Posts

Showing posts from 2022

कोपरा...

Image
'आपलं घर'... मनोमन हळवं करणारे हे शब्द...आपण  कितीही मोठे झालो..वयाने आणि खिशाने...तरी सरते शेवटी आपल्या मुक्कामी...आपल्या घरी आपल्याला यायची ओढ असणारच आहे... असं जरी असलं ना तरी आपल्या घरातला आपला आपला एक कोपरा असतो किंवा एक ठरलेली जागा असते...घरात असुनही त्या 'आपल्या' अशा जागेत गेल्याशिवाय आपल्या जिवात जीव येत नाही..मग तो एखादा  कट्टा असो, घरातला एखादा कोनाडा असो, बाल्कनी असो, गच्ची असो किंवा एखादी खोली असो..अख्ख्या घरात जे घरपण सापडत नाही ते , घरातल्या त्या लहानशा जागेत गवसत. कितीही मोठं जग असो आपलं, सूक्ष्माकडे आपला ओढा असतोच. अगदी घरात असताना सुद्धा. घरासाठी अजून एक सुंदर शब्द आपल्या शब्दकोशात आहे...'मंदिर'.. अशाच आपल्या सर्वांच्या परिचयाचं मंदिर ...'कसबा गणपती'... राजमाता जिजाबाई साहेब आणि राजे शिवछत्रपती यांनी स्थापन केलेलं हे मंदिर म्हणजे अमूल्य असा वारसा.. अलिकडे दिवाळीत इथे आलो असता हे मंदिर इतकं तेजस्वी भासलं म्हणून सांगू! जुन्या धाटणीची ही वास्तू दिव्यांच्या आणि आकाश कंदिलांच्या  उजेडात अधिकच जिवंत वाटत होती.. गर्भगृह आणि सभामंडप

गोदावरी

Image
'अश्रद्धेकडून श्रद्धेकडचा प्रवास'... चित्रपटाचं उपशीर्षक एक प्रकारची हमी, सकारात्मकता देऊन जातं ...आमच्यासारख्या सर्व सामान्य प्रेक्षकांना 'and they lived happily ever after' ची इतकी सवय आहे कि सिनेमा म्हटलं कि पहिल्यांदाच 'शेवट गोड होतोय ना ' या कडे लक्ष लागून राहतं. ..आणि ते , 'गोदावरी' हा चित्रपट पूर्ण करतो.. गोदातिराची दृश्य हि या चित्रपटाचा 'USP' आहे. सुरुवातीपासून शेवट पर्यंत पात्रांच्या आयुष्यातल्या समस्या किंवा उतार चढाव दाखवले असले तरी 'गोदामाई' सतत आशावाद दाखवत राहते. निशिकांत चा स्वतःचा स्वतःशी सुरु असलेला संघर्ष अधोरेखित तर होत राहतोच पण चित्रपटात त्याचं डबकं होऊ दिलेलं नाही. परंपरा म्हणजे ' प्रवाह '...नदीसारखा...जशी नदी थांबत नाही तशी परंपराही..त्यात फक्त जाणिवांची भर पडत राहते...मात्र आपण परंपरेला देणं लागतो...आणि त्यात काहीही गैर नाही ..अशी एक एक उत्तरं निशिकांत ला सापडत जातात. चित्रपटाची इतर पात्र हि जणू निशिकांत च्या गुरुची भूमिका बजावतात. त्याचे आई-वडील, पत्नी गौतमी, मुलगी सरिता, मित्र केशव, फुगेवाला

अनुभूती...

Image
  सर सलामत तो पगडी पचास' अशी म्हण आहे...खरं तर अजून एक म्हण प्रचलित व्हायला हवी... 'मन सलामत तो पगडी पचास' .... उद्या दहा ऑकटोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस..या अनुषंगाने काही सुचलं, ते शेअर करते.  मन' असं म्हटलं की त्याला अनेक पैलू ,अनेक अर्थ, अनेक परिभाषा आहेत. पण हे मन नावाचं जे काही आपल्यापाशी आहे, ते सतत कार्यरत राहतं ते कशाच्या जोरावर? तर अनुभवांच्या...आपल्या समोर जे घडतंय..त्याला आपण काहीतरी प्रतिसाद देत असतो . त्यातूनच मन कार्यरत राहत.. अनुभव घेत राहून मन कार्यरत नक्की राहील. पण मानवी मनाची कक्षा इथपर्यंत मर्यादित नाही. आपण केवळ अनुभव घेत राहिलो तर एकावर एक असे नुसते थर साचत राहतील. मिळलेल्या अनुभवाचा विनियोग करायची वेळ येईल तेव्हा यातला नेमका कुठला,  कधी आणि कसा वापरायचा हे समजणारच नाही.. मग नेमकं काय घडलं पाहिजे? तर अनुभव हा ,अनुभूती पर्यंत पोहोचतोय का यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अनुभूती ची माझी व्याख्या हि अशी.. 'ज्ञानदायी अनुभव म्हणजे अनुभूती' ...ज्या अनुभवातून आपल्याला ज्ञान होतं ,ती अनुभूती.. ज्ञान...माहिती नव्हे... अशाच अनुभूतींच्य

राजू भाई..

Image
   राजू श्रीवास्तव यांचं अकाली जाणं खरोखर मनाला चटका लावून गेलं. गेल्या महिन्यापासून मृत्यूशी त्यांची चाललेली झुंज अखेर संपली. Brain dead , condition serious इ अफवा येत होत्या . पण ,'he is stable, do not believe in rumors असं वाचल्यावर आशावादी वाटत होतं . मलाच काय आपल्या सगळ्यांनाच  प्रतीक्षा होती ती राजू भाई ठणठणीत बरे होऊन पुन्हा सगळ्यांसमोर खळखळून हसवायला कधी येतात याची. मला खात्रीये, आजारी असताना हॉस्पिटल मध्ये आलेल्या अनुभवांवरही त्यांनी एक स्टॅन्ड अप ऍक्ट तयार केला असता..मृत्यू चं कारण ठरलं हार्ट अटॅक , पण राजू भाई बरे झाले असते तर त्यांनी 'माझा हार्ट अटॅक' या वरही उत्तम ऍक्ट सादर केला असता आणि हा गंभीर विषय अतिशय हलका करून आपल्यापुढे मांडला असता.  पण.. पण हे सगळं आता होणार नाही..कारण आता राजू भाई आपल्यात नाहीत...'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ' मधून राजू भाई घरोघरी पोहोचले.  त्यांच्या गजोधर ने तर सगळ्यांना वेड लावलं.  राजू भाईंची खासियत म्हणजे ,अति उत्तम देहबोलीचा वापर आणि निरीक्षण क्षमता. रवंथ करणाऱ्या गायीपासून ते फकफकणाऱ्या ट्यूब लाईट पर्यंत ते

Unity in diversity..🇮🇳🇮🇳🇮🇳

Image
  माझ्याकडे शिकणारी लहानशी सात वर्षांची 'समृद्धी'...तिने माझ्याकडे नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली त्याला आता एक वर्ष झालंय..तिच्या वडिलांची, नोकरीमुळे इथे वर्षभरापूर्वी बदली झाली , नाहीतर हे कुटुंब मूळचं कोलकाता चं, बंगाली बोलणारं . आई वडील, समृद्धी व दोन वर्षांची धाकटी बहीण असं यांचं छोटं चौकोनी कुटुंब.  वर्षभरापूर्वी समृद्धीने डान्स शिकायला सुरुवात केली तेव्हा तिला खूप कठीण जात होतं. भरतनाट्यम च्या बेसिक पोझिशन्स करण्यापासून ते इतर गोष्टींपर्यंत. मात्र अतिशय मेहनती मुलगी आहे ती. या एका वर्षात तिने स्वतःला इतकं तयार नक्की केलं कि गेल्या रविवारी झालेल्या क्लास च्या वार्षिक कार्यक्रमात आत्मविश्वासाने आणि अतिशय प्रसन्न चेहऱ्याने स्टेज वर नाचणाऱ्या या मुलीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं . तिची ताई म्हणून मला तिचं खूप कौतुक वाटलं . समृद्धी मूळची बंगाली भाषिक असल्यामुळे तिला आजही हिंदी व इंग्रजी भाषेचा अडसर जाणवतो . घरात बंगाली बोलणारी लोकं , वडिलांना जरी इंग्रजी येत असलं तरी काम सांभाळून ते तिला किमान इंग्रजी बोलायला शिकवू शकतील एवढा वेळ ते देऊ शकत नाहीत. समृद्धी ची आई

अगत्य

Image
   आमच्या कडे स्वयंपाक करणाऱ्या छाया ताईंच्या धाकट्या बहिणीच्या लग्नाला परवा गेले होते. खूप वर्षांनी त्यांच्या घरात शुभ कार्य होणार होतं याचा एकूण आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.    आपल्याकडे ज्या पद्धतीने लग्न समारंभ होतो त्याची सवय आपल्याला असते. पण छाया ताईंच्या घरच्या कार्याला जाण्याची माझी पहिलीच वेळ. पत्रिका पद्धत त्यांच्यात नसावी मात्र मुहूर्ताची वेळ सांगून मुहूर्ताला नक्की या असं छाया ताईंनी आवर्जून सांगितलं होतं . त्याप्रमाणे मी पोहोचले.     गर्दी बघून खरंतर छान वाटत होतं. एरवी गर्दी पासून लांब पळणारी मी पण आज गर्दीत जाऊन बसायला बरं वाटत होतं . हे दोन वर्षांचे निर्बंध संपुष्टात येऊन लोकं एकत्र येतायत, तेही मास्क शिवाय हे खरोखर विशेष आहे.   छाया ताईंची मुलगी श्रुती मला तिथे पोचताच प्रथम भेटली, " अय्या, गौरी ताई तुम्ही आलात" ..हे म्हणतानाचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. कदाचित आमच्या पैकी कुणी येणार नाही असं त्यांना वाटलं असावं म्हणून का काय पण तिला झालेला आनंद माझ्यापर्यंत पोहोचला. छाया ताई पलीकडच्या खोलीत आहेत असं कळल्यावर त्यांना शोधत त

क्षणो क्षणी 'क्षणचित्र'....

Image
    क्षण चित्रांची दुनिया खरोखरच जादुई आहे.. एखादा क्षण त्या लेन्स ने टिपावा आणि तो चिरकाल तसाच राहावा..आता तर सॉफ्ट कॉपी मुळे , तो डिलीट करे पर्यंत आपल्याजवळ अगदी आहे तसा राहावा याला जादू च म्हणावी लागेल. या सगळ्या माध्यमातून आपल्या आठवणी आपल्या पाशी नक्की राहतात.. पण का कुणास ठाऊक हे असं असल्यामुळे असेल कदाचित पण तो क्षण अनुभवण्याची भावना कमी होत चाललीये असं वाटतं.  लग्न समारंभाचंच उदाहरण घेऊया..भरभरून फोटो काढण्याकडे आज कल आहे..अगदी वधू वर त्यांच्या कक्षांमधून पूजा विधी करण्याकरता बाहेर येतात ते क्षण टिपण्यापासून ते सप्तपदीची प्रत्येक सुपारी पायाने सरकवतानाचे फोटो.. असे सगळे क्षण टिपायचे..त्यातही वधू वर प्रत्येक सुपारी बरोबर नवनवीन पोजस घेऊन फोटो काढताना दिसतात . प्रत्यक्ष काय सुरु आहे..तर सप्तपदी. त्याच्या प्रत्येक पदाला एक एक संकल्प आहे ..गहन अर्थ आहे..एक मनोभूमिका आहे..मात्र क्षण आणि क्षण टिपण्यासाठीच्या अट्टाहास रुपी इच्छेमुळे या इतर महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं . वधू वर एकमेकांमध्ये इतके गुंतलेले असतात कि आलेल्या लोकांमधे सुद्धा त्यांना फारसा रस नसतो..या सगळ्

निरागस हट्ट....(लघू कथा)

Image
१९९३ सालची गोष्ट...सरस्वती विद्यामंदिर शाळेत राजू दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. राजुचं संपूर्ण नाव प्रल्हाद राजेंद्र गोडबोले. नावामागची कथा अशी कि प्रल्हादच्या आजीने (आई ची आई) तिच्या लहानपणी म्हणे शाळेच्या नाटकात भक्त प्रल्हादाची भूमिका केलेली. तेव्हापासून त्या इतक्या भारावून गेलेल्या कि आपल्याला धाकट्या भावाचं नाव प्रल्हाद ठेवायचं असं त्यांनी ठरवलं होतं . पण तिला झाली धाकटी बहिण, त्यामुळे मग आपल्या मुलाचं नाव तरी प्रल्हाद ठेवूया अशी इच्छा होती .पण त्यांनाही दोघी मुलीच , त्यामुळे मोठ्या मुलीला जर का पहिला मुलगा झाला तर त्याचं नाव प्रल्हाद ठेवायचं असं म्हणे तिने सांगून ठेवलेलं. तर असा हा त्रेता युगातला प्रल्हाद कलियुगात आला तो गोडबोलेंच्या घरी. पण होता होता प्रल्हाद चा राजू झाला आणि सगळे त्याला लाडाच्या नावाने हाक मारू लागले. विष्णुभक्त नसला तरी हा प्रल्हाद प्राणी भक्त होता. हर तऱ्हेचे, हर जातीचे प्राणी त्याला आवडायचे. छोटे मोठे किडे , पाली , फुलपाखरं , सगळं त्याला खूप आवडायचं . त्यांच्याकडे बघत बसणं , त्यांच्या हालचालींचा निरीक्षण करणं . कधी पालीसारखं उलटं चालून बघणं , कधी आ

मोठेपण..

Image
कलाकाराला मोठेपण मिळण्याकरता तपश्चर्या करावी लागते..ते सहज साध्य नाही..मोठेपण मिळण्याकरता मात्र आयुष्यात अनेक ठिकाणी स्वतःच स्वतःला लहान होताना कलाकार पाहत असतो. कधी स्वतःच्या नजरेत कधी इतरांच्या. काहीजण त्याला सतत लहानपण देऊ पाहत असतात .अशावेळी कलाकाराची खरी परीक्षा असते . जग त्याला कितीही लहान करो, त्याने स्वतःच्या नजरेतून स्वतःला लहान करता काम नये. या अग्निदिव्यातून तालून सुलाखून जो निघतो आणि तरीही स्वतः लहान राहून कला मोठी करतो ,त्याच कलाकाराला मोठेपण मिळतं .. आज 'मी वसंतराव पाहताना हे सतत जाणवत होतं. जिथे सच्चे स्वर सापडतील ते संगीत आणि अशा सच्चा स्वरांचा शोध घेत असलेला एक ' अद्वितीय' कलाकार आपल्याला लाभला ते म्हणजे 'वसंतराव देशपांडे'. चाकोरीबद्ध गायकीत स्वतःला बंदिस्त न केल्यामुळेच कदाचित 'स्वर' त्यांना शोधत आले असावे. 'सा' लागला कि साक्षात परमेश्वर येऊन समोर उभा राहतो, त्याला शोधत मंदिरात जावं लागत नाही, हे मास्टर दीनानाथांच्या मुखी आलेलं चित्रपटातलं वाक्य अगदी खरं आहे. मात्र त्या परमेश्वरालाच मुक्तपणे प्रकट व्हायची इच्छा झाली असाव

श्री स्वामी समर्थ..

Image
2019 सालची गोष्ट ..आम्ही दोघांनी अक्कलकोट ला जायचं ठरवलं . एरवीच्या वेळापत्रकात आमच्या एकूण व्यवसायाचं स्वरूप बघता वर्षभरात जमलं नाही म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत जायचं ठरलं .  आमच्या घरी कशेळीकरांकडे स्वामींवर सगळ्यांची श्रद्धा,  विशेषतः माझ्या आजीची .त्यामुळे माझं नाव अक्कलकोट ला जाऊन ठेवावं अशी आजीची इच्छा होती. महिनाभराची असताना मला अक्कलकोट ला घेऊन जाऊन नाव ठेवलंय असं आई सांगते.  त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी माझा अक्कलकोट ला जाण्याचा योग 2019 च्या मे महिन्यात आला. भर उकाड्यात जाण्याचा बेत ठरलेला खरा पण प्रत्यक्ष अक्कलकोट ला जाऊन दर्शन घेण्याच्या इच्छेपुढे उकाडा तो कसला. सकाळी लौकर आवरून आम्ही दोघे, आमच्या चार चाकीतून निघालो. प्रवास एकूण छान सुरु झालेला. सोलापूर रस्त्याला लागलो तशी गाड्यांची रांग लागलेली दिसली. पुढे कुठेतरी तेल सांडल्यामुळे जबरदस्त अपघात झाला होता. एकूणच घडलेला प्रकार लक्षात आला . गाडी हळू हळू , कासव गतीने पुढे ढकलत होतो . या मागे बसण्यात काहीही अर्थ नव्हता हे एकूण लक्षात आलं. ठरल्याप्रमाणे अक्कलकोट ला पोहोचायचं असेल तर इथून बाहेर पडलं पाहिजे. मागे फिराव

एका अंघोळीची गोष्ट

Image
अंघोळ म्हटलं की मला सध्या एकच चित्र डोळ्यापुढे दिसतं ..जे कदाचित घरोघरी दिसत असेल किंवा नसेलही..रोज एक ठरलेला प्रश्न मी सचिन ला नक्की विचारते (हुकूम करते म्हंटल तरी चालेल) अंघोळ कधी करतो आहेस?...त्यावर तो ," जातोय, कळलं ना!" असा वैताग मिश्रित राग दाखवत अंघोळीला जाण्याचं मनावर घेतो.. अंघोळ करणाऱ्यांच्या 2 categories असतात..एक, ज्यांना अंघोळ करताना विलक्षण आनंद मिळतो , त्यामुळे ते अंघोळ झाल्या नंतर नवीन जन्म झाल्याच्या आविर्भावात बाहेर येतात, सचिन सारखे,..तर दुसरे ,ज्यांना अंघोळ हि केवळ औपचारिकता वाटते , त्यामुळे ते अं घो ळ हि ३ अक्षर उच्चारायच्या आत बाहेर आलेली असतात, कावळ्याची अंघोळ करणारे , माझ्यासारखे.. म्हणूनच सचिन सारख्या लोकांना आंघोळीचं वेळापत्रक केलेलं आवडत नाही , ते दिवसभरात कधीही व कितीही वेळ अंघोळ करू शकतात..तर माझ्यासारखे," एकदाची करून टाकूया ती अंघोळ" म्हणून प्रकाश वेगाने अंघोळ करून येतात. मुद्दा काय , तर अंघोळी वेळेवर व्हाव्या आणि घराचं वेळापत्रक बिघडू नये..पण त्यावर "माझ्या अंघोळीचा आणि घरातल्या रुटीन चा संबंध काय?" असा निरागस प्र

द काश्मीर फाईल्स : एक दर्जेदार कलाकृती

Image
  'काश्मीर फाईल्स' ची चर्चा आज सर्वत्र होते आहे. कुणी कितीही नावं ठेवो , propaganda म्हणो पण जो परिणाम साधायचा, तो या सिनेमा ने नक्की साधलाय. एखादी कलाकृती लोकांच्या वैचारिक पातळीपर्यंत किती परिणामकारक ठरू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'काश्मीर फाइल्स'. एक कलाकृती म्हणूनही ती तितकीच दर्जेदार आहे हे निर्विवाद आहे. कलेचा थेट परिणाम समाज घडवून आणण्यासाठी होतो हे काश्मीर फाइल्स ने सिद्ध केलं आहे. A rated सिनेमा असल्यामुळे वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्यांनीच तो पाहायचा आहे मात्र एकूण चित्र असं आहे कि या सिनेमाची चर्चा अठरा वर्ष वयापेक्षा लहान असलेल्यांमध्येही तितकीच होत आहे. नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता लहान मुलांमध्येही दिसत्ये. सिनेमा , हे क्रांती घडवून आणण्याचं एक सशक्त माध्यम आहे हे काश्मीर फाइल्स ने दाखवून दिलं आहे.   विवेक अग्निहोत्री यांनी पात्र निवड अतिशय उत्तम केलेली आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि डिजिपी हि चारही पात्र उत्तम साकार केली आहेत.  सिनेमा मध्ये प्रत्येक पात्राची एक आपली कहाणी आहे. IAS व DGP पदावर कार्यरत असूनही असमर्थ ठरलेल

पर्रीकर सर...

Image
स्वर्गीय मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर.. फार कमी लोकांच्या बाबतीत 'बस नाम ही काफी है' असे उद्गार निघतात. पर्रीकर सर हयात असतानाही 'नाम हि काफी था', आणि आज ते आपल्यात नाहीत तरीही 'नाम हि काफी है'... मनोहर पर्रीकर म्हणजे देश भक्ती  , मनोहर पर्रीकर म्हणजे तत्वनिष्ठा ,मनोहर पर्रीकर म्हणजे ध्यास , मनोहर पर्रीकर म्हणजे कार्यमग्नता, मनोहर पर्रीकर म्हणजे अखंड सावधानता, मनोहर पर्रीकर म्हणजे साक्षात हिंदुत्व ... आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजताना सुद्धा ज्यांचा देशाप्रतीचा समर्पणभाव अखंड राहिला असं अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे पर्रीकर सर.  त्यांच्या या समर्पण भावनेची सुद्धा खिल्ली उडवणारे अनेक होते पण त्या सगळ्याला न जुमानता , नाकातोंडात नळ्या असताना , मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा ते अविरतपणे कार्य करत राहिले. ..राष्ट्रभक्ती हि केवळ १५ आगस्ट व २६ जानेवारीला गाणी गाण्यापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक दिवशी देशाचा विचार करून कार्यरत राहण्यात आहे, हे ज्यांनी दाखवून दिलं ते म्हणजे श्री.मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर.. आज तिसऱ्या स्मृतिदिवशी सुद्धा पर्रीकर सर आपल्यात त्यांच्य

सामंजस्य

Image
  जागतिक महिला दिन..बायकांचा उदो उदो करण्याचा दिवस..मी नेहमीप्रमाणे क्लास ला पोहोचण्याकरता निघाले..जाता जाता आजूबाजूला दिसणाऱ्या हॉटेल्स कडे नजर गेली. आज week day असूनही बायकांच्या तुडुंब गर्दीने हॉटेल्स भरून वाहत होती. पण का कोण जाणे महिला दिनाच्या या सगळ्या जल्लोषात काहीतरी अपुरेपणा जाणवत होता.     हे सगळं एकीकडे डोक्यात घोळत होतं . क्लास ची वेळ संपत आली तसं माझ लक्ष बाजूने येणाऱ्या आवाजाकडे गेलं. क्लास च्या आवारात राहणाऱ्या watchman च्या घरातून आवाज येत होता. त्याची बायको गरम गरम पोळ्या लाटत मुलांना जेवू घालत होती. महिला दिनाचं औचित्य आणि हे दृश्य , मगाशी जे अपुरं वाटलं ते इथे पूर्ण झालं..या सगळ्या सुद्धा कर्तबगार महिला नाहीत का? फक्त आता महिलांच्या या बाजूला कर्तबगारी म्हणून बघणं आपण सोडून दिलंय. हो.. आपणच सोडून दिलंय..    आपल्या दृष्टीने कर्तबगार महिला कोण ? तर उच्च विद्याविभूषित, नवर्‍याच्या तोडीस तोड मिळवणारी, ऑफिस मधल्या चार पुरुषांची बॉस असलेली. यापैकी काही जणी घरचं पाहून सगळं करतात तर काही जणी घरच्या कामांना मदत घेतात. पण महत्वाचं काय तर बाई घराबाहेर पडली , आर्थिक

झोप आणि तिचे प्रकार..

Image
आज मराठी भाषा गौरव दिवस ..तेव्हा म्हटलं मराठीत तर आपण लिहितोच मग सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आज लिहावं...झोsssssपsss..कसं बरं वाटलं कि नाही वाचून..? या विषयावर लिहिण्याचा विचार येताच जांभया यायला लागल्या बघा. मला खात्री आहे ,वाचकांना सुद्धा हाच अनुभव शीर्षक वाचताच येऊ लागेल.. विचार केला तर काय कमालीचा प्रकार आहे ही झोप...!!! संपूर्ण निद्रिस्त व्हायचं , डोळे मिटायचे, संपूर्णपणे आपल्या विश्वात जायचं , सगळ्या जगाचा विसर पडू द्यायचा.    थेट काही एक वेळाने पूर्ण ताजं तवानं जागं व्हायचं. देवाने एवढं काही निर्माण करून ठेवलंय पण त्यापैकी सर्वात अद्भुत मला झोप वाटते. अजून एक म्हणजे ती निसर्गाचीच हाक म्हणायची इतर विधींप्रमाणे त्यामुळे ती सुद्धा कधीही येऊ शकते हे विशेष.     तर अशी ही झोप , हिचे प्रकार कुठले?याच्याही आधले मधले प्रकार असणार हे नक्की..     रात्रीची झोप: ही झोप आपण सर्वच घेतो. थोडक्यात आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे रात्रीची झोप. हल्लीच्या ट्रेंड प्रमाणे रात्री कितीही कुणी ओटिटी बघत बसलं तरी एका पॉईंट ला निद्रादेवी तिचा अधिकार दाखवते. साधारणतः ७ वाजल

चांदनी...

Image
  चंद्रला जितकं महत्व, तो जितका हवा हवासा तितकीच चांदणी..चंद्राकडे लक्ष गेलं आणि चांदणी कडे नाही असं होणार नाही. या चांदणी चं सुद्धा असंच होतं     चार वर्षांपूर्वी अचानक सकाळी बातमी येऊन धडकलेली, श्रीदेवी गेली ..आणि ती सुद्धा अशी विचित्रपणे..आणि इतक्या लौकर..वेळ आली की हे लौकर उशिरा म्हणण्याला काही अर्थ उरत नाही खरा, तरी श्रीदेवी गेली हे पचनीच पडेना तेव्हा.  तिची एक मुलाखत ऐकल्याचं आठवतंय. एकूण बालपण, शिक्षण ,अभिनयात पदार्पण असे नेहमीचे प्रश्न विचारले जात होते तिला. एक वाक्य ऐकून मात्र मी भारावून गेले. ती म्हणाली मी वयाच्या चौथ्या वर्षापासून सिनेमात काम करू लागले. शाळेत जायला कधी वेळ मिळाला नाही. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून डिग्री घेणं वगैरे काय असतं , शाळा कॉलेज काय असतं हे मला माहितीच नाही.  एका हॉटेलात आई वडिलांसोबत आली असता चार वर्षांचा या मुलीला कुणी एक दिग्दर्शक डान्स करताना बघतो काय, सिनेमासाठी तिला निवडतो काय..घरून तिला प्रोत्साहन मिळत काय.. बाल कलाकार म्हणून तिची सुरुवात होते काय..and the rest is history... अभिनय म्हणजे काय हे कळत नसलेल्या वयात अभिनेत्री म्हणून य

मृत्यूचा सोहळा

Image
  मृत्यू' या एकमेव शब्दापाशी आपलं आयुष्य घुटमळत असतं..जगण्याचा विचार किती करतो आपण? कमीच करतो खरं..मरणाचा विचार जास्त करतो. 'काही झालं तर?' हा विचार करणारी जमात एकीकडे तर 'काही होत नाही', असा परस्पर विरोधी विचार करणारे दुसरीकडे.. पण सगळ्याच्या मुळाशी एकच...मृत्यू... खरं तर जगणंच महाकठीण, मृत्यू सोपा..एका क्षणात सगळं थांबतं...जाणाऱ्यापाशी काही उरत नाहीच..आपण जातो.. ४ ओळखीतली माणसं येतात..सगळं उरकलं जातं ..सगळे घरी जातात... मात्र, मी काय काम केलंय याचा जेव्हा विसर पडतो तेव्हाच मृत्यू होतो. प्रश्न हा आहे की जाणारा काय देऊन गेलाय ..जे असं काही देऊन गेले आहेत, त्याचा मृत्यू हा दुःखद होऊच शकत नाही, कारण केवळ देह रुपानेच ते आपल्यात नसतात. इतरांचं 'जगणं' हे खरंच 'जगणं' व्हावं असं काहीतरी एखाद्या कडून त्याच्याही नकळत होतं..अशी अद्वितीय व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा त्यांच्या मृत्यूचा होतो तो सोहळा.. लता बाई निवर्तल्या..यावर अजूनही विश्वास बसत नाही. बसूच नये..कारण लता बाईंचा अजरामर ठेवा आपल्यापाशी आहे ..त्या स्वतः रित्या गेल्या...मात्र आपल्यासारख्यांच

दवबिंदू....

Image
 दवबिंदूचं मला नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे. आपल्या लहानशा अस्तित्वाच्या काळात तो किती डौलात चमकत असतो ! दररोज एक नवा बिंदू चमकताना दिसला कि किती प्रसन्न वाटतं. आपणही असेच असतो तर? दवबिंदू आणि लहान मुलं ही मला एकसारखी वाटतात नेहमी.    मोठं होणं म्हणजे नेमकं काय? समजूतदार होणं ? समजूतदार झालो असं म्हटलं तर आपण आपल्या आणि सर्वांच्या आवडीचे झालो असतो नाही का? पण होतं नेमकं उलटं ..मोठं झाल्यावर आपण स्वतःला आणि इतरांना आवडेनासे होतो ..लहान असताना अगदी 'अले अले' करत गोंजारणारी माणसं ढिगाने असतात. पण मोठे झालो की ,म्हणजेच समजूतदार झालो की असं कुणीही गोंजारत नाही आपल्याला.. मोठ्या होण्यातला समजूतदारपणा हाच असला पाहिजे की आधी आपण स्वतःला आवडतोय का? लहान मूल स्वतः स्वतःचा आनंद घेत असतं ..म्हणूनच ते सगळ्यांनाच आवडतं ..त्याला काय आणि किती कळत असेल ? हा आपला बाप, ही आई , हा अमका हा ढमका ...पण सगळे अगदी पायघड्या घालायला तयार असतात त्याच्यासाठी..याचं खरं कारण , माफ करा थोडं पठडी सोडून लिहितेय, पण ते मूल कुणाला 'घंटा' विचारत नसतं ..मला झोप आली मी झोपणार, मला वाटेल तेव्हा जेव्

5 मिनिटं..

Image
  लहानपणी मोठी गम्मत असते बरं ! मुलांचं आपलं आपलं वेगळं घड्याळ असतं. त्यांच्या परीने ते घड्याळ पुढे मागे करत असतात. पाच मिनिटांचा वेळ सुद्धा किती मजेशीर वेळ असतो लहानपणी..मला आठवतं शाळेसाठी आई मला सकाळी उठवायला यायची तेव्हा मी 5 मिं-5 मिं म्हणून अजून थोडी झोप काढायचे. पण ही 5 मिनिटं आईच्या भरोशावर असायची ..एवढा विश्वास तिच्यावर की ती 5 मिनिटांनी उठवायला नक्की येणार आणि आपल्याला शाळेला उशीर होणार नाही. आणि त्या शेवटच्या ५ मिनिटात जणू अवघ्या रात्रभराची झोप घेतल्याचं समाधान मिळायचं. विचार केला तर या 5 मिनिटांचं आजही तितकंच महत्व आहे की . अगदी आजही सकाळचा गजर वाजला की आपल्यापैकी 99 टक्के जणं तो snooze करून 5 मिनिटासाठी नक्की पुढे ढकलत असतात. काय होणार असतं असं या अजून 5 मिनिटांनी? पण ती शेवटचीच ५ मिनिटं जिवाभावाची वाटतात सगळ्यांना.  आपल्या जिवलगांना कितीही वेळ भेटलो, त्यांच्याशी कितीही वेळ गप्पा मारल्या तरी त्या शेवटच्या पाच मिनिटात गेल्या 5 तासांची कसर भरून निघते असं वाटतं . प्रियकर प्रेयसीची भेट,... अगदी तासंतास हातात हात घेऊन बसूनही अजून 5 मिनिटं थांबण्याचा लडिवाळ हट्ट काही

कहो ना..'आज भी'..प्यार है

Image
    14 जानेवरी 2000...जानेवरी महिना हा सर्वार्थाने आशावाद दाखवणारा महिना.. एकतर वर्षातला पहिला महिना..नवीन सुरुवात करायची उमेद आणि ऊर्जा देणारा म्हणून जानेवारी ओळखला जातो. बरं मग साल 2000 चं काय म्हणताय असं विचाराल मला.. तर हो ..१४ जानेवारी, साल 2000 या दिवशी हिंदी सिनेमा जगताला, थोडक्यात बॉलीवूड ला 'कहो ना प्यार है' सिनेमामुळे एक 'अजिंक्यतारा' मिळाला...हृतिक राकेश रोशन नावाचा.. म्हणून हा 2000 सालचा जानेवरी महिना खास! 'कहो ना प्यार है' आणि हृतिक रोशन या जणू एका नाण्याच्या 2 बाजू झाल्या..खान लोकांचं अधिराज्य असलेल्या बॉलीवूड मधे 6 फूट उंच, पिळदार शरीरयष्टी , घारे डोळे, चाफेकळी नाक व भन्नाट जाॅ लाईन असलेला एक तरुण पदार्पण करतो. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांचा नातू , दिग्दर्शक व अभिनेता राकेश रोशन यांचा मुलगा व सुप्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांचा पुतण्या या सगळ्या ओळखी जणू पुसल्या गेल्या आणि लक्षात राहिला तो फक्त हृतिक रोशन.   त्याच्या सोबत हिरोईन होती अमिषा पटेल..बॅरिस्टर रजनी पटेलांची नात बरं का ही! तशी उंचीने हृतिक पेक्षा खूपच बुटकी पण तिच्या चेहऱ्याच्

'The wall'...on the wall...आणि मी...

Image
  किती जादुई असतात नाही ही छायाचित्र! जुने फोटो आपल्याला आठवणींच्या विश्वात चटकन घेऊन जातात..लाखो क्षण, मिनिटे , तास,  दिवस तसंच कित्येक वर्षांचा काळ झपकन पार करवून आपल्याला मागे घेऊन जाण्याची ताकद असते बरं फोटो मधे!..मला तर जुने फोटो बघणं stress buster वाटतं ..फोटो बघत बसलं की आपण आपोआप त्यात रमतो, वेळ चांगला जातो आणि या सगळ्यात आपला ताण कधी हलका होतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही.. एक असाच आठवणीतला फोटो सापडला ..इयत्ता ६ वीत असतानाच्या या माझ्या फोटोत अजून एक फोटो आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला लाभलेला एक अद्वितीय खेळाडू असा त्याचा उल्लेख केला तर निश्चितच वावगं ठरणार नाही...चायना कडे जरूर त्यांची ग्रेट वॉल असेल मात्र आमची the great Indian wall, Mr. Dependable म्हणजे राहुल द्रविड. क्रिकेट बद्दलचं माझं ज्ञान अतिसामान्याहूनही अतिसामान्य आहे, मात्र एवढं नक्की ठाऊक की test player ला glamour मिळवून दिलं ते राहुल द्रविड ने. या फोटो मागची आठवण मोठी मजेशीर आहे. साल होतं १९९८, नाशिक.. राहुल द्रविड चं जबरदस्त fan following होतं माझं ..द्रविडचे फोटो गोळा करणं हा आवडता छंद..आई आणि मी ज्या

ओढ

Image
'ओढ'.. शब्दातच काहीतरी वेगळं आहे. शब्द उच्चारला तरी आपल्यापाशी काहीतरी खेचलं जातंय असं वाटतं मला. गंमत कशी असते बघा, ओढ हे सर्वनाम म्हणून वापरलं तर तितकं परिणामकारक होणार नाही मात्र ' ती ओढ' असं नाम या अर्थी वापरलं की जणू दुधावर साय धरावी तसं काहीसं मलईदार , मऊसूद वाटतं. ओढ लागून राहिली कि नेमक्या काय भावना असतात बरं? ती व्यक्ती आणि आपण यामध्ये एक अदृश्य धागा असतो. दोहोबाजुंनी हे धागे मजबूत बांधलेले असतात.  मात्र ताणून कुणीच धरत नाही. कारण दोघांनाही माहिती असतं कि आपल्यामध्ये आहे तो मायेचा धागा, ज्यावर फक्त मायेचा पदर सरकवला तरी तो घट्ट होत जाणारे. त्यासाठी कुणी एकाने ताणायची गरज नाही.  बरं ही ओढ निर्जीव वस्तूंबद्दल सुद्धा वाटतेच की...जसं की आपलं आवडतं पुस्तक , आपली बॅग , आपली गाडी इ. माझ्या गाडीवर तर माझा इतका जीव आहे की येता जाता मी तिला थँक यू म्हणते ," बाई गं , तू आहेस म्हणून मी जवळची , लांबची अंतरं किती सहज पार करू शकते".. कधी कधी माझं मलाच हसू येतं याचं ,पण गाडी सर्व्हिसिंग ला गेली की ती घरी येईपर्यंत मला अगदी बेचैन होत राहतं . कधी एकदा गाडी

रणवीर..

Image
    पूर्वी सारखी रणक्षेत्र आता राहिली नाहीत..पण कार्यक्षेत्रांचा विस्तार मात्र होताना दिसतोय. प्रत्येक क्षेत्राची आता रणभूमीच झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तिथे एखादा 'रणवीर' च सातत्य टिकवतो. रणवीर सिंह भवनानी हा असाच एक वीर आहे असं म्हणावंसं वाटतं. हे लिहावंस वाटलं यामागे कारण म्हणजे अलिकडे पाहिलेला '83' हा चित्रपट . रणवीर पहिल्यांदा एखादी भूमिका उभी करतो ती नजरेतून. त्याचा चेहरा मेकअप लावून बदलतोच पण भूमिकेच्या खोलात शिरताना रणवीर डोळ्यातून अगदी भरभरून व्यक्त होत राहतो. कपिल देव उभा करताना प्रत्यक्ष कपिल देव यांची अनेकदा भेट घेऊन, त्यांची बोलण्याच्या , उठण्या-बसण्याच्या इ लकबी  त्याने पकडल्या आहेतच मात्र त्यांच्या डोळ्यांचा अभ्यासही अचूक केलाय हे समजतं. त्यामुळे चित्रपट पाहताना रणवीर बाजूला होऊन कपिल देव समोर उभे राहतात. स्वतः ४-५ तास दररोज क्रिकेट प्रॅक्टिस करणं , कमावलेलं शरीर उतरवून भूमिकेच्या जवळ आणणं या सगळ्या गोष्टींवर जीवापाड मेहनत रणवीर ने घेतलेली दिसून येते. कौतुक यासाठी करावंसं वाटलं की कपिल देवांची भेट घेणं शक्य असल्यामुळे या गोष्टी बऱ

३१ डिसेंबर आणि आळंदी...

Image
  आळंदी ला जायचा योग इतक्या वर्षांनी काल आला. ज्ञानेश्वर माऊलींच्या सान्निध्यात जाणं हा विचारच किती भारावून टाकणारा आहे. 'ज्ञानेश्वरी' लिहून तरुण वयात संजीवन समाधी घेणाऱ्याला मनुष्य तरी कसं म्हणायचं? . ते साक्षात परमेश्वर च...माऊलींनी जन्म घेतला ते 'ज्ञानेश्वरी' निर्मितीच्या माध्यमातून जीवनमूल्य समजावून देण्यासाठी. हजारो वर्षांपूर्वी कृष्णपरमात्म्याने गीता सांगितली. माउलींनी , चंदन उगाळल्यावर त्यातला सुगंध बाहेर पडावा तसाच, गीतेतील सुगंध 'ज्ञानेश्वरी' म्हणून आपल्या समोर आणला.       आळंदी ला जात असताना हे सगळं मनात येत होतं . काल आळंदीत गर्दी म्हणावी अशी फार नव्हती. समाधीचं दर्शनहि मिळालं खरं पण काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं. समाधान वाटेना.    निघताना वाटलं इंद्रायणीला नमस्कार करावा, पाय बुडवावे आणि निघावं. नंतर जाणवलं की इंद्रायणीत पाय बुडवणं हा अनुभव नव्हे तर अनुभूती आहे. इतका वेळ जे राहून गेल्यासारखं वाटत होतं ते इथे गवसलं. इंद्रायणीत पाय बुडवले, डोळे मिटले आणि प्रत्यक्ष माऊलींना पदस्पर्श होतोय असं वाटलं.  दोन मीं सगळ्याचाच विसर पडला. आपण क