Posts

Showing posts from 2021

रामदरा

Image
रोजच्या धावपळीतून थोडा बदल सगळ्यांना हवाच असतो . अशावेळी जेव्हा मोठ्या सुट्टीवर जाणं शक्य नसतं तेव्हा आपल्या आजूबाजूलाच इतकी सुंदर ठिकाणं लपलेली असतात याची आपल्याला कल्पनाही नसते. फेसबुक च्या माध्यमातूनच अशा  ठिकाणची माहिती मिळाली व आज याच निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा योग आला ते म्हणजे पुण्याहून अंदाजे ३० किमी वर असलेलं 'रामदरा' देवस्थान.    लोणीकाळभोर रस्त्यावर असलेलं हे मंदिर अतिशय शांत व आवर्जून भेट द्यावी असं आहे. वनवासात जायला निघाले असता प्रभू श्रीराम येथे वास्तव्याला होते असं म्हणतात. इथेच त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली. पुढे अनेक वर्षांनी उज्जैन च्या जुनादत्त आखाड्याचे  महंत देवीपुरी महाराज यांना दृष्टांत होऊन त्यांनी हे ठिकाण शोधलं व त्याचा जीर्णोद्धार केला. त्यांनी समाधी घेतल्यानंतर पुढे हे कार्य त्यांचे शिष्य मंगलपुरी महाराजांनी सुरु ठेवले. या दोघा महंतांच्या प्रतिमा इथे पहायला मिळतात.    रामनवमी किंवा महाशिवरात्री च्या उत्सवाचा काळ हा अर्थातच इथला गर्दी खेचणारा काळ. अन्यथा अतिशय निवांतपणे पोहचून दर्शन घेता येण्यासारखे आहे. तळ्याच्या मध्यभागी शिवलिंगाची स्

समतोल...   

Image
  "आम्ही पैसा नसेल कमावला पण आम्ही माणसं कमावली ..." आपल्या परिचयाच्या ज्येष्ठ पीढी चे प्रतिनिधी (आजोबा , आजी) बऱ्याचदा हे वाक्य म्हणतात. हा विषय अलीकडे घरातही निघाल्यामुळे माझी उजळणी झाली. मुळात या गोष्टी एकत्र होऊच नयेत का, असा प्रश्न , हे विधान ऐकल्यावर नेहमी पडतो. नशिबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालावायची तर आपल्या नशीबात जितका पैसा येणं आहे तितका आपोआप येणार. असं म्हटलं तर मग माणसांचही तसंच असलं पाहिजे. तसंच, आपण आपलं नशीब स्वतः घडवतो यावर ज्यांची श्रद्धा आहे ते म्हणतील कि आपल्या आयुष्यातील माणसं कोण व किती हे जसं आपण ठरवतो तसंच किती पैसे येणार हेही आपल्याच हातात आहे.  माणसं खरंच कमवता येतात का? जे कमवतो त्यावर आपला संपूर्ण अधिकार असतो. म्हणूनच आपण पैशांचा विनियोग करु शकतो. माणसं, अगदी दिवसाला एक या प्रमाणे जरी जोडली तरी माणसांवर आपला अधिकार नाही हे मुळात समजून घेण्याची गरज आहे. केवळ ती माणसं आपल्या नात्याची आहेत, परिचयाची आहेत का आपले मित्र आहेत म्हणून आपण अपेक्षा ठेवतो मात्र त्यांच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. पैसे आणि माणसं याला आपापलं महत्वाचं स्थान आहे. य

तेज ब्रह्म

Image
  पहाटेचा कुंद गारवा, दुपारी जाणवणारा उकाडा आणि पुन्हा तिन्हीसांजे नंतर तोच गारवा . वातावरणात हा बदल जाणवायला लागला की समजायचं दिवाळी येऊ घातलीये. वातावरणात जसा हा बदल होतो तसाच बदल होतो तो वातावरणातल्या सुगंधांमध्ये . चकलीची भाजणी, बेसन पीठ तुपावर भाजल्याचा सुगंध असे एकापेक्षा एक सुगंध दरवळून वातावरण गंधमय होतं तसं खाद्यमय सुद्धा होतं. हा बदल फक्त दिवाळीतच बरं का? म्हणजे पुढे काय वाढून ठेवलंय हे आपण नकारात्मक अर्थाने वापरतो, पण दिवाळी जवळ आली कि हे सुगंध जणू खरंच 'पुढे काय वाढून ठेवलंय' याची वर्दी देतात. हे सगळं वाढलं जाणार असेल तर दिवाळीची ओढ लागलीच पाहिजे.  तर या दिवाळी मागची कथा अशी... भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर आक्रमण केलं. प्रहरभर युद्ध करून त्याला संपवला. दिवाळी चा हाच तो पहिला दिवस , नरक चतुर्दशी. नरकासुराने कैद केलेल्या सर्व स्त्रियांना श्रीकृष्णाने मुक्त केलं. त्या सर्वांना श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याची इच्छा होती. पणत्या हातात घेऊन त्या ओळीत उभ्या राहिल्या. या पणत्या म्हणजे 'दीप' आणि ओळीला म्हणायचं 'आवली'..यावरून दीपावली शब्द तयार झाला.

अनुबंध...

Image
    मला लहानपणी कुत्र्यांची खूप भीती वाटायची...गल्लीच्या त्या टोकाशी कुत्रा दिसला कि मी या टोकावरून मागे फिरायचे. आमच्या घराच्या अगदी जवळ एक खाद्यपदार्थांचं दुकान होतं . दूध, ब्रेड, अंडी इ काही आणायचं असेल की तिथून आणता यायचं. त्या मालकाकडे एक पाळीव कुत्रा होता . छान उंचा पुरा,...अत्यंत बोलके डोळे होते त्याचे. गंमत अशी व्हायची की दुकानात मी काही आणायला गेले आणि हा तिथे असला की माझी तंतरलेली असायची. तो तसा शांत कुत्रा होता,  ना कधी तो माझ्यावर भुंकला ना गुरगुरला . पण त्याला का मी आवडायचे त्यालाच ठाऊक. मी दिसले कि तो माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायचा. दुकान मालकाचं नाव जोसेफ. आम्ही त्याला जो काका म्हणायचो . मी कुत्र्याला घाबरते हे जो काकाला माहिती होतं म्हणून तो लक्ष ठेवून असायचा. मात्र मी दुकानातून निघाले की हा कुत्रा माझ्या मागे मागे घराच्या गेट पर्यंत यायचा. आणि इतका गपचूप यायचा कि मला कळायचं सुद्धा नाही . चालता चालता नजर मागे गेलीच तर लक्षात यायचं कि हे महाशय येतायत.      याचा अर्थ तेव्हा कळत नव्हता . वाटायचं हा मला का त्रास देतोय. का येतो माझ्या मागे मागे ?    आज एवढ्या वर्

वेग..

Image
    अगदी ४ दिवसांपूर्वी घडलेली गोष्ट. सिग्नल ला गाडीवर पहिल्या रांगेत थांबले होते.  हिरवा दिवा लागल्यावर गाडी सुरु करून पुढे गेले. अर्थातच नुकताच pick up घेतल्यामुळे माझा वेग कमीच hota. क्रॉसिंग चे पट्टे ओलांडून पुढे जाते न जाते तो भरदाव वेगाने सिग्नल मोडून बाईक चालवत २ किरकोळ पोट्टी जोरात ओरडत समोरून पुढे आली. जणू काही आपणच बाईकचे जनक आणि पहिल्यांदा या जगात आपणच ती चालवतोय या आविर्भावात ती मुलं ओरडत होती. मी वेळेवर ब्रेक लावला नसता तर अर्थातच काय झालं असतं हे सांगायला नको. बरं माझी चूक नसतानाही त्यांनी मला शिवी घातलेली मला ऐकू आली. मात्र, अत्युच्च दर्जाच्या शिव्या येत असतानाही मी त्या हाणु शकले नाही. भरदाव वेगाने ती पोट्टी पुढे निघून गेली . त्यांचा पाठलाग करण्यातही अर्थ नव्हता. त्यांच्या बाईक च्या स्पीड ला माझी गाडी पळवणं म्हणजे कासवाला घोड्याच्या वेगाने पळ सांगण्यासारखं झालं असतं. काही सेकंद माझं अवसान गळालं, भीती वाटली हे मी कबूल करते. थोडी पुढे येऊन मी माझी दुचाकी थांबवली. दीर्घ श्वास घेतला. आपल्याला काहीही झालेलं नाही असं म्हणत स्वतःलाच धीर दिला. आपण काय काम करायला बाह

पाशमुक्त

Image
        काल पुन्हा तशीच एक बातमी येऊन धडकली...ध्यानी मनी नसताना ..सिद्धार्थ शुक्ला च्या जाण्याची...   गेल्यावर्षीची पुनरावृत्तीच जणू ..या दळभद्री कोविड मुळे गेल्यावर्षी सतत आपण घरात , बाहेर पडणं नाही , कुणामध्ये मिसळणं नाही ..जी काही थोडी करमणूक होती ती सोशल मीडिया मुळेच ..स्क्रोलिंग करत बसण्याची सवय लागलेली..आणि अचानक सुशांत सिंग राजपूत गेल्याची बातमी दिसली..अर्थातच फेक आहे या बद्दल खात्री होती...मात्र थोड्या वेळाने अजून पोस्ट दिसायला लागल्या ..काळजाचा ठोका चुकला... सुशांत चं जाणं काय किंवा काल अचानक सिद्धार्थ चं काय..अस्वस्थ करून गेलंय नक्की.   शांतपणे विचार केला तर काल ही व्यक्ती होती ..आज नाही ..एवढं साधं सरळ ..मात्र इतकी स्थिर बुद्धी असायला आपण भगवान श्रीकृष्ण नाही..काल धडधाकट दिसणारा माणूस आज होत्याचा नव्हता होतो..हे भयंकर आहे पचवायला.. याचा संबंध हे दोघे ग्लॅमर च्या जगात होते याच्याशी नाही..किंवा त्यांचं आपाल्याशी काही नातं आहे का नाही याच्याशी सुद्धा नाही. एका अदृश्य भावनिक धाग्यामध्ये आपण बांधले गेलो आहोत, जो कधीही कापला जाऊ शकत नाही.. त्यामुळेच अशी बातमी समजली

केळफूल

Image
   घरच्या बागेत फेरी मारायचं काम माझं अगदी आवडीचं..निसर्गरम्य स्थळी जाण्याचा योग्य सारखा येत नाही मात्र आमची बाग याची उणीव भासु देत नाही कधीच. विविध फूल आणि फळ झाडांच्या सान्निध्यात वेळ अगदी छान जातो.     बाग आपल्या करता रोज सरप्रायझेस घेऊन येते..सकाळी डोकवावं तर फुलांनी पूर्ण बहरलेली असते. जस्वंद, तगर, सोन चाफा, सोनटक्का , लिली , गुलाब, कणेर...जणू काही रोज भेट द्यायला सज्ज असते. फळ झाडांमध्ये सद्ध्या केळ्याचा मौसम असल्यामुळे अलीकडेच नव्यानेच झाडाला एक केळ फूल फुटलं..      शब्दच किती अनोखा ..केळ फूल ...लागतं फळ झाडाला, पण दिसतं फुलासारखं..जस जसं वाढत जातं तसे त्याचे एक एक पदर उलगडायला सुरुवात होते आणि त्यातून अगदी तान्ह्या आकाराची केळी बाहेर दिसू लागतात.. हळू हळू केळफुलाचे पदर गळून खाली पडायल लागतात. आणि केळी आकार घेऊ लागतात.      निसर्ग मुळातच आपल्या माणसांसारखे कुणाचे पाय ओढत नाही. केळफुलाने जर फूल होऊन राहण्याचा हट्ट धरला तर त्याला केळी कधी लागणारच नाहीत की ..त्यामुळे एक एक पदर खाली टाकत केळ्यांना वाढण्यासाठी प्रोत्साहन देत हे फूल आकुंचन पावतं. त्या केळफूलाला हे पक्क माह

घरटं

Image
   अलिकडे एका बुलबुल पक्षाने आमच्या घरात घरटं केलेलं..आपण माणसं आपलं 'घर' बांधण्याकरता जशी आधी जागा ठरवण्यापासून सगळी प्रक्रिया असते, अगदी तसंच हे बुलबुल करत असावं..एवढे 'प्लॉट' बघितल्यानंतर आखेर आमच्या घरात असलेली जुनी tubelight त्याला सुरक्षित वाटली असावी..    'प्लॉट' पसंत पडल्यावर काय मग 'काड्यांची जमवजमव सुरु झाली. बाल्कनीच्या मोठ्या दाराच्या वरची ही जागा..पण दार सकाळी उघडेस तोवर या बुलबुलने खिडकीतून आत बाहेर करण्याची सोय केलेली. साधारण, घरटं बांधण्यापासून, अंडी घालून...ते घरटं रिकामं करण्यापर्यंत 15-20 दिवस गेले..एक दिवस सकाळी पाहतो तर काहीच हालचाल नाही..घरटं रिकामं..त्यांना रोज बघण्याची सवय झाल्यामुळे घरटं रिकामं झाल्यावर वाईट वाटलं खरं.    त्यांची आठवण म्हणून मी ते घरटं जपूनच ठेवलंय..इतकं नेटकं , साधं पण तरीही मजबूत बांधलंय ते. निसर्गाच्या किमयेपुढे आपण नतमस्तक झालो नाही तर नवल..अवघ्या १५-२० दिवसांत त्यांनी पिलांसहित ते घरटं रिकामं केलं..    किती सहज मोकळं करतात हे जीव सगळ्यातून स्वतःला ..स्वकष्टाने बांधलेलं घर किती सहज सोडतात ..आपण माणसं

'ती' खूप काही करते...

Image
   कुठल्याही मालिकेवर/ सिनेमावर केलेली ही टिका किंवा युक्तीवाद नाही..आणि 'गरळ ओक' तर नाहीच नाही. एक अनुभव ज्याची आज आठवण झाली तरी मी स्वत: बद्दल नाराज होते..   काही वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट..तेव्हा मी कॉलेज मधे असेन बहुदा..बाबांचे जुने मित्र , त्यांच्या पत्नी आणि मुलं असं कौटुंबिक get together करुन एक दिवस भेटायचं ठरलं..मला आठवतं त्याप्रमाणे बाकी कुणाची मुलं सोबत आलीच नाहीत. त्यामुळे मला कंपनी नव्हती. जमेल तेवढा त्या संभाषणात मी सहभाग घेतला.. या दोघी तिघी एकाच वयाच्या बायका होत्या..मात्र यापैकी माझी आई एकटीच गृहिणी आणि बाकी दोघी नोकरदार..त्यापैकी एकीने बोलता बोलता माझ्या आईला आश्चर्याने विचारलं," तू काहीच करत नाहीस का!"..हा प्रश्न ऐकून आई जरा ओशाळली..खरं तर आईने ओशाळायचं कारण नव्हतं पण तेव्हा तिला हा प्रश्न अनपेक्षित होता. मला आजही वाईट या गोष्टीचं वाटतं की तेव्हा मी काहिही बोलले नाही. मोठ्यांच्या मधे लहानांनी बोलू नये हे संस्कार म्हणून ठीक असलं तरी त्या वेळी मी गप्प बसायला नको होतं कारण प्रश्न माझ्या आईच्या आत्मसन्मानाचा होता. त्या बाई ला गप्प केलं नाही याची आजही खं

टेक् 'नो' लॉजिकल गंमत..

Image
     पुन्हा एकदा गेल्यावर्षीच्या चक्रात सापडल्यामुळे..अहो कुठलं चक्र काय विचारता? तेच ते lockdown..तर , त्याच सगळ्यात सापडल्यामुळे म्हटलं जरा virtually फिरुन येऊया..जिथे जावंसं वाटतंय , त्याची माहिती गूगल करायची..छायाचित्र बघायची..की झालं virtual पर्यटन..तर म्हणून मी, जवळच्याच एका ठिकाणचं नाव गूगल करुन पाहिलं..साधारण किती वेळ लागतो..किती किलोमीटर..इ पहावं म्हटलं..तर हे गूगल शाळाच घेऊ लागलं..पहिली सूचना काय? 'Due to the COVID restrictions inter-district travel might have been affected'.. मी वैतागून फोन कडे बघून तणतणायला लागले, " एवढं समजू नये मला? आत्ता काय लगेच उठून चालू पडणारे..मी सुद्धा  बातम्या बघते म्हटलं..माहित्ये बंदी आहे फिरण्यावर!"    मी कुणाकडे बघून हे असं बडबडते आहे हे माझ्या नव-याला समजेना..मी जरा गुश्शातच त्याला फोन दाखवला तसा तो हसायला लागला..!    ते कुठलंसं app?..त्यावर तर म्हणे location on असेल तर तुमच्या आजुबाजुला कुठे आणि किती covid रुग्ण आहेत हे कळतं..जणू काही लहान मुलांचा pokemon चा खेळच..pokemon शोधून दाखवले की points  तसे रुग्ण सापडले

Good News

Image
   'धीरज आणि स्नेहा...एक सुखी दांपत्य..आपापल्या व्यवसायातही स्थिरावलेले..एक मेकांवर निस्सीम प्रेम आणि विश्वास असलेले..एका सुखवस्तु एकत्र कुटुंबात राहत..धीरज आणि स्नेहाचा प्रेम विवाह..कॉलेज पासून ची comittment..एकूण 16 वर्षांची ओळख..लग्नाला 7 वर्ष झाली होती'    मात्र आपल्या typical भारतीय विचारसरणीचा शिकार हे दोघं ब-याचदा होत होते.. 7 वर्ष झाली..no good news." ना तब्येतीची तक्रार, ना इतर काही अडचण.. त्यामुळे त्या गोष्टीचा त्रास करुन घेण्यासारखं काही नाही, घडायच्या असतात तेव्हा आपोआप गोष्टी घडतात हे दोघांनाही समजत होतं. एकदा मात्र स्नेहा हळवी झाल्यावर धीरजने तिची इतकी छान समजूत काढली की त्यानंतर स्नेहा अंतर बाह्य मोकळी झाली. धीरज म्हणाला," आपण एकमेकांशी लग्न केलं एकमेकांसाठी..लग्न केलं तेव्हा आला का गं विचार? आपल्याला मुलं होणार का? कधी होणार? आणि नाही झाली तर काय करायचं? मग आत्ताच हे प्रश्न का पडावे? आपण अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहोत हाच आपल्या नात्यातला strong point..मी तुझ्यासोबत प्रचंड खूश आणि समाधानी आहे..आपण एकमेकासोबत आहोत..बास..आपल्या आयुष्यात क

नाळ

Image
  काही वर्षांपूर्वी एक गोष्ट वाचलेली आठवते. एक विवाहित दांपत्य मूल दत्तक घेण्याचा विचार पक्क करतं..समन्वयाने असं ठरतं की आपण तान्ह बाळ दत्तक न घेता थोडं मोठं मूल दत्तक घेऊया..आणि ते वय वर्ष 5/6 असलेली गोड मुलगी दत्तक घेतात.. आधीच्या औपचारिक प्रक्रियेमुळे तिच्याशी ओळख करुन घेणं..तिला वेळ देणं..आम्ही आता तुझे आई बाबा होणार आहोत हे तिला सांगणं असं सगळं व्यवस्थित पार पाडल्यानंतर ते मुलीला घरी घेऊन येतात..मुलीचं नाव 'जुई' असतं.. जुईला आधी वेळ दिल्यामुळे तशी जुई पटकन घर आपलंसं करते. तुला वाटेल तेव्हा आम्हाला आई बाबा अशी हाक मार..तोपर्यंत तुला आवडेल ते म्हण अशी सगळी मोकळीक जुईला मिळते..हळू हळू कळी खुलू लागते..जुईशी भरपूर खेळणं ..भरपूर गप्पा होऊ लागतात.. एकदा जुईची आई छान मोठालं कलिंगड घेऊन येते..जुईलाही कलिंगड आवडतं हे आईला ठाऊक नसतं..कलिंगड बघताच जुई आनंदाने मोठ्यांदा ओरडते. 'अय्या!! कलिंगड !! '.. तसं आईला आश्चर्य वाटतं ..तशी शांत असणारी जुई आज एकदम इतकी मोकळी कशी झाली! आई म्हणते ," वा वा! आमच्या जुई बाईंना कलिंगड एवढं आवडतं माहितीच नव्हतं..जुई म्हणते,"

शरण भाव

Image
 प्रेम...निखळ प्रेम..शब्द..कृती..सगळ्याच्या पलिकडे नेऊन पोहोचवणारी भावना..केवळ त्या एका भावनेच्या असण्याने काय होऊ शकतं याचा प्रत्यय येतो तेव्हा 'निसर्ग' देवतेपुढे नतमस्तक व्हायला होतं..    अलिकडे facebook वरती एक video पाहिला  ज्यात या कुटुंबाने एका magpie जातीच्या पक्षाला अगदी तान्हं असताना वाचवलं..याच कुटुंबाकडे pittbull जातीची पाळीव कुत्री सुद्धा आहे हे विषेश..    पक्षाच्या पिल्लाला घरी आणल्यानंतर सावरायला तसा कमी वेळ लागला..कुत्रीची आणि पक्षाची गट्टी जमली नव्हती पण ती दोघं एकमेकांना त्रासही देत नसत..दिवस पुढे सरकले तशी या दोघांची एकमेकांना सवय होऊ लागली. दोघं एकमेकांजवळ जाऊ लागली. स्पर्श करू लागली. एकमेका सोबत खेळूही लागली. विशेष म्हणजे कुत्री, त्या पक्षाला स्वत:च्या पिल्लाप्रमाणे जपू लागली. पक्षी जिथे म्हणून घरात किंवा बाहेर वावरत तिथे कुत्री त्याची पाठराखीण म्हणून जाऊ लागली. पक्षालाही ही आपलीच आई आहे असं वाटू लागलं.    असं करता करता कुत्रीला दूध येऊ लागलं आहे हे घरातल्यांच्या लक्षात आलं. त्यांना अर्थातच शंका आली की कुत्री गरोदर राहिली असू शकते. पण चाचण्यांनंतर असं समज

Kinetic, Yezdi आणि मी

Image
       त्या दिवशी सकाळी वेधशाळेचं जराही न ऐकता ऐन उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरही हवा चक्क गार होती. सकाळ तशी प्रसन्न असतेच नाही का? भारद्वाज पक्षाची जोडी खूप दिवसांनी बघायला मिळाली. भारद्वाज दिसला की शुभ शकुन असतो म्हणतात. लहान असताना मात्र दर रविवारी महाभारतात नितीश भारद्वाज दिसला की मस्त वाटायचं.      तर ...मनात असतं ते शब्द रुपात येतं. म्हणून भारद्वाज पक्षावरुन नितीश भारद्वाज आणि त्याच्यावरुन लहानपण असा सेतू बांधला. याला निमित्त झालं आमच्या समोर राहणारी 2 वर्षांची चिमुरडी आरोही. सकाळी सकाळी तिच्या बाबांनी दुचाकी बाहेर काढली की आरोहीची पुढे उभं राहून एक चक्कर ठरलेली. हा तिचा नित्यक्रम मी खूपदा बघते, पण आज का कुणास ठाऊक माझी लहानपणची आठवण जागी झाली.      मी लहान असताना माझ्या काकाकडे लाल रंगाची kinetic होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे रहायला जायचा दरवर्षीचा बेत. आठवडाभर आजी आजोबांबरोबर वेळ मजेत जायचाच पण रविवारचाही एक बेत ठरलेला असायचा..तो म्हणजे काकासोबत kinetic वरुन फिरणं. आठवडाभर काका व्यस्त असायचा, मात्र रविवारची विश्रांती झाली की संध्याकाळी kinetic वरुन पुढे उभी राहून च

ज्योत

Image
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः।।6.19।। श्रीमद् भगवद्गीतेतील हा श्लोक....याचा अर्थ असा की निवा-यातील दिव्याची ज्योत जशी स्थिर असते तसेच चित्त, आत्मयोगाचे अनुष्ठान केलेल्या योगी मनुष्यास लागू पडते..    हा श्लोक वाचला आणि देवघरातील त्या दिव्याच्या ज्योतीकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकले...रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस देवघरात जाऊन दिवा लावणं आणि परवचा म्हणणं हा आपल्या सर्वांचाच नित्यक्रम. माझे आजोबा अजूनही दिवे लागण झाली (घरातली tube सुरु केली ही खूण) की आधी बसल्या जागी हात जोडून नमस्कार करतात..    रोज सकाळी सूर्य उगवतो तसा प्रकाश सर्वत्र पसरतो..एक नवीन दिवस आपल्याला मिळाला..जग स्वच्छ सूर्य प्रकाशात उजळून निघालं..उठा जागे व्हा..नवी सुरुवात करा..असं सांगणारा हा प्रकाश..विजेचा शोध लागला नव्हता तोपर्यंत सकाळचा सूर्यप्रकाश हा दिवसाचा, तर देवघरातील दिवा हा रात्रीचे साक्षीदार होते..   सकाळचा सूर्यप्रकाश जसा बहिर्मुख करणारा तसा या नंदादीपाचा प्रकाश अंतर्मुख करणारा..दिवसभर मनुष्य या ना त्या मार्गाने काबाडकष्ट करतो..इतरांचा ह

माझी 'अद्भुत' चित्रकला

Image
 शीर्षक वाचून वाटेल आज आपला चित्रकलेचा तास दिसतोय...छे ओ!... चित्रकलेचा आणि माझा सुतराम संबंध नाही.. आणि हे वाचून आश्चर्य वाटण्यासारखं काहिही नाही..मी भरतनाट्यम नृत्यांगना किंवा नृत्य शिक्षिका आहे म्हणून मला चित्रकलाही येते असं असण्याचं अजिबात कारण नाही.. खरं तर काही वर्षांपूर्वीपर्यंत, म्हणजे जो पर्यंत सक्तीने चित्र काढावी लागत असंत तोपर्यंत तर चित्रकला हा माझा अत्यंत नावडता विषय होता..सक्ती म्हणजे शाळेत असतानाचा काळ ओ! गणित जितका माझा हाडवैर असलेला विषय त्याहून थोडं कमी वैर माझं चित्रकलेशी होतं..'मांसवैर' म्हणता येईल...हो..कारण गणिताचं वैर माझ्या हाडांपर्यंत जाऊन रुतत असे (अजूनही रुततं) तिथे चित्रकलेचं वैर हे मांसापर्यंतच जात असे..असं का याचं सर्वात मोठं कारण हे की मला चित्र काढता नाही आलं तरी माझी all rounder आई ते काढत असे..आणि तुला चित्र कसं गं येत नाही काढता? अशा शिव्या मला खाव्या लागत नसत..जे गणिताबाबत नव्हतं..अहो कौलारु घर काढायचं म्हटलं तरी मला फुटपट्टी लागायची हे पाहिल्यावर खरं तर कूणीही कपाळावर हात मारुन घेईल..या सगळ्यामुळे का काय माझी चित्रकलेची वही ब-या