३१ डिसेंबर आणि आळंदी...

  आळंदी ला जायचा योग इतक्या वर्षांनी काल आला. ज्ञानेश्वर माऊलींच्या सान्निध्यात जाणं हा विचारच किती भारावून टाकणारा आहे. 'ज्ञानेश्वरी' लिहून तरुण वयात संजीवन समाधी घेणाऱ्याला मनुष्य तरी कसं म्हणायचं? . ते साक्षात परमेश्वर च...माऊलींनी जन्म घेतला ते 'ज्ञानेश्वरी' निर्मितीच्या माध्यमातून जीवनमूल्य समजावून देण्यासाठी. हजारो वर्षांपूर्वी कृष्णपरमात्म्याने गीता सांगितली. माउलींनी , चंदन उगाळल्यावर त्यातला सुगंध बाहेर पडावा तसाच, गीतेतील सुगंध 'ज्ञानेश्वरी' म्हणून आपल्या समोर आणला.  
    आळंदी ला जात असताना हे सगळं मनात येत होतं . काल आळंदीत गर्दी म्हणावी अशी फार नव्हती. समाधीचं दर्शनहि मिळालं खरं पण काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं. समाधान वाटेना.
   निघताना वाटलं इंद्रायणीला नमस्कार करावा, पाय बुडवावे आणि निघावं. नंतर जाणवलं की इंद्रायणीत पाय बुडवणं हा अनुभव नव्हे तर अनुभूती आहे. इतका वेळ जे राहून गेल्यासारखं वाटत होतं ते इथे गवसलं. इंद्रायणीत पाय बुडवले, डोळे मिटले आणि प्रत्यक्ष माऊलींना पदस्पर्श होतोय असं वाटलं. 
दोन मीं सगळ्याचाच विसर पडला. आपण कुठे उभे आहोत, कुठे जाणारोत अगदी काही म्हणजे काही जाणवलं नाही. जाणवला तो इंद्रायणी च्या पाण्याचा गारवा आणि एक प्रकारचा शरण भाव. 
अशावेळी 'पसायदान' आठवलं नाही तर नवल . ३१ डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस , नवीन वर्षात पदार्पणकरत असताना काय मागावं? माऊलींनी जे सगळ्यांकरता मागितलं तेच त्यांच्याकडे मागितलं.
'आता विश्वात्मके देवे.....'
Image courtesy: google 

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....