माझी 'अद्भुत' चित्रकला

 शीर्षक वाचून वाटेल आज आपला चित्रकलेचा तास दिसतोय...छे ओ!... चित्रकलेचा आणि माझा सुतराम संबंध नाही.. आणि हे वाचून आश्चर्य वाटण्यासारखं काहिही नाही..मी भरतनाट्यम नृत्यांगना किंवा नृत्य शिक्षिका आहे म्हणून मला चित्रकलाही येते असं असण्याचं अजिबात कारण नाही..
खरं तर काही वर्षांपूर्वीपर्यंत, म्हणजे जो पर्यंत सक्तीने चित्र काढावी लागत असंत तोपर्यंत तर चित्रकला हा माझा अत्यंत नावडता विषय होता..सक्ती म्हणजे शाळेत असतानाचा काळ ओ! गणित जितका माझा हाडवैर असलेला विषय त्याहून थोडं कमी वैर माझं चित्रकलेशी होतं..'मांसवैर' म्हणता येईल...हो..कारण गणिताचं वैर माझ्या हाडांपर्यंत जाऊन रुतत असे (अजूनही रुततं) तिथे चित्रकलेचं वैर हे मांसापर्यंतच जात असे..असं का याचं सर्वात मोठं कारण हे की मला चित्र काढता नाही आलं तरी माझी all rounder आई ते काढत असे..आणि तुला चित्र कसं गं येत नाही काढता? अशा शिव्या मला खाव्या लागत नसत..जे गणिताबाबत नव्हतं..अहो कौलारु घर काढायचं म्हटलं तरी मला फुटपट्टी लागायची हे पाहिल्यावर खरं तर कूणीही कपाळावर हात मारुन घेईल..या सगळ्यामुळे का काय माझी चित्रकलेची वही ब-याचदा आईच, चित्र काढून रंगवून पूर्ण करत असे..या बळावर एकदा मला वर्गात 100 पैकी 93 गूण वगैरे तिने मिळवून दिलेले..
तर हे वैर निर्माण होण्याचं कारण म्हणजे शाळेतले चित्रकलेचे शिक्षक. मुळात, चित्र ही फळ्यावर काढून ठेवून 'हां..आता करा सुरु काढायला' असा वर्गात पुचाट नारा देऊन शिकवता येणारी कला नाही हेच या मास्तराला कधी कळलं नाही..आणि जिथे शिक्षकाशी विद्यार्थ्यांची गट्टी जमली नाही तिथे चित्रकला कुठे घुसते ओ आमच्या डोक्यात..ते स्वत: चांगलं चित्र काढत..असं म्हटलं तरी पाहिजे..नाहीतर पगार कसले खाणार ते..? पण वर्गात आले की फळ्यावर कधी फुलं..कधी काही रिकामी भांडी काढून ठेवत..तर कधी सर्कस चं चित्र..अरे देवा..आपल्याला छोटा आणि मोठा असे 2 मेंदू का आहेत याचा साक्षात्कार व्हायचा तो तेव्हा..कारण छोटा मेंदू फळ्यावरचं ते चित्र अनैच्छिकपणे उतरवून घेत असंत तर मोठा मेंदू त्या मास्तरांना यथेच्छ शिव्या घालत असंत..
साधं माणसाचं चित्रही नाही जमलं कधी मला काढायला..फेंगाडलेले पाय..हातांना असली तर 2 बोटं जेमतेम..नाहीतर पाचही बोटं विलग करुन उभा राहिलेला माणुस जो कधीही पृथ्वी तलावर कुणी पाहिला नसेल..अशी माझी चित्रकला..प्राण्यांबद्दल तर न बोललेलंच बरं..हत्ती आणि डायनोसोर हे एक सारखे काढायचं कौशल्य फक्त माझ्याकडेच..त्यात आमच्या मास्तरांनी एकदा फळ्यावर थेट झेंडू चं फूल काढलं..आणि म्हणाले..हां..काढा आता..हे वाचून मी काय काढलं असावं याची कल्पनाही न केलेली बरी..एकदा तर आम्हाला कसल्याशा स्पर्धेत दहीहंडी उत्सव असा विषय दिलेला..बाबांची चित्रकला उत्तम , त्यामुळे माझ्याकडून सराव करून घेण्याची शिक्षा त्यांना मिळाली..माझा एकूण आनंद पाहता बाबांनी फार डोकं फोड करून घेतली नाही त्यामुळे त्यांची तब्येत आजही उत्तम आहे..
यात भर पडायची ती विज्ञान विषयातल्या चित्रांची..बापरे! ते तर याहूनही भयानक..plant cell, animal cell (माफ करा ..माझं इंग्रजी माध्यमपण डोकावतं मधेच) हृदय, फुफुसं , किडण्या, आतडी..नको रे नको..या अशा अवयवांपासून आपण बनलोय इतपर्यंत माहिती ठीक ओ..पण त्याची चित्र पण काढा आणि मार्कं पण मिळवा!!! जिथे माझा साधी सोपी चित्र काढण्याचा आनंद तिथे ही चित्र पाहून मी काळी विद्या किंवा चेटुक तर करत नसेन ना असा प्रश्न बघणा-याला नक्की पडत असावा.. एक मात्र नक्की, नवीन माणसं, प्राणी, पक्षी शोधून काढल्याबद्दल एखादा तरी पुरस्कार मला मिळायला हवा होता इतक्या वर्षात..असो..
हे सगळं लिहावंसं वाटलं त्याचं कारण असं की अलिकडे फेसबुक वर एक video viral झाला..ग्रामीण भागातील शाळेत, शिक्षक विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने वर्गात चित्र काढायला शिकवत आहेत..तेही मुलांची उत्सुकता ताणलेली ठेवून..मुळात चित्रकलेचा तास हा किती खास असला पाहिजे..प्रत्येक मुलाचं विश्व वेगळं..जगाकडे पाहण्याची पद्धत वेगळी..त्याने काढलेलं चित्रही वेगळं..इथे copy होऊच शकत नाही..मात्र मानवी आकृत्या, प्राणी, पक्षी सोपं करुन काढायला शिकवलं तर जे आपण पाहतो ते आपण रेखाटू शकतोय हा प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल..प्रत्येक विद्यार्थी उत्तम चित्रकार होऊ शकणार नाहीच. मात्र याने एक होईल की प्रत्येक विद्यार्थी हा चित्राचा आस्वाद कसा घ्यावा हे नक्की शिकेल..यालाच 'कलास्वाद' किंवा art appreciation म्हणून आपण ओळखतो..चित्र कसं काढावं हे जरी विद्यार्थ्यांना आलं नाही तरी चित्र कसं पहावं ,वाचावं हे मात्र या कला आस्वादाच्या प्रक्रियेमुळे नक्की शिकता येईल. 'डोळ्यांपुढे चित्र उभं राहतं' हा वाक्प्रचारही याच प्रक्रियेचा भाग म्हणता येईल.
नृत्याच्या अभ्यासातही रेषा, आकृती, हस्त मुद्रा, रंग इ  चं स्थान तितकंच महत्वाचं जितकं चित्रकलेत..तेव्हा नृत्यकलेमुळे आज मी किंवा माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थिनी चित्रकलेचा आस्वाद घेऊ शकत असतील..
या आस्वाद प्रक्रियेत संगीत, नृत्य, अभिनय, साहित्य, शिल्प, छायाचित्र इ सगळ्या कला समाविष्ट आहेत..यांच्याशी वयाच्या त्या त्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना ओळख करून दिली तर उत्तम कलाकार नाही पण किमान उत्तम रसिक तरी निर्माण होण्यास सुरुवात होईल हे नक्की..
आजही माझी चित्रकला तितकीच 'अद्भुत' आहे पण आज नृत्याच्या अनुषंगाने रेषा, आकृतीबंध आणि रंगांशी गट्टी जमलिये ती कायमची.

Image: google

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....