'भाकरी

    'भाकरी' म्हणताच डोळ्यांपुढे उभी राहते ती मोठ्या आकाराची, पापुद्रे सूटलेली गोलाकार वाफाळलेली भाकरी..
    खरंतर 'भाकरी' या शब्दाशी अनेक पैलू निगडित आहेत..उदारणार्थ सौभाग्य, असा शब्द वाचला की त्याचे पैलू येतात...मंगळसुत्र, लाल कुंकू, हिरवा चुडा, जोडवी ई. अगदी तसंच भाकरी म्हटलं की डोळ्यापुढे येते ती चूल, तवा , ठेचा, लोणी, झुणका, पालेभाजी..ई...ज्या प्रमाणे एखाद्या सौभाग्यवतीला पाहिल्यावर तिची दृष्ट काढावीशी वाटेल, त्या प्रमाणेच असा सुंदर थाट असतो भाकरीचा की ती खायची इच्छा पूर्ण करण्यापूर्वी आदराने आधी आपोपाप त्यासमोर नतमस्तक होवू...
    आता पूर्वीसारख्या चुली राहिल्या नाहीत आपल्याकडे, तसंच स्वत: शेतात राबून ज्वारी बाजरी पिकवणं किंवा जात्यावर दळणं हे सुद्धा आता नाही.. पण भाकरी करायची पद्धत मात्र वर्षानुवर्ष अबाधित आहे..
    या प्रक्रियेतील कलात्मकता मला कायम आकर्षून घेते..पीठ मळणं, खरंतर हाताच्या तळव्याचा वापर करून घोटून घेणं..त्यामुळे शरीरातील उर्जा पीठ शोषून घेतं..आपल्यातलं 'असणं' हेच जणू त्या भाकरीत ओढलं जातं..भाकरी थापणं म्हणजे आईने बाळाला जणू थोपटावं..इथे तर थापताना त्यावर आपल्याच हाताने सुंदर नक्षी तयार होते...सह्याद्रीच्या डोंगर द-यांच्या प्रमाणे कधी खोल तर कधी उंच भासणारी..अशी भाकरी अलगद उचलून तव्यावर टाकताना तान्ह्या बाळाला 'गोविंद घ्या गोपाळ घ्या' करून झालं की अलगद पाळण्यात ठेवावं तसा भास होतो..त्यावर पाणी पसरवणं म्हणजे अलगद
आईने बाळाला डोक्यावर हात फिरवून गोंजारावं तसं वाटतं..आणि भाकरीला सूटलेला पापुद्रा म्हणजे जणू दुधावरची साय..किती मायेने भरलेली आहे भाकरी करण्याची प्रक्रीया..
    पूर्वी तर जात्यावर दळताना बायका ओव्या म्हणत असंत..कुणी यावर विश्वास ठेवा अथवा नको मात्र ही सगळी सकारात्मकता त्या अन्नामधे ओढली जात असंत..भाकरीचे पीठ मळणं, थापणं, यातून तिच्या हातचा गोडवा त्यात नाही उतरला तर नवल..म्हणूनच 'भाकर गोड लागते' असं म्हणत असावे..घरातल्या स्त्री चं सौख्यंच जणू त्या भाकरीतून डोकवायचं..फारंच कमी वेळा असं होत असे की भाकरी करपली..म्हणूनच करपली की अशुभ मानलं जायचं..ही अंधश्रद्धा मुळीच नव्हती..संकेत असायचा बाईने सावरण्यासाठी..मनस्थिती पूर्ववत व्हावी या साठी..म्हणूनच स्वयंपाक करताना आपण आनंदी असलं पाहिजे..जशी आपली मनस्थिती..तसाच आपला आनंदाचा दर्जा..
    खरंच, हे सगळे संदर्भ लागले की आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो..जगण्याची ही रीत जगात शोधूनही सापडायची नाही..सतत सगळ्याशी जोडलेलं रहाणं (connected )..पुरूष म्हटलं की त्याने घरासाठी मिळवून आणावं आणि स्त्री म्हणजे केवळ चूल आणि मूल असा दूजाभाव नव्हताच..आपल्या स्त्री किंवा पुरुष 'असण्याला' कधी वेगळं समजलंच जात नसे..'भाकरी' आणि अशा अनेक माध्यमांमधून कुटुंब, समाज एकमेकांशी जोडलेला असायचा..आपली संस्कृती अशीच होती..आणि अशीच राहिली पाहिजे होती..कालांतराने आपणंच त्याचे वेगळे पेक्षाही चुकीचे अर्थ घ्यायला सुरुवात केली..
    हे सगळं 'भाकरी' स्वत: करायला शिकल्यामुळे जाणवलं..हा असा अनुभव घ्यायचा असेल तर मात्र 'भाकरी' नक्की करून बघा..
   
    

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....