रणवीर..

   पूर्वी सारखी रणक्षेत्र आता राहिली नाहीत..पण कार्यक्षेत्रांचा विस्तार मात्र होताना दिसतोय. प्रत्येक क्षेत्राची आता रणभूमीच झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तिथे एखादा 'रणवीर' च सातत्य टिकवतो. रणवीर सिंह भवनानी हा असाच एक वीर आहे असं म्हणावंसं वाटतं.
हे लिहावंस वाटलं यामागे कारण म्हणजे अलिकडे पाहिलेला '83' हा चित्रपट . रणवीर पहिल्यांदा एखादी भूमिका उभी करतो ती नजरेतून. त्याचा चेहरा मेकअप लावून बदलतोच पण भूमिकेच्या खोलात शिरताना रणवीर डोळ्यातून अगदी भरभरून व्यक्त होत राहतो. कपिल देव उभा करताना प्रत्यक्ष कपिल देव यांची अनेकदा भेट घेऊन, त्यांची बोलण्याच्या , उठण्या-बसण्याच्या इ लकबी  त्याने पकडल्या आहेतच मात्र त्यांच्या डोळ्यांचा अभ्यासही अचूक केलाय हे समजतं. त्यामुळे चित्रपट पाहताना रणवीर बाजूला होऊन कपिल देव समोर उभे राहतात. स्वतः ४-५ तास दररोज क्रिकेट प्रॅक्टिस करणं , कमावलेलं शरीर उतरवून भूमिकेच्या जवळ आणणं या सगळ्या गोष्टींवर जीवापाड मेहनत रणवीर ने घेतलेली दिसून येते. कौतुक यासाठी करावंसं वाटलं की कपिल देवांची भेट घेणं शक्य असल्यामुळे या गोष्टी बऱ्याच अंशी सोप्याही वाटतात. मात्र बाजीराव पेशवे किंवा अल्लाउद्दीन खिलजी उभा करताना रणवीरने केलेला अभ्यास. दोन्ही पात्र ऐतिहसिक,  मात्र बाजीराव पेशवे साकारतानाची त्यांची करारी नजर व खिलजी ची पाशवी नजर कुठेही सारखी वाटत नाही. बाजीरावांच्या नजरेतलं तेजस्वीपण , शत्रूकडे पाहण्याची त्यांची पद्धत व खिलजीची खुनशी नजर यामधला फरक रणवीर विलक्षण पद्धतीने दाखवतो. याच्या बरोबर उलट्या प्रवाहात मोडणारी 'लेडीज vs बहल', 'गली बॉय' किंवा 'सिम्बा' ही अलीकडची पात्र. ही पात्र साकारणाराही हाच का तो रणवीर असा प्रश्न बघणाऱ्याला पडावा इतका एकरूप होऊन रणवीर ती साकारतो.. या सर्व भूमिका साकारत असताना प्रचंड ऊर्जा रणवीर मध्ये जाणवते. मात्र असं असूनही त्या ऊर्जेचा योग्य विनियोग तो करताना दिसतो. एका उत्तम कलाकाराचं लक्षण, मग तो नट असो, नर्तक असो किंवा गायक-वादक असो ,ते म्हणजे त्याच्याकडे असलेली ऊर्जा ओळखणे व ती योग्य पद्धतीने लागेल तशी व लागेल त्या पद्धतीने वापरणे. या निकषांवर रणवीर खरा उतरला आहे. 
   भारतरत्न पंडित भीमसेन जोशी म्हणायचे, " एक अच्छा कलाकार बनने के लिये तीन चीजे जरुरी हैं , अच्छा गुरु, अच्छा रियाझ और अच्छा नसीब,...
रियाझ व गुरु हे शास्त्रीय कला क्षेत्रात जसे महत्वाचे तसेच ते अभिनय क्षेत्रातही आहेत. रियाझ म्हणजे साधना, तुम्ही निवडलेल्या कलेशी अनुसंधान बांधणे ज्यामुळे त्याच्याशी एकतानता साधता येते. गुरु हा केवळ शिक्षक नसतो तर मार्गदर्शक असतो. रणवीर ने त्याच्या रियाझाचे सातत्य त्याच्या भूमिकांमधून कायम दाखवले आहे. यासाठी त्याच्या आयुष्यातील सर्व मार्गदर्शकांनी गुरु होऊन त्याला घडवलंय हे वादातीत आहे. या सोबत त्याला मिळाली ती नशिबाची साथ, सिनेमाची कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना,  गॉडफादर नसताना केवळ टॅलेंट च्या जोरावर आणि योग्य दिग्दर्शकांच्या हाती पडल्यामुळे रणवीर चं सोनं होताना दिसतंय.
  हे सगळं लिहीत असताना तो, दीपिका पदुकोण चा नवरा किंवा चित्र विचित्र कपडे घालून मीडिया पुढे येणारा एक नट, हे सर्व विचार झुगारून केवळ एक ताकदीचा भारतीय कलाकार म्हणून त्याच्याविषयी लिहिलं आहे. इतर नट वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही. 
  कामासाठी प्रचंड कष्ट घ्यायची तयारी , ध्यास व शरण जाणे हे रणवीर सिंह सारख्या कलाकाराकडे असलेले गूण आमच्या पिढीच्या सर्व कलाक्षेत्रातल्या मुलामुलींनी घेण्याची गरज आहे. तरंच भारताला, अभिनय, संगीत, नृत्य या सर्व क्षेत्रात दर्जेदार कलावंत बघायला मिळतील.       रणवीर सिंह हा आमच्या पिढीचा एक ताकदीचा नट आहे असं निश्चितच वाटतंय. याहीपुढे रणवीर कडून उत्तमोत्तम भूमिका बघायची इच्छा आहे.

Photo courtesy: google

Comments

Popular posts from this blog

कल्हई

26/11...

माझी पहिली दुचाकी....