पाऊस...

पाऊस...या एका शब्दामधे किती काही भरून राहिलंय...नवी उम्मेद, नवा उत्साह..नवतेचा संबंध पावसाशीच जुळलेला.. पावसाळा हा एकमेव असा ऋतू आहे ज्याची सर्वच जीव आतुरतेने वाट बघत असतात... कधी तो न सांगता एकदम surprise द्यायला येतो..तर कधी आत्तासारखं..केव्हा पडेल याची उत्सुकता ताणून धरतो..तो लांबवर दिसणारा काळा ढग..तिथूनच उत्सुकता ताणली जाते.. पावसाशी वेगवेगळ्या वयाचं वेगवेगळं नातं आहे.. लहानपणी तर खासंच.. शाळेत असताना तर पावसाळ्याच्या दिवसात, जून महिन्यात शाळा सुरू व्हायची..पाऊस पडल्यामुळे मातीचा सुवास जसा हवा हवा वाटतो तसंच नवीन पुस्तकांचा, वह्यांचाही वास हवा हवासा वाटायचा..नवीन वर्गात, नवीन इयत्तेत..मित्र मैत्रिणी मात्र तेच हवे असायचे, यातच नवीन मित्रांची सुद्धा भर पडायची.. रेनकोट घालून पावसात सायकल चालवत , चिखल उडवत, थोडं भिजून, थोडं कोरडं राहून शाळेत पोहोचायला किती मजा यायची..घरातून निघताना एकटं, वाटेत मित्र मैत्रिणींचा टोळका भेटायचा आणि त्याच उत्साहात कधी शाळेत पोहोचलो कळाचं सुद्धा नाही..चालत गेलो, तरीही मजा, हळूच एखाद्या डबक्यात सगळ्यांनी उडी मारायची..तेव्हा कुठे स्वच्छ पाणी आणि घाण पाणी हा फरक कळायचा.. ..लहानपणी कुठे चिंता असायची, पावसात भिजलो तर आजारी पडू..आणि पडलो तर पडलो, आई आहे की! किती निवांत विसावता यायचं आई-बाबांच्या खांद्यावर..मनमुराद भिजता यायचं.. आता तितकं मनमुराद भिजता येत नसलं तरी पावसाशी संवाद मात्र थांबलेला नाही..बाहेर संततधार लागली की खिडकीपाशी येऊन उभं रहायचं, चहाचा किंवा कॉफी चा मग हातात धरायचा आणि एक एक घोट घेत पावसाशी मनमुराद संवाद साधायचा..हे नातं खासंच.. पावसाळी पर्यटन हे अजून एक नातं..खोल दर्या, धबधबे, हिरवीगार झाडी, त्यातच आपले सवंगडी असलेले प्राणी-पक्षी.. इतर नाती तयार करावी लागतात, पण पावसाकडे काही क्षण पाहिलं तरी
त्याच्याशी नातं तयार होतं.. पावसाचं आणि आपलं नातं असं आहे जे कितीही प्रयत्न केला तरी आपल्यापासून कुणी हिरावून घेऊच शकत नाही.. कधीतरी आपल्यासारखाच,पाऊसही रुसून बसतो..कधी थंडी रुसली किंवा ऊन रुसलं असं ऐकलंय का? पण पाऊस रुसला की मात्र जिवाला घोर लागून राहतो..जणू काही आपलंच माणुस कुठेतरी हरवलंय..पण एकदा का पाऊस आला की त्याच्या प्रेमात ओलंचिंब होण्याची मजाच काही वेगळी..अगदी प्रत्यक्ष पावसात न भिजता सुद्धा..वातावरणात आलेला सुखद गारठा , प्रत्येक पान अन पान टवटवीत.. पाऊस हा एकमेव असा ऋतू आहे ज्याने पंचेंद्रीय सुखावतात..रम्य निसर्ग सृष्टी पाहणं, अचानक नजरेत भरलेला इंद्रधनुष्य, पावसाचा , वाहत्या पाण्याचा आवाज ऐकणं , मातीचा सुवास, गार वार्याची झळूक अनुभवणं, सोबत गरमा गरम भजी कशी विसरता येईल.. आणि हो..मनालाही सहावं इंद्रीय म्हणतातच की, ते तर सर्वात जास्तं सुखावतं..केवढ्या आठवणी घेऊन येतो पाऊस..लहानपणच्या, कॉलेजच्या, ट्रेक च्या, long drives च्या, रुसव्या फुगव्या च्या, आपल्या मुलांसोबत खेळतानाच्या, propose च्या आणि breakup च्या सुद्धा.. पावसाने निसर्ग सृष्टी जशी ताजीतवानी होते तसं आपलं मनही..आपणही त्या सृष्टीतलेच एक घटक नाही का?.. पावसाला एवढीच प्रार्थना..तू बरसत रहा..तुझ्या जिवावर तर आम्ही या अशा सुखद आठवणी तयार करतो..आणि त्यामुळेच जगण्याला नवीन अर्थ मिळतो... 🥰🥰🥰🥰🥰🥰

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....