ओढ

'ओढ'.. शब्दातच काहीतरी वेगळं आहे. शब्द उच्चारला तरी आपल्यापाशी काहीतरी खेचलं जातंय असं वाटतं मला. गंमत कशी असते बघा, ओढ हे सर्वनाम म्हणून वापरलं तर तितकं परिणामकारक होणार नाही मात्र ' ती ओढ' असं नाम या अर्थी वापरलं की जणू दुधावर साय धरावी तसं काहीसं मलईदार , मऊसूद वाटतं.
ओढ लागून राहिली कि नेमक्या काय भावना असतात बरं? ती व्यक्ती आणि आपण यामध्ये एक अदृश्य धागा असतो. दोहोबाजुंनी हे धागे मजबूत बांधलेले असतात.  मात्र ताणून कुणीच धरत नाही. कारण दोघांनाही माहिती असतं कि आपल्यामध्ये आहे तो मायेचा धागा, ज्यावर फक्त मायेचा पदर सरकवला तरी तो घट्ट होत जाणारे. त्यासाठी कुणी एकाने ताणायची गरज नाही. 
बरं ही ओढ निर्जीव वस्तूंबद्दल सुद्धा वाटतेच की...जसं की आपलं आवडतं पुस्तक , आपली बॅग , आपली गाडी इ. माझ्या गाडीवर तर माझा इतका जीव आहे की येता जाता मी तिला थँक यू म्हणते ," बाई गं , तू आहेस म्हणून मी जवळची , लांबची अंतरं किती सहज पार करू शकते".. कधी कधी माझं मलाच हसू येतं याचं ,पण गाडी सर्व्हिसिंग ला गेली की ती घरी येईपर्यंत मला अगदी बेचैन होत राहतं . कधी एकदा गाडी परत दिसते असं होतं . इतकं कि गाडी आणल्यावर मी तिला घट्ट मिठी मारते आणि म्हणते ,I missed you so much..मात्र, वस्तूच्या ओढीमध्ये एक निर्जीव आणि एक सजीव आहे हे कुठेतरी ठाऊक असतंच..नाही का ?
माणसांच तसं नसतं. दोघांच्या एकमेकांविषयीच्या ओढीमध्ये एक धागा दोघांना बांधून ठेवतो असं का बरं म्हणत असावे? अदृश्य धागा असतो असं म्हणतात , दोरखंड असतो असं कधीही म्हटलं जात नाही. कारण दोरखंड मुळातच मजबूत, राठ. दोरखंड टिकून रहावा या करता काहीही प्रयत्न करावा लागत नाही. याउलट धागा जपावा लागतो, अगदी सुईत घालतानाही अलगद सरकवावा लागतो .महत्वाचं म्हणजे त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. 
'ओढ' वाटत असलेल्या नात्यांचं अगदी असंच आहे. त्यांच्यातला अदृश्य धागा हा 'मायेचा'...त्यामुळेच प्रयत्न करावा लागतो तो, ती ओढ टिकवून ठेवण्याकरता,  कुणी एकाने ताणून धरलेलंही चालत नाही ना कुणी सैल सोडलेलं चालतं. आणि अशीच ओढ कायम टिकते. मग ते पती पत्नी असो, मित्र मैत्रीण असो, प्रियकर प्रेयसी असो..अगदी कुठलंही नातं असो. 
शेवटी कसं आहे, 'ओढ' टिकवण्याकरता 'ओढून' चालत नाही जे जिथे उमगतं, तीच खरी 'ओढ'.

Image courtesy: google 

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....