राजू भाई..

  
राजू श्रीवास्तव यांचं अकाली जाणं खरोखर मनाला चटका लावून गेलं. गेल्या महिन्यापासून मृत्यूशी त्यांची चाललेली झुंज अखेर संपली. Brain dead , condition serious इ अफवा येत होत्या . पण ,'he is stable, do not believe in rumors असं वाचल्यावर आशावादी वाटत होतं .
मलाच काय आपल्या सगळ्यांनाच  प्रतीक्षा होती ती राजू भाई ठणठणीत बरे होऊन पुन्हा सगळ्यांसमोर खळखळून हसवायला कधी येतात याची. मला खात्रीये, आजारी असताना हॉस्पिटल मध्ये आलेल्या अनुभवांवरही त्यांनी एक स्टॅन्ड अप ऍक्ट तयार केला असता..मृत्यू चं कारण ठरलं हार्ट अटॅक , पण राजू भाई बरे झाले असते तर त्यांनी 'माझा हार्ट अटॅक' या वरही उत्तम ऍक्ट सादर केला असता आणि हा गंभीर विषय अतिशय हलका करून आपल्यापुढे मांडला असता. 
पण.. पण हे सगळं आता होणार नाही..कारण आता राजू भाई आपल्यात नाहीत...'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ' मधून राजू भाई घरोघरी पोहोचले. 
त्यांच्या गजोधर ने तर सगळ्यांना वेड लावलं. 
राजू भाईंची खासियत म्हणजे ,अति उत्तम देहबोलीचा वापर आणि निरीक्षण क्षमता. रवंथ करणाऱ्या गायीपासून ते फकफकणाऱ्या ट्यूब लाईट पर्यंत ते सगळं, स्वतःच्या देहबोली व हावभावांवरून दाखवत. Buffet मध्ये हातात प्लेट घेऊन फिरताना अन्न पदार्थ आपापसात काय बोलत असावे हि भन्नाट कल्पना फक्त राजूभाईंना सुचू शकली. विनोद निर्मितीसाठीच्या विषयांना सीमा नाही हे त्यांच्या सादरीकरणाद्वारे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलं.
Wikipedia वर त्यांची फिल्मोग्राफी पहिली तर कॉलेज स्टुडंट, क्लिनर,  असिस्टंट, सर्वंट अशा लहान सहान भूमिका त्यांनी सिनेमात केलेल्या दिसतात, ज्या भूमिकांची कदाचित कुणी दखलही घेतली नसेल.
मात्र ,द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मध्ये वयाच्या चाळीशीत असलेले राजू भाई हे त्या नंतर कधीही थांबले नाहीत हे विशेष. विनोदाचं विश्व त्यांच्यासाठी खुलं झालंच, पण राजकारणातही ते चांगली कामगिरी करू शकले हे नक्कीच उल्लेखनीय. इतर क्षेत्रातल्या कलाकारांबद्दलचा त्यांचा आदर वेळोवेळी त्यांच्या बोलण्यामधून मधून दिसून यायचा. सिनेमात लहान सहान भूमिका करणारा एक कलाकार ते विनोदाचा बादशाह होणं हा मोठा प्रवास राजू भाईंनी केलाय. २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाचा राजदूत व २०१९ मध्ये उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट काउन्सिल चा अध्यक्ष होण्याचा बहुमान राजू भाईंना मिळाला. 
एखाद्या स्पर्धेत जिंकणं न जिंकणं याच्या पलीकडे जाऊनंच कलाकाराला आपली ओळख बनवायची असते. केवळ आपल्या क्षेत्राच्या कक्षेत बंदिस्त राहून हे होणार नाही याचं भानही त्याने ठेवायला लागतं. आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींबद्दल जागरूक राहून आपल्या क्षेत्रात काम करावं लागतं. आपण समाजाचं देणं लागतो हे विसरून चालत नाही. या सर्व कसोट्यांवर राजू भाई वेळोवेळी खरे उतरले आणि म्हणूनच सगळ्यांच्या मनात स्थान मिळवू शकले.
त्यांचा गजोधर हा आपल्या हास्याचा विषय होता, मात्र एक सामाजिक घटक म्हणून तो विनोदाच्या माध्यमातून राजू भाईंनी उत्कृष्ट पद्धतीने मांडला. म्हणूनच का काय 'गजोधर' म्हटलं कि दर वेळी वेगळा विषय त्यांच्याकडे असायचा आणि तो कधीही कंटाळवाणा झाला नाही.
राजू भाई आज जिथे कुठे आहेत, तिथे अखंड हास्य यज्ञ करत राहतील या बद्दल खात्री आहे.
विनोदाचे बादशाह राजू श्रीवास्तव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Image source: google

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....