राजे शिवछत्रपती यांस.....

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसुनो: शिवस्यैषा मुद्राभद्राय राजते।।

आदरणीय राजे शिवछत्रपती,
                        साष्टांग दंडवत🙏...
         राजे, आज आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आपणास हे पत्र लिहावेसे वाटले..आपण महाराष्ट्रात जन्म घेतलात हे आमचे केवढे मोठे भाग्य..आपल्या आदरणीय माता-पित्यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न आपण साकार केलेत..महाराष्ट्राला मोकळा श्वास घ्यायला शिकवलात आपण..जे आपल्या हक्काचं त्यासाठी लढलंच पाहिजे पण अचूक योजना, नियोजन करून हा दंडक कित्येक वर्षांपूर्वी आपण घालून दिलात...गावोगावी जाऊन जनमानसात मिसळून आपण माणसांना स्वराज्यात जोडलेत..
     जात, पात, धर्म, वर्ण याच्या पलिकडे जाऊन आपण 'माणूस' मोठा केलात..केवळ स्वराज्य स्थापन केले नाहीत तर ते फुलवले आणि कणखर बनवलेत..
     आपण आणि आपल्या सर्व शूर सैनिकांनी रक्त सांडले म्हणून आज आम्ही हा आजचा महाराष्ट्र पाहू शकलो..
     पाहू शकलो हे खरं..पण आपण रुजवलेली मूल्य टिकवू शकलो का? राजकारण करावं ते स्वराज्यासाठी, रयतेसाठी, स्वार्थासाठी कदापि नाही ही आपली मूल्य तर आम्ही विसरलोच पण सगळीकडे जात, पात, धर्म पुन्हा घेऊन आलो..जो रयतेसाठी कार्य करतो तो राजा, मग त्याची जात पात आड येताच कामा नये हा साधा सरळ विचारही आम्ही पचवला नाही..
     आपल्या काळात गुन्ह्यांनाच काय, चुकांनाही कडक शासन होत असे..असं की केवळ ऐकून थरकाप उडे, आणि पुन्हा तसं करण्यापूर्वी 100 वेळा विचार केला जाई..पण आज आम्ही स्वैराचार चालवला आहे..नियमांचं उल्लंघन , कायद्याला फाट्यावर मारणं..शिस्त न पाळणं , अस्वच्छता पसरवणं..जो काम करतो त्याला खाली ओढणं, चैन करणं, काळं धन साठवणं, लाच घेणं व देणं, कर चुकवणं..यादी मोठी आहे.
     आपण आमच्यात कायम असणार आहात राजे पण केव्हा? आपण अविरत परिश्रम घेऊन घडवलेला महाराष्ट्र जेव्हा आम्ही आमचा समजू तेव्हा..स्वराज्याची आस सर्वात आधी आपल्या अंत:करणात जागृत झाली आणि मग ती प्रत्यक्षात उतरली..तशीच ही मराठी मायभूमी माझी ही भावना जेव्हा आमच्या अंत:करणात जागृत होईल तेव्हा आम्ही महाराष्ट्राला आणि पर्यायाने भारतला सुद्धा मोठं करू शकू..
     महाराज, आशीर्वाद द्यावा, आपली, 'प्रतिपच्चंद्रलेखेव......' ही मुद्रा जशी लोककल्याणासाठी शोभली तशीच 'सत्यमेव जयते' ही आपल्या स्वतंत्र भारताची राजमुद्रा सार्थ ठरो.                                 
   
आपल्या विश्वासाला पात्र ठरण्याच्या सदैव प्रयत्नात...🙏🙏
                                 

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....