धुरंधर

' धुरंधर '... अलिकडे आपण सगळ्यांनीच एक अद्भुत चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिला असेल..ott वरही हा चित्रपट प्रदर्शित झालाय..ott वर पुनः पुनः एखादं दृश्य आपण पाहू शकतो आणि दादही परत परत देऊ शकतो..काही दृश्य आपल्याला निशब्दही करतात. अर्थात सगळ्याच चित्रपटाच्या बाबतीत असं होणार नाही..धुरंधर मात्र अपवाद आहे..
म्हणूनच' अद्भुत ' हा शब्द वापरावासा वाटला या साठी...एकाच चित्रपटात एकाच मनुष्याने जगलेली तीन परस्पर विरोधी आयुष्य या चित्रपटात दाखवली आहेत..
देशभक्ती रक्तात घेऊन जन्मलेला आणि फौजेत जायची तयारी करत असलेला तरुण जसकीरत ..आई वडील आणि बहिणींबरोबर एका सुखी आनंदी कुटुंबाचा भाग असलेला जसकीरत एकीकडे..
तर ,कुटुंबावर अन्याय झाल्यावर त्याच्याविरुद्ध एकटा लढणारा आणि पुढे जाऊन मिळालेल्या संधीचं सोनं करत शत्रूचा नायनाट करणारा हम्जा अली मझारी एकीकडे...
केवळ अद्भुत आहे हा त्याचा प्रवास..
या सगळ्या गोष्टी बघत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्याच्या भूमिकेला मिळालेले अगदी नाममात्र पण परिणामकारक संवाद.
' घायल हो इसिलिये घातक हो '
इंटेलिजन्स चीफ अजय सन्याल यांनी म्हटलेला हा संवाद जेव्हा हम्जा च्या तोंडी येतो तेव्हा ' घायल हुं इसिलिये घातक हुं ' ऐकून प्रेक्षक म्हणून आपल्याही अंगावर शहारे येतात..
सूड उगवायच्या भावनेने हत्यार घ्यायला चाललेला जसकीरत चेहऱ्यावरून ना शांत दिसतो ना अशांत..अपहरण झालेल्या आपल्या बहिणीसमोर जाण्याआधी असलेले त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कमालीचे विलक्षण आहेत ! अपराधी भावना, भीती, काळजी अशा सगळ्या भावना त्याने अप्रतिम दाखवल्या आहेत...पडद्यावर चित्रपट पाहताना आपण स्वतःला वेगळं काढतो खरं पण ' धुरंधर' बघत असताना काही प्रसंग आपण प्रत्यक्ष पाहतोय असं वाटत राहतं..
माझ्याकडे तुम्हाला द्यायला आता काहीही उरलेलं नाही म्हणणारा जस्सी , प्रशिक्षण पूर्ण करतो तेव्हा मात्र सूडाचं इंधन पूर्ण भरलेला एक देशभक्त तरुण भासतो आणि ताकदीने पाकिस्तानात दाखल होतो..
धुरंधर चे दोन्ही भाग पाहताना आळीपाळीने जसकीरत आणि हम्जा हे एकच असले तरी ती दोन वेगळी व्यक्तिमत्व वाटू लागतात..कारण त्यांचा चेहरा वेगळ्या प्रकारे बोलतो..प्रत्येक प्रसंगात..
26/11 चे हल्ले प्रत्यक्ष डोळ्यांनी पाकिस्तानात बसून पाहताना, स्वहस्ते कसाब च्या हातात दिलेली बंदूक या सगळ्या प्रसंगादरम्यान हम्जा मधे जिवंत आलेला जसकीरत दिसतो तो आपल्याला, पण त्याच्या साथीदारांना नाही..ही मर्यादा सांभाळणाऱ्या मनुष्याला आणि ताकदीने दाखवणाऱ्या अभिनेत्याला काय बरं म्हणावं असा प्रश्न पडतो..अभिनयाची कसोटी पाहणारे अनेक प्रसंग या चित्रपटात आहेत आणि ते पाहणं हा विलक्षण अनुभव आहे..
माझ्याकडे आता काहीही उरलेलं नाही म्हणणाऱ्या जस्सी ला, हम्जा म्हणून स्वतः मधे लपलेला प्रेमळ पती आणि पिता दोन्ही गवसतात. या दोन्ही ची कर्तव्य तो चोख बजावतो..हे काही हळवे क्षण हे त्याच्याही नकळत त्याचं जगण्याचं इंधन बनतात..
पकडले जाऊ या भीतीने ग्रासलेला जसकीरत बाहेर येऊ पाहतो..तेव्हा आलम येऊन त्याला सावरतो... आळ स्वतःवर घेतो..थोड्यावेळाने हम्जा समोर येऊन आलम वर गोळ्या झाडतो..मनात प्रचंड वेदना होत असताना चेहऱ्यावर मात्र क्रूर भाव आणत हम्जा जिंकतो...पुढच्या दृश्यात एकटाच नमकीन चाय पीत असताना आलम भाईंना आठवत आदरांजली वाहणारा जसकीरत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतो..

सूड घेतल्यानंतर यालिनाशी फोनवरून त्याचं शेवटचं संभाषण सुरू होतं..तिच्या तोंडी त्याचं हम्जा हे नाव ऐकतो आणि जसकीरत हे स्वतःचं खरं नाव सांगतो..सूडाची भावना शांत झाली, ते इंधन संपत आलं मात्र प्रेमाचं इंधन ओतप्रोत भरलेलं आहे त्याचं काय करावं या द्विधा मनस्थितीत असलेला जसकीरत स्वतःला सावरतो आणि यालिना चा निरोप घेतो.

चित्रपटाच्या सुरवातीला आपल्या कुटुंबाचा फोटो जाळणारा जसकीरत, चित्रपटाच्या शेवटी यालिना आणि झायन चा फोटोही जाळतो..लांबूनच आपल्या आई व बहिणीची ख्याली खुशाली पाहतो..डोळे भरून त्यांना शेवटचं बघतो, हृदयात साठवून ठेवतो..भावनांचं भांडार रितं करण्याचा प्रयत्न करणारा जसकीरत शेवटी नेमक्या कुठल्या वाटेने जावं हा विचार करताना पडद्यावर दिसतो ! 
हम्जा आणि जस्सी आलटून पालटून पडद्यावर येत राहतात आणि प्रत्येक वेळी अचंबित करतात.. हम्जा मधला हळवा , प्रेमळ जस्कीरत जीवंत आहे हे शेवटपर्यंत आपल्याला जाणवत राहतं.
धुरंधर च्या या सगळ्या प्रवासात जीव ओतून काम करणारा अनभिषिक्त सम्राट म्हणजे रणवीर सिंह ...कौतुकाच्या पलिकडे जाऊन या अभिनेत्याने या भूमिका रंगवण्यासाठी कठोर साधना केली आहे हे वादातीत आहे..
 हाच अभिनेता कपिल देव..बाजीराव पेशवे, अल्लाउद्दीन खिलजी साकारतो तेव्हाही प्रेक्षकांना अचंबित करतोच..
मात्र धुरंधर हे शिवधनुष्य आहे..
अथक परिश्रम, कठोर साधना आणि सखोल अभ्यास करून त्याने हे शिवधनुष्य पेललं हे निर्विवाद आहे..,
Ott वर दुसरा भाग बघितला..पण न राहून पहिला भागही पुन्हा बघितला, जस्कीरत चा प्रवास म्हणून आणि लिहावं वाटलं..
त्याच्याकडे असलेली प्रचंड ऊर्जा, कामात स्वतःला झोकून देण्याची तयारी आणि शिकत राहण्याची जिद्द त्याला प्रत्येक चित्रपटात अभिनेता म्हणून अधिक समृद्धच करत जाईल या बद्दल खात्री आहे...

ll शुभम् भवतू ll

Images: google

Comments