सापायन
आयुष्य अकल्पित आहे म्हणतात त्याची मागच्या गुरुवारी प्रचिती आली..
सकाळी सकाळी घरात एकच धांदल उडाली..
अचानक खालच्या मजल्यावरून सचिन ची हाक ऐकू आली..एरवी मारलेली नुसती हाक आणि आजची हाक यात फरक जाणवत होता..
एका खोलीच्या दारापाशी साप बसला होता..पूर्ण वाढ झालेला मोठा साप..सचिन पाहिल्यापासून प्राणी ,पक्षी आणि कीटक प्रेमी ..त्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं असेलच पण घरात साप आल्याचा आनंद नक्की झाला असेल..भीती नक्की वाटली नाही..
त्या हाकेचा उलगडा झाला..आश्चर्य, आनंद मिश्रित होती ती..😀..
मला सचिनने सापासमोर उभं राहून व्हिडिओ कॉल केला..खोलीतून महाशय आत गेलेले आणि बाल्कनी चं दार बंद असल्यामुळे त्याला टेकून थांबलेले ..वळवळ होतीच सुरु..
तेवढ्यात आमचे चिरंजीव उठले..त्यालाही प्राण्यांविषयी अत्यंत प्रेम आणि कुतूहल..भीती अशी नाहीच..त्याला म्हटलं 'साप आलाय घरात..बघायचा का तुला?"
एकदा का साप बघण्यात गुंग झाला की हा आवरायचा नाही..म्हणून त्याचं उठल्यानंतरचं पटपट आवरून झाल्यावर खाली गेलो.. तोपर्यंत साप महोदय पलंगाच्या फटीत जाऊन बसले..आम्हाला दिसले नाहीत..त्यावरून आमचे चिरंजीव ठाण मांडून बसले..मला आत जायचयं म्हणायला लागला.. कसंतरी त्याला समजावलं..दूध पी , ते साप पकडणारे काका आले की परत जाऊ खाली बघायला..
काहीवेळात सर्प मित्राचं आगमन झालं..ते जवळच होते म्हणून बरं..' लोकं जमवू नका ' अशी सक्त ताकीद दिली त्यांनी..नाहीतर साप आला म्हणून नव्या नवरीला बघायला लोकं येतात तशी लोकं आली असती..😄😄😄
खोलीचं दार लावून पलंग पुढे ओढून, अर्थातच त्यातले ऐवज बाहेर काढून मग एका कोपऱ्यात साप लपलेला दिसला..नशिबाने तो पलंगाच्या आत गेला नव्हता ,बाहेरच होता.. तरी हे सगळे सोपस्कार करावेच लागले..बरं घरात साप आलाय म्हंटल्यावर video काढायलाच हवा. त्यामुळे एकीकडे पलंग ओढ, गोष्टी सरकव करत कॅमेरामन चं कामही करावं लागत होतं..🤭..
शेवटी एकदाचा हाती लागला..सर्पमित्राने अतिशय सांभाळून एका कापडी पिशवीत त्याला ठेवलं.. तसा तो शांत झाला..कुणाला समजणारही नाही या पिशवीत साप आहे..आमच्या चिरंजीवांनी न घाबरता ती पिशवी उचलून बघितली..
वजनावरुन ती, पोटात अंडी असलेली सापाची मादी होती हे त्यांच्या लक्षात आलं..ते लहानपणापासून साप पकडत असल्यामुळे त्यांचा अभ्यास चोख होता..तस्कर जातीचा हा बिनविषारी साप होता..नशीब कुणी इच्छाधारी नाग आला नाही..अन्यथा हिंदी सिनेमा सारखं एखाद्या गरुड्याला पुंगी वाजवायला सांगावी लागली असती आणि मला सर्पनृत्य करावे लागले असते त्याला पाचारण करायला🤣🤣🤣🤣..
सर्प मित्राने बरीच माहिती दिली..वेगवेगळ्या जातीचे साप, त्यांची नावं..या ऋतूत कुठले साप सापडतात इत्यादी..आमची घरची बाग मोठी..तिथून साप महोदय दारातून चुकून वर आले.. बरं पाहण्यासारखे वर आले आणि घरभर पर्यटन करत बसेल नाहीत ते एक बरं झालं अन्यथा आम्हाला समजलंही नसतं..
साप आपल्या मुक्कामी गेला..सर्प मित्र सुद्धा..आणि आमच्यासाठी घरी काय उरलं..🤭🤭🤭
पसारा, धूळ... आवराआवर..
साप येऊन गेल्यामुळे एक फायदा असा झाला की..गेल्या कित्येक वर्षात जी साफ सफाई होऊ शकली नव्हती ती..झाली..जुन्या गोधड्या धुवायला काढल्या..पलंगाच्या मागून व्यवस्थित झाडून पुसून घेतलं गेलं..आमच्या घरी काम करणाऱ्या मावशींना त्यादिवशी ध्यानीमनी नसतानाही काम जास्त करावं लागलं..🤣🤣🤣 ' दादा तो साप इथेच राहत असणार पलंगाच्या मागे , आपल्याला समजलं नसेल्फ या त्यांच्या ' हुश्शार ' तर्काला सचिन ने कोपरापासून नमस्कार केला.🤣🤣🤣
साप आल्या मुळे काहीतरी चांगलं घडलं..आमच्या घरात ही साफसफाई व्हावी यासाठी साक्षात सापाला यावं लागलं..
पुन्हा कुठला साप अवतरू नये यासाठी आता घर अधिक स्वच्छ ठेवायला हवं..
कुणाचं काय तर कुणाचं काय.🤣🤣🤣🤣🤣...
- गौरी
gauripawgi.blogspot.com
#snakerescue
#indiansnake
#snakerescueteam
#snakerescueoperation
#SnakeFacts
#snakefriends
#snakefriend
Comments
Post a Comment