साधना ताई आणि 'समिधा'

    साधारण 18 वर्षांपूर्वीची गोष्ट..माझे वय वर्ष 14..इयत्ता नव्वीत..त्या वेळी माझे बाबा नागपूर येथे नोकरी निमित्त कार्यरत होते..दिवाळीच्या सुट्टीत मी आणि आई नागपुर ला गेलो..ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांनी वरोरा येथे वसवलेल्या आनंदवन ला भेट द्यायची माझ्या बाबांना खूप इच्छा होती. थेट संबंध नसला तरी वाचनाच्या माध्यमातून आणि त्या आधीपासून गेली अनेक वर्ष माझे आजोबा, बाबा आनंदवन ला जमतील तशा फूल ना फुलाची पाकळी स्वरूप देणग्या नक्की पाठवत असत..आणि त्याचा अभिप्राय म्हणून डॉ.विकास आमटे यांच्या सुरेख हस्ताक्षरातले पत्र आजोबांना येत असे..आमच्याकडे सुद्धा अभिप्राय म्हणून आनंदवनातून तेथील रहिवासियांनी हाताने तयार केलेले भेट कार्ड येत असे..
  अशा या सुंदरशा आनंदवन ला भेट देण्याचे आमचे नक्की ठरले..एका स्नेह्यांच्या ओळखीने वार्तालाप करून एक रात्र राहण्याची सोयही तिथेच  झाली..आई-बाबा आणि मी, बस ने आनंदवन ला पोहोचलो..राहण्याच्या ठिकाणी सामान ठेवल्यावर एका स्थानिकाने आनंदवन शी आमचा परिचय करून दिला..रुग्णालयं..वेगवेगळे प्रकल्प, शेती, टाकाऊतून टिकाऊ ते अगदी भूकंपापसून सुरक्षा म्हणून स्वत: तयार केलेली घरं..असं सगळं पाहून आम्ही भारावून गेलो..
दुपारी तेथील भोजनालयात डॉ.विकास आमटेंसोबत एकत्र बसून साधं आणि चविष्ट जेवण जेवलो.
तेव्हा योगायोग असा जुळून आला की खुद्द बाबा आमटे आणि साधना ताई तेव्हा आनंदवनात होते..स्वाभाविकंच, त्यांना भेटायची इच्छा आम्ही व्यक्त केली..
आम्ही त्यांच्या निवासस्थानी गेलो..बाबा आणि ताईंनी आत बोलावले..आम्ही आत गेल्या गेल्या, खुर्चीवर बसलेल्या साधना ताई उठल्या आणि नमस्कार करून त्यांनी आमचं स्वागत केलं..आम्ही कोण,कुठून आलो, माझे बाबा कुठे कार्यरत आहेत ते अगदी माझं नाव काय मी कितवीत शिकते हे सगळं ताईंनी आपुलकीने विचारलं..बाबा पलंगावर आडवे टेकून गप्पा मारत होते..आम्ही ताडोब्याच्या जंगलात जाऊन आलो हे कळताच बाबा आमटेंनी विचारलं," वाघ दिसला का?" आणि आमचं 'हो' हे उत्तर ऐकून त्यांना मोठं आश्चर्य वाटलं..ताडोबाच्या पहिल्या भेटीत आम्हाला वाघ दिसला हे ऐकून "वा, नशीबवान आहात तुम्ही"..असं म्हणाले..ताईंनाही आनंद झाला..ताईंचं प्रेमळ हसरं व्यक्तीमत्व मला अजून आठवतं..इतक्या मायेने त्यांनी आमचं स्वागत केलं..इतक्या मृदु स्वरात त्यांनी केलेली चौकशी..नवीन कुणी भेटल्याचा आनंद चेह-यावर आणि डोळ्यात लख्ख दिसत होता..एवढ्या लांब आनंदवन ला खास येऊन खूप कमी लोकं भेट देतात पण तुम्ही आलात असं म्हणून त्यांनी कौतुक केलं..
तेव्हा मी नव्वीतली अल्लड मुलगी..मला बाबा आणि ताईंच्या एवढ्या मोठ्या कार्याबद्दल कितीशी माहिती असणार?..पण तेव्हा भेटलेल्या ताई माझ्या आजन्म स्मरणात राहतील..
अशा असामान्य व्यक्तीमत्वांची साधना एवढी विलक्षण असते की त्यांचा काही काळ सहवास मिळाला तरी आपण नकळत भारावून जातो..
ही साधना ताईंची 'साधना' त्यांनी पुस्तक रुपात सगळ्यांपुढे आणली ती 'समिधा' च्या रुपाने..आईने वाचनालयातून आणलेलं 'समिधा' सहज हातात घेऊन मी वाचायला सुरुवात केली आणि थांबले ती पुस्तक पूर्ण करूनंच. मराठी वाचनाची मला गोडी लागली ती 'समिधा' मुळेच..मराठीतील मी सर्वात पहिलं पुस्तक वाचलं ते ताईंचं 'समिधा'..तेव्हा मराठी वाचनाचा श्रीगणेशा झाला आणि तो 'समिधा' मुळे झाला या बद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते..बाबा आणि ताई कोण आहेत..त्यांचं कार्य गगना एवढं विशाल आहे..आपण आनंदवन ला जाऊन साक्षात देव माणसांना भेटून आलो याची मला 'समिधा' वाचत असताना जाणीव झाली आणि मी नतमस्तक झाले..'समिधा' आपल्यापैकी ब-याच जणांनी वाचलं असेलही..मात्र नसेल तर आवश्य वाचावं..
सद्ध्या, ज्येष्ठ लेखिका सौ.मृणालिनी जोशी यांनी लिहिलेलं 'आलोक' वाचते आहे.. त्यातलं एक वाक्य  मला फार भावलं.. त्यांनी हे शब्द कविराज कुसुमाग्रज यांच्या पत्नी बद्दल लिहिले आहेत..ते वाचताना मला साधना ताईंची आठवण झाली..
मृणालिनी ताई लिहितात,"तळवे जाळणा-या रणरणीत वाळवंटातून आपल्या असामान्य पतीच्या बरोबरीनं चालणं नि त्या आपल्या माणसाच्या माथ्यावर मायेची छत्र सावली धरणं फार फार अवघड."
आज 9 जुलै, साधना ताईंची 9 वी पुण्यतिथी..या निमित्ताने माझ्या 2 ओळी त्यांच्या चरणी अर्पण करते आणि त्यांना विनम्र अभिवादन करते..

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....