कृतज्ञता

आमच्या घरासमोरंच बंगल्याचं बांधकाम सुरू आहे..येता जाता तर नजर पडतेच त्यावर रोज पण आज तिथे सकाळी लहानग्यांना खेळताना पाहून काही आठवणी जाग्या झाल्या.. हे माझ्या लहानपणच्या दिवसांचं..आम्ही,म्हणजे आई-बाबा आणि मी, नुकतेच बदलापूरला नवीन घरात रहायला गेलो होतो..मी असेन पहिली-दुसरीत..जे flats तयार होते त्याचं possession दिलं गेलेलं..आम्हीच सोसायटीत पहिले रहायला येणारे..बाकी घरं अजून पूर्ण व्हायची होती.. दिवस शाळेत आणि अभ्यासात निघून जायचा..प्रश्न उरायचा संध्याकाळचा..कुणासोबत खेळू..माझ्या वयाचं आजुबाजुलाही कुणी दिसेना.. कशी ते आता आठवत नाही, पण माझी ओळख लक्ष्मीशी झाली..इमारती चं बांधकाम करणार्या लोकांपैकी एका कुटुंबातील ही मुलगी..माझ्याहून थोडी मोठी असावी..ती आणि तिचा लहान भाऊ दोघे खेळताना दिसायचे..कशी कुणास ठाऊक, मी सुद्धा त्यांच्या सोबत खेळायला लागले..आई बाबांनीही कधी मला आडवलं नाही..लक्ष्मी कधी कधी भातुकली खेळायला घरी सुद्दा येत असे.. माझे काही फ्रॉक्स आईने तिला वापरायला म्हणू दिलेले..ते घालून तिला माझ्यासोबत खेळायला खूप मजा यायची.. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मी आजोळी गेले, परत आले तेव्हा संपूर्ण सोसायटी भरली होती..सगळे स्थायिक झालेले..नवीन मैत्रिणी भेटल्या..लक्ष्मी काही नंतर दिसली नाही..तिची आठवण मात्र यायची.. अशी मधे बरीच वर्ष लोटली..मध्यंतरीच्या वर्षात माझ्या बाबांची नाशिकला बदली झाली आणि आम्ही तिघेही 2 वर्षांकरता तिथे स्थायिक झालो.. 2 वर्षांनंतर आम्ही पुन्हा आमच्या घरी, बदलापूरला परत आलो..आमच्या इमारतीच्या मागे नवीन इमारत तयार होत होती..आणि काय योगायोग असावा.. पुन्हा तेच कामगार होते..आणि पुन्हा एकदा लक्ष्मी भेटली..साडी नेसलेली, कपाळावर मोठं कुंकू, गळ्यात मंगळसुत्र आणि...आणि कमरेवर एक बाळ!!! माझ्या माहिती प्रमाणे ती माझ्यापेक्षा काही फार मोठी नव्हती..मी तेव्हा 13 वर्षांची होते म्हणजे ती 15-16 असावी.. माझ्या त्या वयाला ही गोष्ट न पेलणारी होती..वयाने साधारण सारख्या दोघी..कधी काळी एकत्र भातुकलीचा खेळ खेळलेलो..आज ही माझी मैत्रीण माझ्यासमोर या वेषात..नंतर असं समजलं की नवरा तिला टाकून न सांगता निघून गेलेला.. सद्ध्या ती आई वडिलांसोबतच राहत होती.. माणुस कुठल्या परिस्थितीत जन्माला आलाय यावरून त्याचं आयुष्य ठरतं हे कळून चुकलं मला तेव्हा.. एकीकडे मी होते..शाळेत जाऊन शिक्षण घेणारी, खेळणारी, माझ्या वयाच्या मुलींप्रमाणे वागणारी,.. तर दुसरीकडे लक्ष्मी...कधी माझ्याचसोबत खेळणारी आणि आता न कळत्या वयात हे जबाबदारीचं आयुष्य जगू पाहणारी.. हा प्रसंग आठवला की कृतज्ञतेत राहण्याचं महत्व समजतं..'कृतज्ञता'...gratitude... आपल्याकडे काय आहे यापेक्षा आपल्याकडे काय नाही याला आपण जास्तं महत्व देतो..मनुष्य स्वभाव, दुसरं काय..या बद्दल आपण अनेक motivational speakers ना ऐकलं असेल..पण प्रत्यक्ष कृतीत उतरवणं कठीणच ..कारण आपण फक्त आपली परिस्थिती न्याहाळत असतो, आरशासारखी..आणि आरशात आपल्याला अर्थातच आपलं प्रतिबिंब दिसतं..पण कल्पना करा आरशात एकिकडे आपण आणि समोर आपण नसून आपल्याच वयाची पण वेगळ्या परिस्थितीतील एखादी 'लक्ष्मी' उभी राहिली तर.. मग आपल्याला जाणवेल की आज आपण आपल्या आयुष्यात किती तक्रार करण्याजोगं काहीही नाही ..आपलं शरीर, अन्न, पाणी , घर, वस्त्र, आपली माणसं, आपल्या जवळच्या वस्तू..यादी न संपणारी आहे..या सगळ्या बदद्ल दिवसातून एकदा तरी ही कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे..आपण नशीबवान म्हणून या सर्व गोष्टी आपल्याजवळ आहेत..आणि याऊपरही जर का असं वाटलं की हे माझ्या आयुष्यात नाही तर अशाच एखाद्या 'लक्ष्मी' ला आठवून बघा..

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....