पाशमुक्त

   

    काल पुन्हा तशीच एक बातमी येऊन धडकली...ध्यानी मनी नसताना ..सिद्धार्थ शुक्ला च्या जाण्याची...
  गेल्यावर्षीची पुनरावृत्तीच जणू ..या दळभद्री कोविड मुळे गेल्यावर्षी सतत आपण घरात , बाहेर पडणं नाही , कुणामध्ये मिसळणं नाही ..जी काही थोडी करमणूक होती ती सोशल मीडिया मुळेच ..स्क्रोलिंग करत बसण्याची सवय लागलेली..आणि अचानक सुशांत सिंग राजपूत गेल्याची बातमी दिसली..अर्थातच फेक आहे या बद्दल खात्री होती...मात्र थोड्या वेळाने अजून पोस्ट दिसायला लागल्या ..काळजाचा ठोका चुकला...
सुशांत चं जाणं काय किंवा काल अचानक सिद्धार्थ चं काय..अस्वस्थ करून गेलंय नक्की.
  शांतपणे विचार केला तर काल ही व्यक्ती होती ..आज नाही ..एवढं साधं सरळ ..मात्र इतकी स्थिर बुद्धी असायला आपण भगवान श्रीकृष्ण नाही..काल धडधाकट दिसणारा माणूस आज होत्याचा नव्हता होतो..हे भयंकर आहे पचवायला..
याचा संबंध हे दोघे ग्लॅमर च्या जगात होते याच्याशी नाही..किंवा त्यांचं आपाल्याशी काही नातं आहे का नाही याच्याशी सुद्धा नाही. एका अदृश्य भावनिक धाग्यामध्ये आपण बांधले गेलो आहोत, जो कधीही कापला जाऊ शकत नाही.. त्यामुळेच अशी बातमी समजली की आपल्याला काहीतरी संवेदना जाणवतात...काहीतरी रुख रुख लागून राहतेच मनाला.
   ज्याची वेळ आली तो जाणार हे निश्चित..मात्र ,अशा अचानक आलेल्या बातम्या अस्वस्थ करून टाकतात..
जीवन्तपणे घट्ट धरून ठेवायचं कौशल्य आपण नकळत शिकतो..एकमेकांवर भरपूर प्रेम करतो, जीव लावतो..मात्र आयुष्यातून कुणी कुठल्याही कारणामुळे वजा झालं तर तितकंच सहज सोडू शकत नाही..
  एकदा एका कुत्रीचं पिल्लू थोडं चालू लागलं. स्वतः स्वतः आता आपण फिरू शकतो हा आत्मविश्वास त्याला आलेला, मात्र आपल्याला धोका कुठे आहे हे त्याला कळत नव्हतं. ते चालत चालत भर रस्त्यावर गेलं. येणाऱ्या एका गाडीखाली येऊन मरण पावलं. कुत्री उठली , त्याच्याजवळ गेली , वास घेतला, पिल्लू गेलं हे तिला समजलं , ती पुन्हा आपल्या जागी येऊन बसली. त्याला आपण फक्त जन्माला घातलं , बाकी काही आपल्या हातात नाही हे जणू काही निसर्गतःच ती कुत्री जाणून होती.
एखाद्या झाडाची फुलं गळून पडल्यावर ते झाड, पुन्हा ती फुलं उचलून घेत नाही व शोकही करत नाही.
एखाद्या परिस्थिती कडे निसर्ग घटना म्हणून पाहतो आणि इथेच तो आपल्याहून सदैव श्रेष्ठ ठरतो. ते पिल्लू मरणं काय किंवा फुल गळून पडणं काय, या कडे त्याच्याशी संबंधित जीव केवळ एक 'घटना' म्हणून पाहतात..ती घटना घडते आणि लोप पावते. पुढचा क्षण नवीन असतो, त्यात या घडून गेलेल्या गोष्टीचा लवलेशही नसतो ..मात्र आपण माणसं आपल्या विचारामुळे त्या घटना सतत जिवंत ठेवतो. आपण त्याकडे 'दुर्घटना' म्हणून पाहतो..एखाद्या बातमीकडे केवळ 'वार्ता' म्हणून पाहत नाही तर ती सुवार्ता आहे का कुवार्ता आहे या द्वंद्वात सापडतो..तिथेच आपण १०० पावलं मागे येतो खरंतर. माणूस हुशार प्राणी आहे हे सुद्धा त्यानेच नाही का ठरवलेलं? त्यामुळे हे जजमेंटल असणं सुद्धा आपण आपल्या हुशारीचंच लक्षण समजतो.
या कालच्या बातमी ने पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं खरं. माणसाने आयुष्यात सावध आवश्य रहावं,  मात्र सगळ्याबाबतीत जजमेंटल होण्याची खरंच गरज आहे का याचा विचार करावा? स्वतः बद्दल आणि इतरांबद्दल सुद्धा.
       मी पास , मी नापास , हा जिवंत,  तो मेला इ कडे केवळ एक घटना म्हणून आपण सर्वांनीच पहायला शिकलं पाहिजे नाही का? म्हणजे त्यात अडकून न राहता पटकन मोकळं होऊन पुढे जाता येतं.
     मी जाड, मी बारीक, ती उद्धट , तो प्रेमळ, ती असं बोलते म्हणून चांगली , तो तसं बोलला म्हणून वाईट एवढी वरवरची बुद्धिमत्ता असलेला मनुष्य प्राणी नक्कीच नाही. ज्याच्याशी कनेक्ट व्हावंसं वाटलं , पटकन व्हावं. एखाद्या व्यक्तीशी नाही तर नाही.  मात्र जजमेंटल होत ताटकळत बसु नये.  कोण किती काळ आपल्या बरोबर आहे माहिती नाही , मात्र असताना आनंदाचे ४ क्षण आपण एकमेकांना नक्की देणार आहोत..याने आपला आत्मा सुखावणार आहे.
     मात्र पुन्हा तेच, त्यामुळे हुरळून जाण्यालाही काही अर्थ नाही , एक क्षण किंवा एक घटना म्हणून त्याकडे पाहून पटकन त्यापासून स्वतःला वेगळं काढता आलं पाहिजे आपल्याला. भग्वद गीतेत भगवान श्रीकृष्णाने हेच सांगायचा प्रयत्न केला आहे. मात्र भग्वद गीता उघडून वाचायलाच आपण इतका वेळ लावतो कि तोपर्यंत आपलं निम्म्याहून अधिक आयुष्य निघून गेलेलं असतं . तेव्हा अर्थबोध होणार कधी?
   वर्षानुवर्षांची आपली विचार सरणी लक्षात घेता हे  आंगिकारणं अवघड आहे मात्र अशक्य नक्कीच नाही..तेव्हा प्रयत्नपूर्वक या सर्व पाशांतून स्वतःला अलगद मुक्त करुया..

Image source: google

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....