विसावा

अलिकडेच हे सुंदर छायाचित्र पाहिलं..छायाचित्रकार धृतिमान मुखर्जी यांनी टिपलेला सुरेख क्षण..
विसाव्याचा...समुद्रात बगळ्यासारखा दिसणारा एक पक्षी (Naazca Booby) एका कासवावर विसावलाय आणि त्या कासवाच्या खाली लहानगे मासे छताखाली थांबल्याप्रमाणे विसावलेत..कदाचित त्या बगळ्यापासून संरक्षण व्हावं म्हणून लपलेत..
  कलाकार म्हणून श्री.मुखर्जी यांची कमालंच केली आहे..त्यांनाही असा क्षण समुद्रात पहिल्यांदाच पहायला मिळाला असं ते लिहितात..
   त्या कासवाला कल्पनाही नाही की आपल्या नकळत आपण कुणाला तरी आसरा दिला..कुणाचा तरी विसावा बनलो.. 'विसावा'..शब्दातच किती शांतता आहे..एखाद्यावर विसावणं..एखाद्यावर हवाला असणं..निश्चिंत असणं की ती व्यक्ती आहे आपल्यापाशी..विश्वास असणं त्यावर पूर्ण..मी आश्रय मागितला तरी ही व्यक्ती नाकारणार नाही..आपल्याला यापासून काहिही धोका नाही..
    आता हे कासवंच बघा..त्यावर बसलेला पक्षी आणि त्याखाली थांबलेले मासे दोघांच्या मनात याच भावना आहेत की याच्या सोबत आपण सुरक्षित आहोत..
    सगळ्यांनी आठवून पहा..अशी एक तरी व्यक्ती असेलच आपल्या आयुष्यात..अशा लोकांच्या vibes इतक्या सकारात्मक असतात की काही काळ आपल्याला त्यांचा सहवास मिळाला तरी वातावरण असं बदलून जातं किंबहुना ती व्यक्ती तेथून निघाली तरी ते वेगळेपण आपल्याला जाणवतं.
    ही जाणीवच किती खास आहे..खरं तर शब्दांपलिकडचीच आहे..आपल्या आयुष्यातही आपण अशा एकाच्या शोधात नककी असतो ज्यावर आपण विसावू शकतो..अगदी हक्काने..
    मात्र आपण या कासवाच्या ठिकाणी असावं..नाही का? ज्याला कल्पनाही नाही आपण कुणाचा तरी 'विसावा', 'आधार'..'विश्वास' बनलो..
    आपल्या नकळत कुणाचं तरी आयुष्याला स्पर्श करावं ..इतकं ऊर्जेने ओतप्रोत असावं की आपला सहवासंच काय..आपण फक्त दिसलो तरी..किंवा आपली केवळ कुणाला आठवण झाली तरी त्या व्यक्तीला बरं वाटावं..आणि या खात्रीनिशी त्या व्यक्तीने आपल्याला पुढच्या क्षणी फोन लावावा की हो, हिच्याशी/ याच्याशी बोलून मी समृद्धंच होणार आहे.
    आपण स्पर्शून गेलेल्या आयुष्यावरचे ठसे पुसले जाऊ शकत नाहीत..हे कायम लक्षात ठेवावं..
    'विसावा' बनावं..
छायाचित्रकार: धृतिमान मुखर्जी

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....