झोप आणि तिचे प्रकार..

आज मराठी भाषा गौरव दिवस ..तेव्हा म्हटलं मराठीत तर आपण लिहितोच मग सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आज लिहावं...झोsssssपsss..कसं बरं वाटलं कि नाही वाचून..?
या विषयावर लिहिण्याचा विचार येताच जांभया यायला लागल्या बघा. मला खात्री आहे ,वाचकांना सुद्धा हाच अनुभव शीर्षक वाचताच येऊ लागेल.. विचार केला तर काय कमालीचा प्रकार आहे ही झोप...!!! संपूर्ण निद्रिस्त व्हायचं , डोळे मिटायचे, संपूर्णपणे आपल्या विश्वात जायचं , सगळ्या जगाचा विसर पडू द्यायचा. 
  थेट काही एक वेळाने पूर्ण ताजं तवानं जागं व्हायचं. देवाने एवढं काही निर्माण करून ठेवलंय पण त्यापैकी सर्वात अद्भुत मला झोप वाटते. अजून एक म्हणजे ती निसर्गाचीच हाक म्हणायची इतर विधींप्रमाणे त्यामुळे ती सुद्धा कधीही येऊ शकते हे विशेष. 
   तर अशी ही झोप , हिचे प्रकार कुठले?याच्याही आधले मधले प्रकार असणार हे नक्की..
   
रात्रीची झोप: ही झोप आपण सर्वच घेतो. थोडक्यात आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे रात्रीची झोप. हल्लीच्या ट्रेंड प्रमाणे रात्री कितीही कुणी ओटिटी बघत बसलं तरी एका पॉईंट ला निद्रादेवी तिचा अधिकार दाखवते. साधारणतः ७ वाजल्यापासून ही झोप फणा वर काढते, पण रात्रीचं जेवण झालं आणि हातावर पाणी पडलं रे पडलं की बिछान्याची आठवण येते. एक पद्धत म्हणून आपण चॅनल बदलत बसतो. कारण संस्कार सांगतात बाळा जेवल्या जेवल्या आडवं होऊ नये. आणि मग या जगाचे राजे आपणंच या अविर्भावात उठतो आणि बिछान्यावर पडी करतो.
 
दुपारची झोप : अहाहा ! काय ते दोन मधुर शब्द ..दुपारची झोप. ही झोप रोज मिळण्याकरता नशीब जोरावर लागतं. अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसारखीच दुपारची झोपही जीवनावश्यक. मात्र सगळ्यांच्या नशिबी काही ती नाही. त्याकरता खूप पुण्यवान असावं लागतं. यातही किती वेळ झोपायचं हा विषय वेगळा बरं का ? ही झोप दुपारच्या जेवणानंतर आपलं अस्तित्व सतत सिद्ध करत राहते. मात्र ही झोप खास ठरते ती विकेंड ला. खरं तर दुपारची झोप मिळणार या कल्पनेनेच शनिवार रविवार ची ओढ लागून राहते..आणि एकदा का ती घेतली की 'याच साठी जन्म आपुला' असं म्हणावसं वाटतं..

अंघोळीनंतरची झोप : ही झोप विशेष असते. कारण वीकडेज ना अंघोळ केली कि कामाची गडबड असते त्यामुळे अंघोळ करून विशेष ताजं तवानं वाटतं..पण हेच,एखाद्या सुट्टीच्या दिवशी अंघोळ केली की आणि त्यातून हेड बाथ वगैरे असे स्वतःचे लाड केलेले असतील तर अगदी फर्शीवरही पंखा सुरु असताना झोप लागते. साधारण १५ मीं ते अर्धा तास असा या झोपेचा कालावधी असतो. अहो सुट्टीच्या दिवशी घेऊनच बघा हि झोप..हो हो..यामुळे दुपारच्या झोपेवर काहीही परिणाम होणार नाही हि खात्री आहे. 

सकाळी उठल्यानंतरची झोप : या सर्व प्रकारांपैकी हा प्रकार एकदम 'पुष्पा' टाईप्स ...मै झुकेगा नही..कारण हि झोप आपल्या सगळ्यांना अगदी दररोज सकाळी आलेली असते. केवळ सकाळ झाली आणि औपचारिकता म्हणून उठलं पाहिजे म्हणून उठलं जातं पण डोळ्यावर झापड असतेच. ही झापड म्हणजेच सकाळची झोप. या झोपेची विशेषता म्हणजे रविवार असो व सोमवार हि झोप नित्य आपल्या सोबत असते. सकाळी उठूनही अजून ५ मिनिटं झोपावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. आणि तो आपला जन्म सिद्ध अधिकार आहे हे जाणून आपण हि झोप घेतोच. त्यामुळे दिवसभर या झोपेची रम्य आठवण आपल्यापाशी असते.

तर..अशा काही मला भावलेल्या 'झोपा'...निद्रेला सर्वात उत्तम प्रकारचं 'ध्यान' म्हटलंय. आता गंमत अशी आहे की आपण अगदी बसून डोळे मिटून ध्यान जरी करायचं ठरवलं तरी आपण 'झोपलेलो' च असतो. मग रोजचं हे नैसर्गिक 'ध्यान' जर का निसर्गानेच ठरवून दिलेलं आहे तर त्यात कसूर कशाला करायची? झोप कमी घेतली कि आपणही 'ध्यानच' दिसू लागतो..आणि मग वय होऊ लागतं तसे एक एक त्रास डोकावू लागतात. मात्र या सगळ्याच्या मुळाशी पुरेशी झोप नाही हे कारण आहे का याचा शोधही घ्यायला हवा. पण या सगळ्यापेक्षा एक रात्रीची ७-८ तास झोप घेऊन तजेला टिकवून ठेवण सोपं नाही का? 
आणि झोपेचं कसं अगदी बायकांसारखं आहे .. म्हणतात ना, बायकांना समजून घ्यायचं नसतं , त्यांच्यावर फक्त प्रेम करायचं असतं..झोपेचं तसंच आहे..शेवटी 'ती' झोप.. त्यामुळे झोप येत्ये असं वाटलं की 'आता का बुवा झोप येत्ये' असा विचार न करता सरळ झोपून जायचं..
बाकी..
आज रविवर आहे..तुम्हा सर्वांना हे वाचता वाचता नक्की झोप येत असणार, तेव्हा मी अजून पाल्हाळ लावत नाही. वर लिहिलेल्यापैकी अगदी सगळ्या झोपा आज घेता येतील..होऊन जाऊदे...आणि हो..तुम्हाला माहिती असलेले झोपेचे प्रकारही सांगा...
निद्रायमस्तु...🥱🥱😴😴😴
Image: google 

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....