देऊळ

देऊळ
एका संध्याकाळी , घराजवळच्या दत्त मंदिरात गेलेले. श्री.स्वामी समर्थ, दत्त गुरु, गणपती, महालक्ष्मी अशा सर्व देवतांच्या प्रतिमा तिथे आहेत..अतिशय शांत, गर्दी नसलेलं हे टुमदार देऊळ..
मी नामस्मरण करत बसलेले, तेवढ्यात एक 4-5 वर्षांची मुलगी तिच्या बाबांचा हात धरुन आली. तिला सर्वात आधी कशाची उत्सुकता असेल तर सगळ्या घंटा वाजवण्याची..तिच्या बाबांनी तिला उचलून घेतलं आणि तिने आनंदाने सगळ्या घंटा वाजवल्या..खाली उतरवताच ती प्रदक्षिणा घ्यायला पळाली..
हे सगळ पाहून मला माझं लहानपण आठवलं.
देऊळात जाणं हा माझा लहानपणापासून चा आवडता उद्योग. लहानपणी आई-बाबांसोबत घराजवळच्या लक्ष्मी-नारायण मंदिरात गेल्याच्या आठवणी माझ्या अजूनही ताज्या आहेत.
मला अजूनही ठळकपणे आठवतंय..त्या देवळाच्या अंगणात शहाबादी फरशा होत्या..गेट मधून आत आलं आणि चपला काढल्या की मी जशी छप्पी लंगडी खेळतात तशी उड्या मारत मारत पुढे जायचं. आज इतक्या वर्षांनी या दत्त मंदिरात गेल्यावर या आठवणी जाग्या झाल्या.
मलाही अशीच घंटा वाजवण्याची उत्सुकता असायची..कधी एकदा बाबा उचलून घेतायत आणि कधी आपला हात तिथपर्यंत पोहोचतोय..ते झालं की पळत जाऊन प्रदक्षिणा घालायच्या. लहान वयात कुठे कळतोय प्रदक्षिणेचा अर्थ..गोल गोल पळायला मिळतंय याचाच आनंद..आणि मग उत्सुकता तीर्थ घेण्याची. सगळी मोठी माणसं हातावर घेतात तसं मलाही हवं. पण त्याच इवल्याशा ओंजळीत तीर्थ न सांडता घेण्याचा आनंद काही वेगळाच असायचा.
खरंच..य छोट्या गोष्टीत किती आनंद शोधत असतो आपण लहान असताना. मग मोठं झाल्यावर काय होतं असं?लहानपणी आपल्याला कुतुहल असतं मोठं  होण्याचं..तेव्हा कुठे कळत असतं की लहानपणातच खरी मजा आहे.
त्यादिवशी देवळात गेले आणि माझं लहानपण पुन्हा पहायला मिळाल्याचं समाधान घेऊन घरी गेले.

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....