टेक् 'नो' लॉजिकल गंमत..

     पुन्हा एकदा गेल्यावर्षीच्या चक्रात सापडल्यामुळे..अहो कुठलं चक्र काय विचारता? तेच ते lockdown..तर , त्याच सगळ्यात सापडल्यामुळे म्हटलं जरा virtually फिरुन येऊया..जिथे जावंसं वाटतंय , त्याची माहिती गूगल करायची..छायाचित्र बघायची..की झालं virtual पर्यटन..तर म्हणून मी, जवळच्याच एका ठिकाणचं नाव गूगल करुन पाहिलं..साधारण किती वेळ लागतो..किती किलोमीटर..इ पहावं म्हटलं..तर हे गूगल शाळाच घेऊ लागलं..पहिली सूचना काय? 'Due to the COVID restrictions inter-district travel might have been affected'.. मी वैतागून फोन कडे बघून तणतणायला लागले, " एवढं समजू नये मला? आत्ता काय लगेच उठून चालू पडणारे..मी सुद्धा  बातम्या बघते म्हटलं..माहित्ये बंदी आहे फिरण्यावर!" 
  मी कुणाकडे बघून हे असं बडबडते आहे हे माझ्या नव-याला समजेना..मी जरा गुश्शातच त्याला फोन दाखवला तसा तो हसायला लागला..!
   ते कुठलंसं app?..त्यावर तर म्हणे location on असेल तर तुमच्या आजुबाजुला कुठे आणि किती covid रुग्ण आहेत हे कळतं..जणू काही लहान मुलांचा pokemon चा खेळच..pokemon शोधून दाखवले की points  तसे रुग्ण सापडले की points..म्हणजे जरा कुठे बाहेर पडावं म्हटलं की हे app सांगणार," काही अक्कल दिलिये की नाही देवाने?..चाललाय बाहेर! 1 km वर बुवा आहे!😈👹..चल!..गप घरात बस!."
   अहो साधं डेबिट कार्ड वापरुन पैसे काढायचे म्हटलं किंवा खरेदी करावं म्हटलं तर 5 व्या सेकंदाला बँकेचा संदेश आलेला असतो..your account ****** has been debited by Rs. **** ...त्यात तारीख , वार, वेळेचाही तपशील..जणू काही आपल्याला हे म्हणतंय..," बघ बाई, एवढे खर्च झाले, आता एवढेच उरले खात्यात..कर, अजून खर्च कर."
   एकदा मी असंच कार्ड वापरल्यावर बँकेचा मेसेज दिसला आणि त्याकडे बघून मी माझा राग व्यक्त केला," हो हो..मी!..मी केला खर्च!😡..काय म्हणणं आहे? माझे पैसे..काम करुन मिळवते..चो-या मा-या करते होय?🤬..खर्च झाल्याची सारखी कसली आठवण करुन देता!🤬🤬' दुकानातून बाहेर पडताना एका बाईंनी आपुलकीने चौकशी केली..काही अडचण आहे का?तेव्हा माझं मलाच हसू आलं.
   बरं या system generated message मधून जितकं मध पाझरत वगैरे असतं, तितकं काही ही बँकेतली मंडळी गोड बोलत नाहीत..एकतर डोकं वर करुन आपल्याकडे पाहणं यांच्या तालमीतच नसतं..चेह-यावर भाव असे की 'आम्ही नव्हतं सांगितलं तुम्हाला, आमच्या बँकेत खातं उघडा'..काही standard ठरलेली उत्तरं..8 दिवसांनी या..आत्ता pass book printing बंद आहे..चेक क्लियर व्हायला 4 दिवस लागतील..ही सर्वांना पाठ असलेली मंगलाष्टकं ते म्हणत असतात..या लोकांनी ना खरं तर फावल्या वेळात पौरिहित्य करावं..लग्न, पूजा..ठरलली वाक्य म्हणण्याचे पैसे मिळणार असतील तर काय हरकत आहे ना?
   तर..विषय होता system generated message चा..बँक चा विषय निघाला की हे असं तोंडसुख घेतल्याशिवाय चैन पडत नाही..तर, या systems फार संस्कारी बरं का? मेसेज किंवा email ची सुरुवातच किती साखरे सारखी गोड..Dear customer...हे शब्द वाचताच डोळ्यात आनंदाश्रु तरळतात ओ..! आणि शेवटी yours faithfully वगैरे..नाही ओ..नाही सहन होत एवढा आदर बँकेकडून ..! सहसा बँकेत गेल्यावर एकतर अपराध्या सारखं फिरावं लागतं..counter च्या पलीकडे बसणारा माणुस आधी डोळे वटारून आपल्याकडे बघतो..त्याच्या चेह-यावर असे भाव असतात की "च्यायला, नेट बँकिंग द्या मोबाईल बँकिंग द्या तरी मरायला येतात बँकेत!"
    पण या system generated messages मधे तर साखरेच्या पाकात बुडवून ठेवलेले गुलाबजाम सुद्धा एवढे गोड नसतील इतकी गोड भाषा असते..आणि त्या उपर this is a system generated message do not reply..म्हणजे अहो..तुम्ही आमच्याशी इतके गोड बोलताय..आमचा virtually का होईना, मान राखताय🥴..खर्च..जमा..इतकं सगळं प्रेमाने इंग्रजीत कळवताय..आणि आम्ही साधं तुम्हाला इंग्रजीत thank you सुद्धा म्हणायचं नाही..! अहो ATM मधून पैसे काढताना ती त्यातली 'बाई' किती गोड बोलते..आधी गोड बोलून स्वागत..Welcome to the *** bank ATM service..मग please enter your pin..please wait while your transaction is processing.. अहो एवढ्या वेळा bank कर्मचारी please म्हणू लागले तर बँक त्यांच्याकडूनच प्रत्येक please 1000 रुपये इतका दंड आकारेल..
    कशी गंमत आहे बघा..तंत्रज्ञानाचा शोध लावणारा माणुस..ते विकसित करणारा सुद्धा माणुसच..पण आज manners का काय म्हणतात ते फक्त या तंत्रज्ञानाकडेच उरलेत बहुदा..
अती टेक्नो सॅव्ही बनत चालल्यामुळे टेक्नोलॉजी आपल्यातून उरला सुरला गोडवा सुद्धा शोषून घेते आहे का काय असा प्रश्न पडलाय..आधार कार्डाच्या फोटोत आपण जितके बावळत दिसतो तितके प्रत्यक्षात नसतो हे जसं खरं तसंच, virtually आपण जितके 'गोड' वगैरे वाटतो तितके आपण प्रत्यक्षात नसतो असा समज आपल्याबद्द होतोय..😅😅
   आपण तंत्रज्ञान विकसित केलं खरं पण आज ते आपल्या 10 पावलं पुढे जाऊन आपल्याला सावधही करतंय..सतर्क करतंय आणि माहितीही देतंय..'तंत्र' आपल्याकडे आणि उरलं सुरलं सगळं ज्ञान त्याच्यापाशी..🤥🤥🤥
   सगळ्या बाबतीत अधिक सावध..अधिक
Prepared वगैरे राहू लागलोय आपण..सगळ्याची माहिती असलीच पाहिजे या अट्टाहासापोटी त्या माहितीलाच ज्ञान समजू लागलोय..त्यामुळे 'तांत्रिक बिघाड' आता आपल्यात होऊ लागलेत..there's only tech..nothing logical left in us any more..
   तेव्हा स्वत:ला तांत्रिक होण्यापासून वाचवुया..'किंबहुना'  #आपलं #आयुष्य ही आता #आपली #जबाबदारी हे 'ब्येश्ट' काकांनी ठरवून दिलेलंच आहे!

Image: google

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....