रामदरा

रोजच्या धावपळीतून थोडा बदल सगळ्यांना हवाच असतो . अशावेळी जेव्हा मोठ्या सुट्टीवर जाणं शक्य नसतं तेव्हा आपल्या आजूबाजूलाच इतकी सुंदर ठिकाणं लपलेली असतात याची आपल्याला कल्पनाही नसते. फेसबुक च्या माध्यमातूनच अशा  ठिकाणची माहिती मिळाली व आज याच निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा योग आला ते म्हणजे पुण्याहून अंदाजे ३० किमी वर असलेलं 'रामदरा' देवस्थान. 
  लोणीकाळभोर रस्त्यावर असलेलं हे मंदिर अतिशय शांत व आवर्जून भेट द्यावी असं आहे. वनवासात जायला निघाले असता प्रभू श्रीराम येथे वास्तव्याला होते असं म्हणतात. इथेच त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली. पुढे अनेक वर्षांनी उज्जैन च्या जुनादत्त आखाड्याचे  महंत देवीपुरी महाराज यांना दृष्टांत होऊन त्यांनी हे ठिकाण शोधलं व त्याचा जीर्णोद्धार केला. त्यांनी समाधी घेतल्यानंतर पुढे हे कार्य त्यांचे शिष्य मंगलपुरी महाराजांनी सुरु ठेवले. या दोघा महंतांच्या प्रतिमा इथे पहायला मिळतात.
   रामनवमी किंवा महाशिवरात्री च्या उत्सवाचा काळ हा अर्थातच इथला गर्दी खेचणारा काळ. अन्यथा अतिशय निवांतपणे पोहचून दर्शन घेता येण्यासारखे आहे. तळ्याच्या मध्यभागी शिवलिंगाची स्थापना करून श्रीरामांनी तेव्हा इथे एक छोटे मंदिर उभारले असावे असे दिसते. 
   वनविभागाने इथल्या वनराईकडे विशेष लक्ष दिल्याने गर्द  झाडी, भरपूर सावली आणि हिरवा गार परिसर दृष्टीस पडतो . पक्षीप्रेमींसाठी इथे येणं पर्वणीच ठरेल. आपल्या शहरी भागातून नामशेष झालेल्या चिमण्या इतक्या वर्षांनी या भागात  बघायला मिळाल्या.
खुद्द मंदिरात शिरताच एक प्रसन्न मनस्थिती घेऊन आपण पुढे जातो. गीतेचा १५ व्या अध्याय (पुरुषोत्तम योग) इथे वरती कोरलेला दिसतो. हा अध्याय वाचता वाचता प्रदक्षिणा घेता येते. मंदिरात सर्वत्र देवी देवतांच्या व संत महात्म्यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. गर्भगृहातल्या प्रभू श्रीराम , सीता माई , लक्ष्मण यांच्या प्रतिमा तर सुंदर अहेतच , शिवाय बाहेरच्या अंगाला असलेल्या भव्य नंदी ची प्रतिमाही सुंदर आहे. मंदिरातच दुर्गा व काली च्या मूर्ती आहेत. मुर्तीकाराने दुर्गेची मूर्ती अप्रतिम सुंदर घडवली आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भाव, बोलके डोळे पाहून साक्षात ती पुढे उभी असावी असं वाटत.
मंदिराच्या परिसरातून फिरत असताना प्रत्येक कोनातून फोटोत ते वेगळं भासतं. कितीही फोटो घेतले तरी समाधान होत नाही. इथल्या वनराईचंही तसंच आहे. 
मंदिराच्या आत व बाहेर प्रशस्त पार्किंग व्यवस्था आहे. तसंच नाश्त्याचे पदार्थ व आधी कल्पना दिल्यास पिठलं भाकरी उपलब्ध होण्यासाठी ग्रामस्थांनी चालवलेली व्यवस्था आहे. 
पुणे सोलापूर रस्त्यावरून पुढे लोणी काळभोर ला आत वळून रामदरा ला पोहोचता येतं. आतला रस्ता थोडा खराब आहे, मात्र देवापर्यंत पोहोचायचा मार्ग हा खडतरंच असतो की !🙃😉

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....