'आई' जन्म घेते....
अलिकडे माझ्या आईच्या तोंडी ब-याचदा हे वाक्य ऐकायला मिळतं ,"अगं आता म्हातारी झाली आई तुझी"..माझ्याच काय, माझ्या वयाच्या सगळ्याच मुलींच्या आया हे म्हणतात..
वय होतं हे नक्की..ते तर सगळ्यांचं वाढतं..मग सहजच एक विचार मनात आला..आई, ही आई केव्हा होते?..सूक्ष्म रूपात म्हणायचं तर बाळाची चाहुल लागते तेव्हा..आणि प्रत्यक्ष रूपात बाळ जन्माला येतं तेव्हा..आईपणाचा अनुभव नवीनच असतो तिच्यासाठी..आपल्या पोटी बाळ यावं यासाठीची शारीरिक आणि मानसिक तयारी तिला फार आधीपासून करावी लागते..याचाच अर्थ आई ही मूल जन्मायच्याही फार आधी जन्म घेते..
हेच वडिलांना लागू असतं..वास्तविक हे 'आई' तत्व वडिलांमधेही असतंच की..केवळ त्यांनी बाळाला गर्भात वाढवलेलं नाही म्हणून बाबा 'आई' नसतो असं म्हणणं किती चुकीचं ठरेल नाही का? जिथे बाळाची चाहूल लागताच 'आई' जन्म घेते तिथेच "बाबा' सुद्धा जन्म घेतो..बाबातलं 'आईपणही' जन्म घेतं.फक्त त्याची पूर्वतयारी,नियोजन वेगळं. पण तितकंच महत्वाचं..हे 'आई' तत्व लक्षात घेऊनच शीर्षक दिलं आहे. त्यामुळे आई बाबा असा भेदभाव नाहीच.
अगदी आपलं स्वत:च्या पोटचं बाळ नसलं आणि दत्तक मूल असलं तरी हेच आई तत्व लागू होतं..म्हणून तर पोटचं मुल नसलं तरी आई बाबा तितक्याच प्रेमाने दत्तक मुलाचं संगोपन करतात..इतकं, की ते मूल त्यांचं कधी होऊन जातं हे कळत सुद्धा नाही..हीच तर परमेश्वराची किमया आहे..'आई' होण्यासाठी आधी मूल जन्मावं लागत नाही तर 'आई' जन्मावी लागते..
आपल्या पाळीव प्राण्यांचं संगोपन सुद्धा आपण त्यांचे आई-बाबा असल्यासारखंच करतो..मग तो जीव प्राणी आहे , माणुस आहे, आपण त्याला जन्म दिलाय का नाही या गोष्टी दुय्यम ठरतात. ती आपली बाळंच होतात..तितकंच प्रेमाने आपण आपल्या झाडांवर सुद्धा करतोच की..
या विषयावर लिहीत असताना राजमाता जिजाऊ साहेबांची किंवा मदर टेरेसा या दोन 'जग्न्मातांची' आठवण आल्या वाचून राहत नाही आणि त्यांना सगळे 'आई' का म्हणत असतील ते जाणवतं ..
रक्ताचं काय किंवा कायद्याचं काय..नातं असो नसो..माया करण्यासाठी आपल्यात आधी 'आईने' जन्म घ्यावा लागतो..तेव्हाच ख-या अर्थाने आई होता येतं..
gauripawgi.blogspot.com
फोटो सौजन्य: गूगल
Comments
Post a Comment