पाहुणा

 आमच्या घरच्या बागेत झाडं पुष्कळ..वावरायला भरपूर जागा..मांजरं-लहान मोठे पक्षी-फुलपाखरं हे आमच्याकडे रोज येणारे पाहुणे..खरं तर त्यांना पाहुणे म्हणणं चुकीचंच..हे अवघं विश्व त्यांचं घर..त्यांनी केव्हाही आणि कुठेही मुक्त विहार करावा..अगदी मनमुराद..
  साधारण वर्षा दीड वर्षा पूर्वीची गोष्ट..माझे नृत्य वर्ग घरातच तळ मजल्याला..अगदी बागेला आणि अंगणाला लागून..येण्याजाण्याला तसं बंधन नाही..नेहमेप्रमाणे मुलींचा वर्ग सुरू होता..तेवढ्यात बाहेरून कणी चालत असल्याचा आवाज आला आणि अचानक समोर देव प्रकट व्हावा तसं बाहेरुन टुणकन उडी मारून एक मांजरीचं पिल्लू आत आलं..आम्ही सगळ्या..मी आणि माझ्या विद्यार्थिनी क्षणभर दचकलो..पण ते छोटंसं गोंडस पिल्लू पाहताक्षणी त्याच्या प्रेमात पडलो..आवाजाची दिशा हेरत हे पिल्लू आत आलं होतं..अजिबात न घाबरता जणू काही जन्मो जन्मीचा संबंध असावा असं ते आमच्यापाशी आलं..माझ्या सगळ्या विद्यार्थिनी प्राणी प्रेमी..त्यामुळे कुणालाही,  त्या न कळवता आलेल्या पाहुण्याचा त्रास नाही झाला..(न कळवता येणा-या पाहुण्यांचा अनुभव सगळ्यांना असेलच)उलटं क्लास राहिला बाजुला आणि या पिल्लामागेच आमचा बराचसा वेळ गेला..ते जसं आलं तसं थोड्यावेळाने निघूनही गेलं..
     दुस-या दिवशी वर्ग सुरू झाले तसं मुलींनी विचारलं..ताई, पिल्लू दिसलं का गं परत?..माझ्या मनात आलं त्याला साद घालून पहावी..म्हणून मी आपलं उगाच "मनीssss" असा आवाज दिला..कसं कोण जाणे ते पिल्लू पुन्हा टुणकन उडी मारून आत आलं..आणि क्रमा क्रमाने आमच्या सगळ्यांच्या मांडीवर थोडा थोडा वेळ येऊन बसलं..नृत्यवर्ग सुरू नसताना सुद्धा दुस-यादिवशी मी सहज म्हणून खाली गेले. त्या पिल्लाची कुठेच चाहूल नव्हती. तरी मला रहावेना म्हणून मी हाक मारली.."मनीssss"..आणि खरोखरंच माझ्या सादेला ओ देत ते पिल्लू
प्रकट झालं..त्यानंतर जेव्हा जेव्हा ते पिल्लू आसपास नसताना मी साद घातली तेव्हा तेव्हा ते पिल्लू आत आलं..4-5 दिवस तरी ते पिल्लू आमच्या आंगणात येत जात होतं..नृत्यवर्गाच्या वेळीही येत असल्यामुळे माझ्या मुलींचा वेळ नृत्यात कमी आणि त्या पिल्लाशी खेळण्यातच गेला.. 
   4 ते 5 दिवस काही मिनिटं..पण त्या पिल्लाचा सहवास आम्हाला काय देऊन गेला? निखळ आनंद..त्यानंतर ते पिल्लू मला कधीही दिसलं नाही...बोलावल्यावर आलंही नाही..
त्या इवल्याशा पिल्लाला काय हवं असणार? आनंदाने उडी मारून यायचं आणि अतिशय शांतपणे डोळे मिटून ते मांडीवर बसायचं आणि यायचं तसं निघूनही जायचं..पण त्याने इथेच असावं, जाऊच नये असं वाटायचं. 
  'प्राणी'...प्राण धारी..खरंच किती संयुक्तिक शब्द आहे..प्राण आहे तो खरा या 'प्राण्यांमधे'...निसर्गाकडून मिळालेल्या 'प्राण'या वरदानाचं मूल्य फक्त प्राण्यांनच ठाऊक असतं..प्राण कशासाठी? निरपेक्ष प्रेम करणं..स्वत: आनंदी राहणं आणि जिथे जाऊ तिथे आनंद पसरवणं..या त्रीसूत्रींचा अवलंब केवळ आणि केवळ हे प्राणीच तर करत असतात..
मनुष्य प्राणी असंच म्हटलं जायचं आधी..पण त्यातल्या 'प्राणा'चं प्रयोजन संपलं आणि उरला तो यंत्र रूपी मनुष्य..केवळ मनुष्य...
   आमच्यात आता नसलेला आमचा भूभू बूझो काय किंवा हे छोटंसं मांजरीचं पिल्लू काय..हीच त्रीसूत्री घेऊन हे निरागस जीव जगतात..
   1. निरपेक्ष प्रेम
   2. आनंदी राहणं 
   3. जाऊ किंवा असू तिथे आनंद पसरवणं..

असा हा खास पाहुणा आलेला कुणाला आवडणार नाही?

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....