मृत्यूचा सोहळा

 
मृत्यू' या एकमेव शब्दापाशी आपलं आयुष्य घुटमळत असतं..जगण्याचा विचार किती करतो आपण? कमीच करतो खरं..मरणाचा विचार जास्त करतो. 'काही झालं तर?' हा विचार करणारी जमात एकीकडे तर 'काही होत नाही', असा परस्पर विरोधी विचार करणारे दुसरीकडे.. पण सगळ्याच्या मुळाशी एकच...मृत्यू...
खरं तर जगणंच महाकठीण, मृत्यू सोपा..एका क्षणात सगळं थांबतं...जाणाऱ्यापाशी काही उरत नाहीच..आपण जातो.. ४ ओळखीतली माणसं येतात..सगळं उरकलं जातं ..सगळे घरी जातात... मात्र, मी काय काम केलंय याचा जेव्हा विसर पडतो तेव्हाच मृत्यू होतो. प्रश्न हा आहे की जाणारा काय देऊन गेलाय ..जे असं काही देऊन गेले आहेत, त्याचा मृत्यू हा दुःखद होऊच शकत नाही, कारण केवळ देह रुपानेच ते आपल्यात नसतात. इतरांचं 'जगणं' हे खरंच 'जगणं' व्हावं असं काहीतरी एखाद्या कडून त्याच्याही नकळत होतं..अशी अद्वितीय व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा त्यांच्या मृत्यूचा होतो तो सोहळा..
लता बाई निवर्तल्या..यावर अजूनही विश्वास बसत नाही. बसूच नये..कारण लता बाईंचा अजरामर ठेवा आपल्यापाशी आहे ..त्या स्वतः रित्या गेल्या...मात्र आपल्यासारख्यांची ओंजळ भरून ती अखंडपणे वाहती राहील असा अमूल्य ठेवा देऊन गेल्या..त्या दिवशी लता बाईंची अंतयात्रा, अंत्यविधी, तोफांची सलामी पाहताना सर्व सोहळ्याप्रमाणे वाटलं. जगभरात त्यांच्या निधनाची दखल घेतली गेली. लता बाई होत्या , आहेत आणि कायम राहणारच आहेत. 
अशा अजरामर व्यक्तींपैकी काही थोर व्यक्तींची इथे आठवण आल्याशिवाय राहत नाही.
 पु. ल .देशपांडे गेले २००० साली..वर्तमानपत्रात ते गेल्याची बातमी सुद्धा याच शब्दात होती.. 'पुलं गेले'..अगदी एखादी परिचयाची व्यक्ती जावी आणि तिच्या निधनाची बातमी आपण कुणाला सांगावी इतका सोप्या शैलीत. हा साधेपणाच पुलंनी जपला आणि त्याच साधेपणाने साहित्यनिर्मिती केली..
  पंडित भीमसेन जोशी साक्षात स्वरभास्कर ..सूर्याला कुठलाही मुखवटा धारण करावा लागत नाही. त्याचं असणं स्वच्छ, लख्ख , तेजस्वी.. अगदी तसंच भीमसेनजींचं ..पंडितजींना देवाज्ञा झाली तेव्हा 'लागली समाधी' या शब्दात वर्तमानपत्रात बातमी वाचलेली आठवते. तपस्वी महामुनींनी समाधी घेणं आणि भीमसेनजींनी जाणं हे समानच होतं.
  अलिकडे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे गेले तेव्हा त्यांचं अखेरच्या दर्शनाला लोटलेला जनसमुदाय, शिवशाहीर पद समर्थपणे भूषवल्यामुळे निर्माण झालेलं तेज , हे सगळं त्या वातावरणात भरून राहिलेलं जाणवलं ..बाबासाहेबही गेले नाहीत आणि शिवछ्त्रपती सुद्धा कुठेही गेलेले नाहीत याची जणू ग्वाही होती ती. 
या तेजस्वी व्यक्तिमत्वांपाशी येऊन मृत्यू सुद्धा गोंधळला असावा. त्यालाही यांच्या आज्ञेशिवाय त्यांना नेता आलंच नसेल कदाचित. खुद्द मृत्यूलाच जिथे आज्ञेत रहावं लागलं असेल अशांच्या मृत्यूचे सोहळे झाले नाहीत तर नवल.
जिवंतपणी प्रत्यक्ष पाहता आलं नाही किमान जाताना तरी दर्शन मिळावं याकरता धडपड करताना जनसागर लोटतो आणि दिसतो आणि आठवणीतही राहतो तो मृत्यू सोहळा.
 विचार करण्याजोगी गोष्ट आहे. आपल्याला या कुणाच्याही नखाची सर नाही. आपण कायम लांबून सूर्याचं घेतो तसं यांचं दर्शन घेऊ शकतो. 
 मृत्यू सोहळा झाला नाही तरी चालेल मात्र आपलं जगणं सोहळ्यासारखं करायचा किमान प्रयत्न करता आला तरी आयुष्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल.
Images: google

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....