फणस
निसर्गाच्या किमयेतील मला ठाऊक असलेला हा आविष्कार की जो खरं तर फळ आहे का भाजी हे कोडंच कधी उलगडलेलं नाही..
प्रथिनं , खनीजं , कर्बोदकं या आणि अशा अनेक पोषण मूल्यांचा खजीना फणसात आहेच..शिवाय झाड म्हणूनही फणस उपयुक्त..फणसाच्या लाकडाला वाळवी लागत नसल्यामुळे फर्निचर साठी याचा भरपूर वापर होतो..गराचा भाग सोडल्यास उरलेला 55 ते 65% भाग हा प्राण्यांसाठी खाद्य म्हणूण उपयोगाला येतो..
वा..काय कमाल आहे निसर्गाची..म्हणजे बघा हां..तसं फणस हे स्वयंभू झाड..अपोआप रुजतं ..आपोआप वाढतं ...स्वत: स्वत:ला बहरवतं..तसा maintainence काहीच नाही..आणि असं सगळं असूनही या फणसाचं कोडं उलगडंत नाही..ज्यांना भाजीतून आनंद मिळतो अशांसाठी तो भाजीच्या रुपात समोर येतो..ज्यांना गरे किंवा साटं आवडतात त्यांच्यासाठी तो फळ म्हणून प्रकटतो..आणि एवढं सगळं असूनही हे असं का याचं उत्तर आपल्याकडे नाही.
माणसांचं पण असंच असतं का? आपण म्हणतो ना "हा माणुस काही बुवा आपल्याला अजून समजत नाही..". म्हणजे पाहिलं तर त्याचं सगळं वागणं बोलणं उघड उघड असतं..मनमिळावू असतो..चार लोकांप्रमाणे adjust करणारा असतो..फणसासारखाच काहींसाठी बरका तर काहींसाठी कापा..पण याच्या खोलात काय दडलंय हे देवालाही ठाऊक नसावं..अशी माणसं स्वत:च स्वत:ची वाट शोधत असतात..यांना फणसाप्रमाणे खोडावरही वाढता येतं..त्याला काय बाकी लोकांप्रमाणे फांदीचा आधार लागतोच असंही नाही..इथेही adjustment..बरं अशा माणसांना मी पणाची वाळवी सुद्धा लागत नाही हे बाकी लोकांना माहिती असतं..तो भाजीप्रमाणे चमचमीतही असतो आणि ग-यासारखा गोडंही..म्हणूनच त्याला फणसाप्रमाणे सगळे full वसूल करून घेतात..अगदी खोडासकट..अशा माणसांकडे सगळ्यांना द्यायला इतकं भरभरून असतं की अगदी शेवटची सालं जरी उरली तरी तो ती कुणाच्या तरी उपयोगालाच आणतो आणि तरीही बहरतो..आणि असा बहरतो की लोकं पुन्हा त्याच्याभोवती गोळा होतात...असं असूनही अशी माणसं आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही..हे म्हटल्यावर मला पु.लं चा 'व्यक्ती आणि वल्ली' मधला नारायण आठवला..स्वत:ची एक खास चव असणारा..
हे सगळं सुचलं कारण आज आमच्या घरच्या बागेतील अशाच स्वयंभू फणसाची भाजी केली..आमच्या बागेत हे आपोआप आलेलं झाड दर वर्षी उन्हाळ्यात आम्हाला भले मोठे फणस देतं...बाकी झाडांप्रमाणे आम्ही घेतोच काळजी त्याची पण उन्हाळ्याची चाहूल लागतात या उंच झाडाकडे पाहून "आईशप्पथ कसले भारी फणस लागलेत" एवढं आमचा त्याच्याशी संवाद सुद्धा त्याच्यामधे मूठभर मांस भरतो..आणि पुढल्यावर्षीच्या फणसाची तयारी हे झाड आधीच करतं..
अशी ही आजची मेजवानी "घरच्या फणसाची भाजी"..पोळी सोबंत तर मस्तंच पण नुसती खायलाही एकदम झकास...
Comments
Post a Comment