रिक्त

     या बद्दल लिहिण्यापूर्वी स्क्रीन कडे टक लावून खूप वेळ पाहत होते..अर्थातच विषयामुळे..
     'रिक्त'..'रिकामं'..यावर शब्द मांडले गेले की हा कॅन्व्हास भरून जाणार. मग रिक्तपणाचं महत्व उरेल का? पण शांतपणे विचार केला की या रिक्तपणाची गरज जाणवेल..त्याचं वेगळं स्थान उमगेल..
     एक कोरा कागद आपल्या समोर ठेवला आणि विचारलं की यावर तुम्हाला काय दिसतंय?..काय असेल आपलं स्वाभाविक उत्तर?..की यावर काहिही दिसत नाही..मात्र त्यावर एक लहानसा बिंदू जरी काढला की आपलं सगळं लक्ष त्या बिंदू कडे आकर्षित होतं..एवढं मोठं रिक्त पटल, त्याचं अप्रूप वाटत नाही..पण आपण हे विसरून जातो की तो कागद रिकामा,म्हणून तो त्या बिंदूला सामावून घेतोय..या साठी ते पटल, तो कॅनव्हास कोरा असायला नको का? पण उत्तर देताना मात्र त्या भल्या मोठ्या रिक्त जागेला आपण विषेश महत्व देत नाही.
     शांतता सुद्धा अशीच..जिथे आधी शांततेचा रिक्तपणा, तिथेच आवाजाचे महत्व..जिथे आवाज आहे तिथेच आपण जाऊन अजून आवाज मिसळला तर गोंगाटच होणार..
     अर्थात सगळीकडे रिक्तपणा असणं 'महागात' पडतं ..खिसे रिकामे झाले तर पंचाईत होते..पण हेच खिसे भरले की आपल्याला खिशात काही नसताना महत्व पटतं..ते तेव्हा नव्हतं म्हणून 'ते' आज असण्याला किंमत आहे नाही का?
     अशा रिक्तपणाला आज 'शोधण्याची' आवश्यकता आहे..स्वत:ला रिक्त करण्याची आवश्यकता आहे..चंद्र जसा 'पूर्णत्व' मिळवण्याआधी कले कलेने रिक्त करतो ना स्वत:ला...अगदी तसंच..तेव्हाच तो पौर्णिमेला तेज:पुंज दिसतो..आणि दर पौर्णिमेला आपल्याला एक नवीन चंद्र भेटतो..मात्र तितकाच तेजस्वी..मग विचार करा, हे असं रिक्त होणं तो चंद्र सतत करत असतो..पानगळीचंही तेच..नवीन पालवी फुटावी या करता आधी आहेत ती पानं टाकावी लागतातच की..
     मग आपल्या मनाचंही नको का तसं करायला? आपण हर त-हेने स्वत:ला सिद्ध केलेलं आहे..मनुष्य हा सर्वात विकसित प्राणी म्हटला जातो..पण हे करत असताना इतकं काही भरलंय आपण स्वत: मधे की आपण डबक्यात सापडलोय..आपल्याला वाटतंय की आपलं फारंच 'भारी' चाललंय..पण खरंतर तिथल्या तिथेच पोहतोय आपण..
     अडचण अशी आहे की आपल्याला सगळं समजलंच पाहिजे, सगळंच आलं पाहिजे..आपण सगळं मिळवलंच पाहिजे हा आपला अट्टाहास..आपल्या घरात पाळीव प्राणीच बघा..सगळं नसतंच कळत त्यांना, पण तरिही ते आपल्याला आपल्या पेक्षाही जास्तं समजुतदार वाटतात..कारण प्राण्यांमधे स्वत:ला रिक्त करण्याचा गूण निसर्गत:च असतो..त्यामुळेच दररोजच्या गोष्टी सुद्धा ते नव्याने करत असतात आणि त्याची मजाही घेत असतात..
     असंच, काय हवं तेवढंच घेऊन व बाकी सगळं सोडून देऊन स्वत:ला रिक्त करावं..नव्हे करत रहावं..
     मग आपणही त्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कायम  तेज:पुंज दिसू..
     इमेज सौजन्य: गूगल

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....