द काश्मीर फाईल्स : एक दर्जेदार कलाकृती

  'काश्मीर फाईल्स' ची चर्चा आज सर्वत्र होते आहे. कुणी कितीही नावं ठेवो , propaganda म्हणो पण जो परिणाम साधायचा, तो या सिनेमा ने नक्की साधलाय. एखादी कलाकृती लोकांच्या वैचारिक पातळीपर्यंत किती परिणामकारक ठरू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'काश्मीर फाइल्स'. एक कलाकृती म्हणूनही ती तितकीच दर्जेदार आहे हे निर्विवाद आहे. कलेचा थेट परिणाम समाज घडवून आणण्यासाठी होतो हे काश्मीर फाइल्स ने सिद्ध केलं आहे. A rated सिनेमा असल्यामुळे वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्यांनीच तो पाहायचा आहे मात्र एकूण चित्र असं आहे कि या सिनेमाची चर्चा अठरा वर्ष वयापेक्षा लहान असलेल्यांमध्येही तितकीच होत आहे. नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता लहान मुलांमध्येही दिसत्ये. सिनेमा , हे क्रांती घडवून आणण्याचं एक सशक्त माध्यम आहे हे काश्मीर फाइल्स ने दाखवून दिलं आहे.
  विवेक अग्निहोत्री यांनी पात्र निवड अतिशय उत्तम केलेली आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि डिजिपी हि चारही पात्र उत्तम साकार केली आहेत. 
सिनेमा मध्ये प्रत्येक पात्राची एक आपली कहाणी आहे. IAS व DGP पदावर कार्यरत असूनही असमर्थ ठरलेले ब्रह्मा दत्त व हरी नारायण , मिथुन चक्रवर्ती व पुनीत इस्सर यांनी प्रभावीपणे रंगवले आहेत. मीडिया पुढे हतबल झालेला पत्रकार विष्णू व त्याहूनही असमर्थ ठरलेला डॉ .महेश अनुक्रमे अतुल श्रीवास्तव व प्रकाश बेलवडी यांनी तितकाच उमदा साकारला आहे. या सगळ्यांनी एकत्र येण्याचं कारण पुष्करनाथ पंडित व त्यांचं कुटुंब, त्यावर झालेला अन्याय..त्यांच्या कुटुंबातला सदस्य कृष्ण पंडित याला वास्तवाचं भान टप्प्याटप्प्याने आणून देताना या सर्वांना होणाऱ्या वेदना , या कमीत कमी संवादातून दाखवायची दिग्दर्शकाची दृष्टी अतिशय उत्तम आहे. परिस्थितीपुढे हतबल झालेली ही मंडळी आणि एवढी वर्ष , आपण काहीही करु शकलो नाही याचा सल , आपल्या मित्राला न्याय मिळवून देऊ शकलो नाही हि अपराधीपणाची भावना, या सर्वांनीच आपल्या कामातून चोखपणे पोहोचवायचा प्रयत्न केलाय. 
  या सगळ्यांना सांभाळून घेत एक  
कर्तव्यदक्ष स्त्री , एवढ्या वर्षानंतर कृष्णा घरी येणार याचा तिला एकीकडे आनंद सुद्धा आहे , पण एकीकडे सत्य माहिती असून या मुलाला आपण सांगू शकत नाही ही सलही आहे, हि द्विधा मनस्थिती मृणाल यांनी छान दाखवली आहे. 
या सिनेमातली तीन प्रमुख पात्र, फारुख मलिक बिट्टा, पुष्करनाथ आणि कृष्णा पंडित.
  बेछूटपणे लोकांचे जीव घेणारा बिट्टा , या सगळ्या भीषण परिस्थिती ला एकटा तोंड देत घरातला ज्येष्ठ म्हणून कर्तव्य बजावणारा पुष्करनाथ, आणि सतत खरं काय आणि खोटं काय हे समजून घेत सत्य लोकांपुढे आणणार कृष्णा...सिनेमाच्या प्रत्येक नवीन दृश्यात या लोकांची एक वेगळी बाजू समोर येत राहते..
देहबोली व हावभावांचा वापर अनुपम खेर, चिन्मय मांडलेकर व दर्शन कुमार यांनी ताकदीने केलेला दिसतो..या भूमिका करताना एकूण विषयाचा सखोल अभ्यास सगळ्यांनी केलेला जाणवतो, कुठेही नक्लीपण डोकावत नाही. सर्वात शेवटच्या दृश्यात, शारदाचे कपडे फाडणारा बिट्टा ज्यांनी साकारला ते चिन्मय मांडलेकर , यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराज साकारले असताना किती स्थिर बुद्धीने हि दृश्य रंगवली असतील याचा विचार करून अंगावर काटा उभा राहतो.
अनुपम खेर यांनी, काश्मीर सोडतानाचा पुष्करनाथ ते डिमेन्शिया ने ग्रस्त आयुष्याचा अंत स्वीकारणारा पुष्करनाथ या छटा दाखवताना अक्षरशः जीव ओतला आहे. 
कॉलेज चा एक होऊ घातलेला नेता, सतत आझादीचे नारे ऐकणारा, संभ्रम अवस्थेत गेलेला, आपल्या अजोबांच्या अस्थी घेऊन काश्मीर ला गेलेला व तिथून परत येताना स्वतः ला अंतर्बाह्य बदलून आलेला कृष्णा पंडित, दर्शन ने अतिशय मेहनत घेऊन रंगवला आहे. 
या सगळ्यात दोन पात्र लक्षात राहतात एक म्हणजे शारदा पंडित व दुसरी म्हणजे राधिका मेनन..हि पात्र रंगवणाऱ्या दोन ताकदीच्या अभिनेत्री, भाषा सुम्बली आणि पल्लवी जोशी. 
डोळ्यादेखत नव-याची गोळ्या झाडून हत्या पाहणारी, रक्ताने माखलेले तांदूळ , आपल्या उर्वरित कुटुंबाच्या सुरक्षेकरता गिळणारी, या सगळ्यातुन पटकन सावरलेली आणि एक कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून खमके पणाने उभी राहणारी शारदा , भाषा ने अप्रतिम साकारली आहे. परिस्थितीला येईल तास तोंड देताना एकीकडे मुलांचा सांभाळ व सासऱ्यांना होणारा त्रास बघत जगणाऱ्या शारदा सारख्या स्त्रिया असतात हे पाहून डोळे पाणावतात . या सिनेमामुळे भाषा सुम्बली सारखी ताकदीची कलाकार प्रकाश झोतात आली हे उत्तम झालंय. 
बालकलाकार पल्लवी जोशी, अंताक्षरी व सारेगमप चं सूत्र संचालन करणारी पल्लवी जोशी, अल्पविराम सारख्या मालिकेची नायिका ते tashkent files व काश्मीर फाइल्स या महत्वाच्या घटनांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणारी पल्लवी जोशी, असे अनेक पैलू तिच्या व्यक्तिमत्वात आहेत. विवेक अग्निहोत्री यांची पत्नी म्हणून नव्हे तर खरोखर एक उत्तम अभिनेत्री असल्यामुळे ती या दोन्ही सिनेमात आत्मविश्वासाने वावरली आहे. इंग्रजी ,मराठी व हिंदी या तीनही भाषांवर प्रभुत्व, उत्तम उच्चार, संवादफेक या जमेच्या बाजूंमुळे..विद्यार्थ्यांच्या मनात आझादी व इतर चुकीच्या संकल्पना एकाप्रकारे वशीकरण करून डोक्यात कोंबणारी राधिका मेनन हे नकारात्मक पात्र साकारून पल्लवी जोशीने पुन्हा एकदा आपलं अभिनय सामर्थ्य दाखवून दिलं आहे.
   चित्रपटातल्या क्लेशदायक दृष्यांबरोबरच काश्मीर दर्शन घडवणारी काही सुंदर दृश्य आहेत. त्यामुळेच दैवी निसर्गसौंदर्य लाभलेल्या या भागात एकदा तरी जात यावं असं वाटल्यावाचून राहत नाही. दिग्दर्शकाने हे अगदी विचारपूर्वक केलेलं आहे. एवढा भीषण नरसंहार जिथे झालाय अशा ठिकाणी कधीच जाऊ नये असं मुळीच वाटत नाही. काश्मीर हा भारताचा भाग आहे, आणि भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर सर्वार्थाने कसा समृद्ध आहे हे दिग्दर्शक सांगायला विसरलेला नाही. कृष्णा च्या शेवटच्या भाष्यात काश्मीर सारखा संपन्न प्रांत हा आपल्या देशाचा भाग होता , आहे आणि राहील हे दिग्दर्शक अधोरेखित करतो. धारा ३७० रद्द झाल्यामुळे आपल्या देशाला काय मिळालं याची जाणीव एक भारतीय म्हणून आपल्याला होते. 
चित्रपटाच्या सर्व तांत्रिक बाजू या एखाद्या पर्वताप्रमाणे त्यातील आशयाला सतत सांभाळून घेतात व एक कलाकृती म्हणून चित्रपटाचा दर्जा उंचावतात.
चित्रपट गृहातून बाहेर पडताना एका सुन्न मनस्थितीत आपण बाहेर पडतो. पण इथे निराशावादी नक्की वाटत नाही. उलट १९ जानेवरी १९९० ते मार्च २०२२ पर्यंतच्या घडत गेलेल्या देशातल्या घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात व निराशावादाकडून एक आशावादी भारत देश , एक सक्षम भारत देश असा प्रवास आपण करून येतो. 
तीन तासात हे सगळं मांडणारी, 'काश्मीर फाइल्स' ही निर्विवाद एक दर्जेदार कलाकृती आहे.

Image source: google 

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....