Kinetic, Yezdi आणि मी

      
त्या दिवशी सकाळी वेधशाळेचं जराही न ऐकता ऐन उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरही हवा चक्क गार होती. सकाळ तशी प्रसन्न असतेच नाही का? भारद्वाज पक्षाची जोडी खूप दिवसांनी बघायला मिळाली. भारद्वाज दिसला की शुभ शकुन असतो म्हणतात. लहान असताना मात्र दर रविवारी महाभारतात नितीश भारद्वाज दिसला की मस्त वाटायचं. 
    तर ...मनात असतं ते शब्द रुपात येतं. म्हणून भारद्वाज पक्षावरुन नितीश भारद्वाज आणि त्याच्यावरुन लहानपण असा सेतू बांधला. याला निमित्त झालं आमच्या समोर राहणारी 2 वर्षांची चिमुरडी आरोही. सकाळी सकाळी तिच्या बाबांनी दुचाकी बाहेर काढली की आरोहीची पुढे उभं राहून एक चक्कर ठरलेली. हा तिचा नित्यक्रम मी खूपदा बघते, पण आज का कुणास ठाऊक माझी लहानपणची आठवण जागी झाली. 
    मी लहान असताना माझ्या काकाकडे लाल रंगाची kinetic होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे रहायला जायचा दरवर्षीचा बेत. आठवडाभर आजी आजोबांबरोबर वेळ मजेत जायचाच पण रविवारचाही एक बेत ठरलेला असायचा..तो म्हणजे काकासोबत kinetic वरुन फिरणं. आठवडाभर काका व्यस्त असायचा, मात्र रविवारची विश्रांती झाली की संध्याकाळी kinetic वरुन पुढे उभी राहून चक्कर नक्की असायची. कधी पाणीपुरी खायला, तर कधी बागेत, कधी लक्ष्मी-नारायणाच्या देवळात. पण मला मात्र उत्सुक्ता असायची ती kinetic वर समोर उभं राहायची. आणि तीही संध्याकाळी अंधार पडल्यानंतर. त्याचं एक गमतीशीर कार. Kinetic वर पुढे उभं राहून मला त्याच्या speedometre कडे पाहण्याचा चाळा होता..गाडी अंधारातून गेली की त्यातल्या radium मुळे त्यावरचे आकडे चमकत. पुन्हा दिव्याखाली आली की ते पांढरे दिसत. असा माझा एक मस्त खेळ त्या दरम्यान चाले. हे बघायचा कंटाळा आला की दोन्ही हात पुढे टेकवून त्यावर हनुवटी टेकवून उभं राहायलाही धमाल यायची. गाडी ज्या दिशेने वळत त्या दिशेने मी सुद्धा वळत. असा इकडून तिकडे होण्यात कसा वेळ जायचा आणि घर कधी यायचं हे समजायचंही नाही. मी उंच होऊ लागले होते तरी हट्टाने वाकून kinetic वर पुढे उभी रहायचे. 
    माझी, गाडीवरुन फिरण्याची दुसरी आठवण म्हणजे बाबांची येझडी..आमची येझडी बाबांची लग्ना आगोदरपासूनची सोबतीण. लौकरंच येझडी 40 वर्ष पूर्ण करेल आणि आनंदाची गोष्ट ही की ती आजही उत्तम स्थितीत well maintained आहे आणि आई बाबा आजही येझडी वरुन लांबचा प्रवास अगदी सहज करतात. मी लहान असताना, बाबा कामावरुन संध्याकाळी घरी आले की मी गाडीचा आवाज येताच धावत बाल्कनीत जायचे. त्या वयात येझडी च्या पेट्रोल टाकीवर पुढे बसून मारलेल्या चकरा अविस्मरणीय आहेत. माझ्या आठवणीतला आम्ही तिघांनी केलेला लांबचा प्रवास म्हणजे येझडी वरून बदलापूर-पुणे. जुन्या highway वरुन केलेला प्रवास..मोठा चढ आला की मी आणि आई उतरायचो, चढ संपला की पुन्हा बसायचो की सवारी निकल पडी! गाडीवर समोर बसण्यात जी गंमत यायची तितकीच गंमत गाडी वरुन खाली उतरण्यात. गाडी थांबवली की आधी आई उतरणार, माझे पाय खालपर्यंत टेकायचे नाहीत म्हणून बाबा मला कंबरेला धरुन खाली उतरवायचे.
    बरं या दोन्ही गाड्या सुरु होतानाची अजून एक गम्मत ..kinetic सुरु होताना ट्रिंग असा आवाज व्हायचा तर येझडी सुरु करताना तिला आधी किक ने पंप करावं लागतं आणि मग ती सुरु झाली की बॉंब फुटल्यासारखा आवाज. दोन्ही आवाज खणखणीत. आजूबाजुच्यांनाही जागं करुन वर्दी देणा-या की बघा मी निघाले.
    'गाडीत' बसण्यापेक्षाही 'गाडीवरुन' फिरण्यातली गंमत खास आमच्या पीढीने जास्तं अनुभवली आहे हे नक्की. आज स्वत: दुचाकी चालवत जाण्यापेक्षाही या लहानपणी अनुभवलेल्या गोष्टी किती खास वाटतात! आता लहानपणही संपलं आणि त्यामुळे हे अनुभव घेण्याचं वयही संपलं..मात्र आसपास आजही लहानग्यांना ही मजा घेताना बघितलं की काही काळ का होईना या आठवणींमध्ये रमता येतं आणि पुन्हा ताजं तवानं होता येतं. 
इमेज: google

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....