कोपरा...


'आपलं घर'... मनोमन हळवं करणारे हे शब्द...आपण  कितीही मोठे झालो..वयाने आणि खिशाने...तरी सरते शेवटी आपल्या मुक्कामी...आपल्या घरी आपल्याला यायची ओढ असणारच आहे...
असं जरी असलं ना तरी आपल्या घरातला आपला आपला एक कोपरा असतो किंवा एक ठरलेली जागा असते...घरात असुनही त्या 'आपल्या' अशा जागेत गेल्याशिवाय आपल्या जिवात जीव येत नाही..मग तो एखादा  कट्टा असो, घरातला एखादा कोनाडा असो, बाल्कनी असो, गच्ची असो किंवा एखादी खोली असो..अख्ख्या घरात जे घरपण सापडत नाही ते , घरातल्या त्या लहानशा जागेत गवसत.
कितीही मोठं जग असो आपलं, सूक्ष्माकडे आपला ओढा असतोच. अगदी घरात असताना सुद्धा. घरासाठी अजून एक सुंदर शब्द आपल्या शब्दकोशात आहे...'मंदिर'..
अशाच आपल्या सर्वांच्या परिचयाचं मंदिर ...'कसबा गणपती'... राजमाता जिजाबाई साहेब आणि राजे शिवछत्रपती यांनी स्थापन केलेलं हे मंदिर म्हणजे अमूल्य असा वारसा..
अलिकडे दिवाळीत इथे आलो असता हे मंदिर इतकं तेजस्वी भासलं म्हणून सांगू! जुन्या धाटणीची ही वास्तू दिव्यांच्या आणि आकाश कंदिलांच्या  उजेडात अधिकच जिवंत वाटत होती..
गर्भगृह आणि सभामंडप तर छान दिसत होतेच ...पण प्रदक्षिणा घालताना माझं लक्ष जात होतं ते वऱ्हांड्याकडे..
रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेला हा वऱ्हांडा अतिशय शांत भासत होता! दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ होतीच..सगळे सभामंडपात थोडावेळ बसून निघत होते.. मला मात्र हा वऱ्हांडा खुणावत होता..तिथे जाऊन शांतपणे बसले... आपल्या घरात जशी आपण आपली स्पेस शोधतो तशीच हि एक माझी स्पेस सापडली मला मंदिरात... तिथे मी सोडून अजून कुणीही नव्हतं.. आणि कुणी मुद्दाम येऊन त्यावेळी बसण्याची शक्यताही नव्हती.. या जुन्या वास्तूंना न्याहाळत बसण्यात एक वेगळाच आनंद आहे हे जाणवलं. वऱ्हांड्याची मांडणी, कोनाडे,, छत्रपती शिवाजी महाराजांची छबी.. कुणे एकेकाळी शिवराय आणि जिजाऊ साहेबांचे चरण या वास्तूला लागले आहेत हे विसरून कसं चालेल बरं !
या विचाराने अजून काही वेळ तिकडे स्थिरावले...गर्भ गृहात किंवा सभामंडपात बसून एकाग्र होण्यात जितका आनंद आहे, तितकाच या व्हरांड्यात बसून होण्यात आहे बरं! महत्वाची आहे ती आर्तता...त्यामुळे एखाद्या देवळात गेल्यावर सुद्धा आपला असा एक कोपरा शोधावा ,जिथे डोळे मिटून पण तरीही डोळेभरून त्या गर्भ गृहातल्या देवाकडे लक्ष केंद्रित करता येईल...करून बघा!

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....