसं वाटलं.. बोलावंसं वाटलंं..आज त्यांना चहा प्यावासा वाटला..हे दोन्ही घडावं म्हणून मी निमित्तमात्र ठरले एवढंच..त्या प्रसंगी आजोबांना हवा असलेला प्रतिसाद त्यांना मिळाला...
खूप काही विषेश घडलं नाही मात्र एक छोटा आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न मी करू शकले याचं मला खूप समाधान वाटलं..
या आजोबांसारख्या ब-याच वयो वृद्ध मंडळींना घरुन हा प्रतिसाद मिळतोच असं नाही..याच क्षणांच्या शोधात ही मंडळी बाहेर पडत असावीत..त्यातल्या एकाला मी स्पर्श करू शकले. छान वाटलं..
या सारख्या अनेक क्षणांचे साक्षीदार आपण रोज होत असतो..पण त्याला आपल्या ओलाव्याचा स्पर्श करण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे का याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे.

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....