5 मिनिटं..

 
लहानपणी मोठी गम्मत असते बरं ! मुलांचं आपलं आपलं वेगळं घड्याळ असतं. त्यांच्या परीने ते घड्याळ पुढे मागे करत असतात. पाच मिनिटांचा वेळ सुद्धा किती मजेशीर वेळ असतो लहानपणी..मला आठवतं शाळेसाठी आई मला सकाळी उठवायला यायची तेव्हा मी 5 मिं-5 मिं म्हणून अजून थोडी झोप काढायचे. पण ही 5 मिनिटं आईच्या भरोशावर असायची ..एवढा विश्वास तिच्यावर की ती 5 मिनिटांनी उठवायला नक्की येणार आणि आपल्याला शाळेला उशीर होणार नाही. आणि त्या शेवटच्या ५ मिनिटात जणू अवघ्या रात्रभराची झोप घेतल्याचं समाधान मिळायचं.
विचार केला तर या 5 मिनिटांचं आजही तितकंच महत्व आहे की . अगदी आजही सकाळचा गजर वाजला की आपल्यापैकी 99 टक्के जणं तो snooze करून 5 मिनिटासाठी नक्की पुढे ढकलत असतात. काय होणार असतं असं या अजून 5 मिनिटांनी? पण ती शेवटचीच ५ मिनिटं जिवाभावाची वाटतात सगळ्यांना. 
आपल्या जिवलगांना कितीही वेळ भेटलो, त्यांच्याशी कितीही वेळ गप्पा मारल्या तरी त्या शेवटच्या पाच मिनिटात गेल्या 5 तासांची कसर भरून निघते असं वाटतं .
प्रियकर प्रेयसीची भेट,... अगदी तासंतास हातात हात घेऊन बसूनही अजून 5 मिनिटं थांबण्याचा लडिवाळ हट्ट काही औरच असतो. खरं तर ती फक्त 5 मिनिटं नसतातच..असतात कैक क्षण..आठवणीत भरून ठेवण्यासाठीचे.
अगदी जिवलग मित्र मैत्रिणी जरी एकमेकांना भेटले तरी 'और पांच मिनिट ' म्हटल्याशिवाय भेट झाल्यासारखीच वाटत नाही..
आधीच्या काही तासांमध्ये असतं ते ठरल्याप्रमाणे भेटल्याचा समाधान. मात्र त्या शेवटच्या ५ मिनिटात असते ती अपूर्णता..आपल्याला समोरच्याचा श्वास, त्याचा सहवास , स्पर्श, त्याचं बोलणं असं सगळं काही भरून साठवून ठेवण्याची आतुरता.. त्या शेवटच्या 5 मिनिटात असते ती आधीचे लाखो क्षण सोबत असल्याची उजळणी.. .आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुन्हा लौकर भेटू याची खात्री..
 थोडक्यात कुठल्याही वयाला ही जास्तीची पाच मिनिटं हवी हवीशीच वाटत असतात. या पाच मिनिटांनी म्हटलं तर काहीही फरक पडणार नसतो किंवा म्हटलं तर खूप फरक पडणार असतो.
 ...Time is precious असं म्हटलं जातं, पण या आणखी पाच मिनिटां इतकी precious मिनिटं जगातल्या कुठल्याही घड्याळात शोधून सापडायची नाहीत हेच खरं.

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....