शाळेकडली वाट
हे शीर्षक वाचल्यावर आपल्या सगळ्यांच्या आठवणी जाग्या झाल्या असतील नक्की..आपल्या बालपणापासून ते कळत्या वयाला (असं म्हणायचय😅 फक्त) पोहोचेपर्यंत आपली खास मैत्रीण म्हणजे आपली शाळा..आणि विषेश करून जर आपण सलग काही वर्ष एकाच शाळेत गेलो असलो तर आपलं एक वेगळं नातं जमून जातं तिच्याशी..पण याइतकंच आपल्याला काय आठवत असेल तर तो शाळेकडे जायचा रस्ता..कळत नकळत या वाटेशी सुद्धा आपलं एक नातं होऊन जातं..
माझी शाळा म्हणजे बदलापूरची इंडियन एज्युकेशन सोसायटीची कात्रप विद्यालय..इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी (6वी 7वी वगळता) असा मोठा काळ मी या शाळेची विद्यार्थिनी होते..1993-2003...बदलापुरात कात्रप नावाचं छोटं गाव होतं..त्यानजिक शाळा असल्यामुळे शाळेला कात्रप विद्यालय असं नाव..बदलापूर हे, शहर म्हणून तेव्हा पूर्ण विकसित नव्हतं..काही भागात तेव्हाही अगदी खेडं नाही तरी गाव संस्कृती जपली होती..हे गाव पार करून पुढे गेलं की शाळेची इमारत दिसे..तेव्हा तरी शाळेकडे जायला हा एकच रस्ता होता..
शाळा तशी घराजवळंच होती..कधी चालत..कधी सायकल वरून अशी मजा करत आम्ही शाळेत जायचो..कात्रप गावातून शाळेकडे जायचा रस्ता होता..मला आठवतं तेव्हा गावात शिरायच्या आधी कात्रप गाव असं नाव लिहिलेली पाटी होती..ही पाटी वाचून आत गेलं की लगेच डाव्या हाताला गणपतीचं मंदीर होतं आणि त्याला एक मोठ्या झाडाने आच्छादलं होतं..हीच गर्द झाडी आणि त्याने आच्छादलेला रस्ता आम्हाला पुढे बोलवतोय असं वाटे..गाव असलं तरी व्यवस्थित डांबरी रस्ता असल्यामुळे अडचण नसे..सकाळी सकाळी हे सगळं पाहून ऊर्जा मिळायची आणि एकदम ताजं तवानं वाटायचं..
गावात जुनी मातीची घरं रस्त्याच्या दोन्ही बाजुला होती तर काही पक्की घरं पण गावाला शोभतील अशी..काही घरांना बाहेरून इतके सुंदर रंग दिलेले असायचे की सकाळच्या कोवळ्या उनात इंद्रधनुष्याचा भास होई..ते रंग मला इतके आवडायचे की आपल्या घरालाही आपण आतून तसाच रंग देऊया का? असं मी आई-बाबांना विचारायचे..
सकाळी सकाळी तिथून जाताना अंगण शेणाने सारवताना बघायला छान वाटे..कुणाच्या घरातली घंटा ऐकू यायची, कुणी नुकतंच पूजा आटोपून मंत्रपठण करत बाहेर यायचं तर कुणी तुळशीवृंदावनाभोवती प्रदक्षिणा घालत असे..कुणी मशेरी लावून दात स्वच्छ करताना दिसे तर कुणाच्या खाकरण्याने अवघं गाव हादरे..काही घरांसमोर तर लहान मुलं बसून शी करताना दिसायची तेव्हा मला फार गंमत वाटे..मधेच एखादी कोंबडी तिची पिल्लावळ घेऊन रस्त्याच्या मधून जाई..कुणाच्या घरची चूल पेटल्याचा सुगंध दरवळे तर कुणाच्या अंगणात आंघोळीसाठी पेटवलेला बंब दिसे..गाईंच्या हबरण्याचा आवाज तर दर दुस'-या घरातून येई
असं सगळं बघत बघत जाताना कधी कुणा माझ्या वयाची मुलगी मला काम करताना दिसे..तिच्याकडे बघितलं की ती गालातल्या गालात हसे..मी आईला विचारायचे काय गं त्या मुली शाळेत जात नाहीत का? आई म्हणायची हो जातात की पण घरच्या कामांमधे मदत करायची सवय असते त्यांना..आईला मदत करतात..मग अभ्यास करतात आणि मग शाळेत जातात..हे असं कात्रप गाव पार केलं की डोंगराजवळ आमच्या शाळेची इमारत..
दुपारी याच वाटेने परत येताना गाव शांत असायचं..कुणी खाटेवर टेकलेलं दिसे तर कुणी दुपारची भांडी विसळताना दिसे..झाडांच्या सावलीतून जाताना गारेगार वाटे..गावातल्या एका छोट्या दुकानातून आम्ही रंगीत पेप्सीकोलाही घेत असू..गावातल्या त्या गणपतीच्या देवळाच्या बाजुलाच माघी गणपती बसायचा..मग काय..शाळा सुटली की प्रसाद घ्यायचा कार्यक्रम ठरलेला..थंडी, उन्हाळा, पावसाळा..प्रत्येक ऋतूत गाव वेगळं दिसायचं..थंडीत धुक्यातून आणि उन्हाळ्यात कोरड्या रस्त्यावरून जायला जितकी मजा येई तितकीच धो धो पावसात गम बूट घालून चालत जाताना येई..
या रस्त्याशी जोडल्या गेलेल्या अशा किती आठवणी असतील..आता ते दिवस काही परत यायचे नाहीत..कदाचित आता गावही राहिलं नसेल..तिथेही इमारती झाल्या असतील..पण गावातल्या या वैभवाचे आम्ही विद्यार्थी म्हणून कायम साक्षीदार राहू..आणि माझ्या लाडक्या शाळेकडे नेणारी ही अविस्मरणीय वाट माझ्या मनात कायम घर करून राहील..
इमेज सौजन्य: गूगल
Comments
Post a Comment